बाईपणाच्या गोष्टी

baipanachya goshti

माझे मनोगत.. 

 लेखक हा भावनांशी जखडलेला माणूस असतो आणि मानवी भावभावनांचा गुंता त्याला आपल्या लेखणीद्वारे मोकळा करायचा असतो..शब्दांच्या साहाय्याने जेव्हा गुंता मोकळा मोकळा होत जातो तेव्हा त्या निर्मितीला आपण साहित्य असे संबोधतो.साहित्याची बीजे त्याला आजूबाजूच्या वातावरणातून मिळत असतात..काही प्रसंग असे असतात की जे काळजाला भिडतात आणि मग लेखणीतून झरझर उतरतात. माझ्या प्रासंगिक सदरलेखनाला महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक असलेल्या महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रातून वाव मिळाला आणि ते लिखाण वाचकांच्या मनापर्यंत झिरपत गेले..

वाचकांकडून मला उदंड प्रतिसाद मिळत गेला आणि मीच थक्क झाले..मी जे शब्दातून मांडत असते अगदी तसेच किंवा थोड्याफार फरकाने वाचकांना देखील वाटत असते अशी जाणीव मला होते.इतकेच की मी ते सगळ्यांच्या मनातले कागदावर उतरवण्यास यशस्वी झालेली असते.जणू काही माझ्या शब्दांना पंख फुटले आहेत आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत.. त्याक्षणी वाटले की माझे शब्द माझ्यासाठी संजीवनी ठरले आहेत.. शब्दांनी नाते जोपासली गेली आहेत..लिखाणवाचनाने समृद्ध अशी माणसे मी जोडली आहेत..

अशा रितीने लेखातले शब्द मला नेहमीच सन्मान देत गेले..मग वाटले की ह्या शब्दांना पुस्तकांची छानशी चौकट द्यावी आणि वाचकांना ते लेख एकत्रितरित्या वाचता यावे याच हेतूने पुस्तकाची आखणी केली आहे. महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने त्यात प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह करण्याची परवानगी देखील दिली..

गेल्या अडोतीस वर्षांपासून पत्रकारितेमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते असे महाराष्ट्र टाइम्स नासिक समूहाचे निवासी संपादक श्री.शैलेंद्र तनपुरे यांनी माझ्या शब्दाला मान देत उत्कृष्ट अशी प्रस्तावना देखील लिहून दिली.2005 पासून मी वृत्तपत्रीय सदर लेखन करत असल्याची नोंद त्यांनी घेतली.अत्यंत बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तनपुरेसरांचे मनःपूर्वक आभार मानत आहे. महाराष्ट्र टाइम्स मैफल  माध्यमातून माझे लिखाण सुजाण वाचकांच्या पर्यंत पोहचू शकले आहे..लिखाणासाठी प्रेरणा देणाऱ्या माझ्या कुटुंबियांचे तसेच आप्तस्नेहीजनांचे देखील मी नेहमीच ऋण मानते. लिखाणासाठी विषय देणाऱ्या सख्यांचे मनापासून आभार..!  माझ्या पुस्तकाचे नाव आहे ‘बाईपणाच्या गोष्टी’..

बाईपणाचा पसारा हा नेहमीच अफाट असतो आणि तो शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा मी प्रयत्न केला आहे.ती तर कुटुंबाचा कणा असते.कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुखासाठी तिचे सदैव धडपड असते.. त्या बाईचे मन जाणून घेताना आपण थक्क होत जातो.. तिचे भावोत्कट बोलणे खूप काही सांगून जाते आणि त्यातूनच तिचे अंतरंग उलगडत जाते..ती जसे घर चालवते तसे विमानही चालवू शकते..काळाची हाक ऐकत तिने आपला वेग वाढवला आहे आणि काळाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध केले आहे पण तिच्यातले बाईपण मात्र तेच आहे..तिचे अंतरंग म्हणजे भावभावनांचे एक सप्तरंगी इंद्रधनू होय..तिच्या आयुष्यातील विविध नातेसंबधांविषयी तिला नेमके काय वाटते हे जाणून घेणे गरजेचे असते..तिच्या रोजच्या नेहमीच्या आयुष्यात खूप काही दडलेले असते..विषय म्हंटले तर तसे अगदी साधे असतात पण ते जगण्यातील महत्त्वपूर्ण विषय असतात मग बाईपणाच्या गोष्टी ह्या जगण्याच्या गोष्टी वाटू लागतात..तेच सर्व विषय सदरातून उलगडून दाखवले आहेत आणि त्यातूनच माझे हे पुस्तक साकारले आहे.. मला आशा आहे की माझे हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरणार आहे.

‘किताबे करती है बाते बीते जमाने की.. दुनिया की.. इंसानों की.. आज की.. कल की..एक एक पल की..खुशियों की..गमों की..फुलों की..जीत की.. हार की.. प्यार की..मार की..’

शायर सफदर हाश्मी यांच्या ह्या ओळी मला नेहमीच आवडतात आणि माझे पुस्तकप्रेम अधिकच बहरत जाते..माझे हे पुस्तक देखील असेच जगण्यावरील भाष्य करणारे आहे.   बदलत्या काळाची हाक ऐकत पुस्तक डिजिटल स्वरूपात आणणाऱ्या ई साहित्य प्रकाशनचे मनःपूर्वक आभार..! ई साहित्य टीमचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे ज्यामुळे माझ्यासारख्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे..त्यांच्या अविरत कार्यास मी शुभेच्छा व्यक्त करत आहे.


स्वाती पाचपांडे नाशिक

41080cookie-checkबाईपणाच्या गोष्टी
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.