माझे शिक्षक

WhatsApp Image 2021-09-06 at 8.50.05 PM

माझे शिक्षक
दहावीत आमच्या वर्गाला (१० वी तुकडी – क : १९९४) इंग्रजी विषय शिकविण्यासाठी सपकाळ सर (गुलाबराव सपकाळ ), नुकतेच बदली होऊन आलेले. सर वर्गात शिकवायला येण्याच्या आधीच त्यांची किर्ती अन्य शिक्षकांकडुन आमच्या वर्गात पोहोचली होतीच. संपुर्ण वर्ष सरांनी इंग्रजी विषय शिकवला. त्यांची शिकवण्याची पध्दती भारीच. एरव्ही इंग्रजीचा तास तो ही धड्यांचा म्हंटला की तसा इतका काही आकर्षणाचा किंवा कुतुहलाचा नसायचा. पण सपकाळ सरांच्या तासाला पुस्तकातील अभ्यासासोबतच अन्य अनेक विषयांवर भरभरुन माहिती मिळायची. त्यांनी विविध धडे शिकवताना सांगितलेल्या अवांतर गोष्टी, मोहीमा, आंदोलनांच्या हकिकती यासर्वांमुळे त्या धड्यातील गद्य पाठ कायमचा मनावर कोरला गेला. वुड्स आर लव्हली डार्क ॲन्ड डीप, बट आय हॅव्ह प्रॉमिसेस टु कीप, बीफोर आय गो टु स्लीप, बीफोर आय गो टु स्लीप…या कवितेच्या ओळी दहावीत असताना वर्गात सरांकडुन ऐकलेल्या, त्या इतक्या खोलवर मनात खुप खोलवर कोरल्या गेल्या आहेत. तसेच चिपको आंदोलन, पश्चिमघाट बचाओ आंदोलन, सुप्याच्या शाळेत ते असताना त्यांनी त्या शाळेच्या परीसरात फुलवलेले नंदनवन, तेलच्या गुळवण्या, हे सगळे अजुनही नुकतेच शिकल्यासारखे, घडल्यासारखे वाटते.
एका धड्यातील एक वाक्य अजुनही मी विसरलो नाही. ते म्हणजे “वुई वर डिव्हाईडेड इन रोप्स”…एका हिमालयातील मोहीमेविषयीचा धडा होता तो. जिम कॉर्बेट काय होता , कोण होता हे त्यांच्या विलक्षण शिकवण्याच्या पध्दतीमुळे अजुनही लक्षात आहे. जिम कॉर्बेट जंगलात फिरत असताना त्याच्या हातापायांना काटे लागले त्या विषयीचे एक वाक्य अजुन ही लक्षात आहे ते म्हणजे “आय गॉट स्क्रॅचेस ऑन माय एल्बो ॲन्ड नीज”…
धडे शिकवणे असे नसायचेच त्यांचे. धड्यातील प्रसंग जसाच्या तसा विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभा करणे व त्या प्रसंगातुन, हळुच एखादे जीवनमुल्य , नकळत शिकवुन टाकणे ही सरांची खासियत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जे जे करणे असेल ते ते सर्व करायचे. पिरंगुटच्या आमच्या शाळेत पर्यावरण, जंगल, वने, निसर्ग हा एक नवीन अध्यायच सरांमुळे सुरु झाला. शाळेत कधी एखादे मोठे लेखक सरांच्या आमंत्रणामुळे यायचे तर कधी पर्यावरण मित्र यायचे. एकदा तर सरांनी सर्पमित्र आणि चक्क वीसेल सापच आणले. “दिसला साप की ठेचुन मार” असाच आम्हा सर्वांवरील संस्कार सरांनी आमच्या हातात अक्षरशः साप देऊन मोडुन काढला.
माझी दहावी जशी झाली, तसा सुट्ट्यांमध्ये सरांसोबत गड किल्ले फिरायला सुरुवात केली. सुरुवात केली म्हणने चुकीचे आहे खरेतर. सरांच्या प्रयत्नांमुळेच ट्रेकींगला सुरुवात झाली. दहावीचा निकाल लागेपर्यंत सरांसोबत तीन ट्रेक झाले होते. निकालानंतर ११ वी ला प्रवेश घेतला विज्ञान शाखेत. थोडा मोठा झालो असे वाटायला लागले होते.
एक दिवस मधल्या सुट्टीत माध्यमिक शाळेत, स्टाफ रुम मध्ये गेलो सरांना भेटायला. ठरवुन गेलो होतो की सरांना म्हणायचे की सुट्ट्यांमध्ये आपण जसे ट्रेक केले तसे आता करुयात. दोन मुक्कामांचे. सरांना एखादी सुट्टी घ्यायला लावायचीच व तीन दिवसांचा ट्रेक करायचा असा निश्चय करुन गेलो होतो.
सरांनी माझे सर्व ऐकुन घेतले व मला साफ नकार दिला.
नंतर कधीतरी या विषयावर पुन्हा त्यांच्याशी बोललो त्यावेळी त्यांनी सांगितले की ट्रेकिंग, गिर्यारोहण वगैरे आपली आवड आहे. आपण आपली आवड जोपासली पाहीजेच. पण शाळेत शिकवणे माझे कर्तव्य आहे. माझा पेशा आहे. त्यामुळे शिकविण्याशी तडजोड करुन छंद जोपासणे योग्य नाही.
सरांनी हे जे काही सांगितले ते देखील असेच एक मुल्य म्हणुन कायमचे मनात घर करुन राहीले. आपण जे काही काम करीत असु त्याच्याशी कसलीही तडजोड कधीही करता कामा नये.
एक शिक्षक विद्यार्थ्याच्या जीवनावर किती प्रभाव टाकु शकतो याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सपकाळ सर. १२ वी सुरु असतानाच मला हिमालयात गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणाला पाठविण्याची त्यांची तयारी सुरु होती. उत्तरकाशी च्या इंस्टीट्युट मधुन प्रवेश अर्ज मागवणे, त्यासाठी डीडी तयार करणे, माझ्या कडुन अर्ज भरुन घेणे, नंतर तो रजिस्टर पोस्टाने पाठवणे. आई वडीलांचा एकुलता एक, नवसाचा मुलगा असल्याने घरुन परवानगी साठी सर स्वःत माझ्या घरी आले व बाबुजींना या प्रशिक्षणाचे महत्व पटवुन दिले. हिमालयाती; प्रशिक्षणासाठी बरेच पैसे लागणार होते, बाबुजीनी काही सोय केली व सरांनी मला सुट्ट्यांमध्ह्ये काम करुन पैसे कमावण्याचा सल्ला दिला. १२ वीची परीक्षा झाल्यावर मी आपल्या भागातील प्रत्येक गावातील यात्रेत पानसुपारीचे दुकान लावले. त्यातुन देखील मी बरीच रक्कम कमावली व ते सर्व पैसे गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी, जाण्यायेण्यासाठी वापरले. आत्मनिर्भरतेचे जीवनमुल्य न कळत सरांनी माझ्यामध्ये रुजवले.
बर मी काही एकटा नाही बरका सरांचा विद्यार्थी की ज्याच्या जीवनावर सरांच्या उच्च जीवन मुल्यांचा प्रकाश पडला. माझ्या सारखे असंख्य विद्यार्थी सपकाळ सरांनी घडवले. व्यवसाय धंद्याने त्याअ विद्यार्थ्यांची ओळख नाहीये. सरांमुळे आमच्या माणुसपण जागे झाले. व्यक्ति म्हणुनच सर्वात आधी खुप चांगले असणे गरजेचे आहे. चांगले म्हणजे काय तर उच्च जीवन मुल्यांना जीवन जगताना प्रत्यक्ष आचरणात आणने. जीवनमुल्यांना जगणे व सतत दुस-यांना देखील ही जीवनमुल्ये जगण्यासाठी प्रेरीत करीत राहणे म्हणजे चांगुलपण होय.
शिक्षकदिनी फक्त सपकाळ सरांचीच आठवण आली असे नाहीये. अनेक शिक्षक होते, आहेत ज्यांनी माझ्या जीवनमुल्यांवर परीणाम केला आहे ते सर्व शिक्षक मला शिक्षकदिनीच नव्हे तर नेहमीच स्मरणात आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णांना मी पाहीले नाही, त्यांच्या विषयी फारसे वाचले ही नाही पण ते म्हणजे आदर्श शिक्षक कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे सपकाळ सर.
समाजामध्ये सकारात्मक बदल घडवुन आणणा-या या व अशा सर्व जीवन शिक्षकांना नम्र पणे नमस्कार !

– Hemant Wavle

109060cookie-checkमाझे शिक्षक
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.