140800cookie-checkचैत्रपालवी

चैत्रपालवी

‘चैत्रपालवी’ या पुस्तकाची नागपूर येथे छपाई होत असताना मी कोकणात समुद्रातील जीवसृष्टीचा अभ्यास आणि संशोधन करीत होतो. एके दिवशी मी रत्नागिरीत मुक्कामाला असताना दापोली येथे राहणारे माझे मित्र अनिश पटवर्धन यांचा फोन आला, की मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाचे श्री. वसंत केतकर तुमचा शोध घेत आहेत. त्यांनी नागपुरात तुमच्या घरी फोन केला होता. सु. ल. गद्रे मातोश्री साहित्यिक पुरस्कारासाठी यंदा तुमची निवड केली असल्याचे त्यांनी कळविले. तरी त्यांच्याशी त्वरित संपर्क साधा. मी त्यांना फोन केल्यावर त्यांनी पुरस्काराची वार्ता सांगितली. माझे अभिनंदन केले. तो आनंदाचा क्षण समुद्र किनाऱ्यावरील गाज ऐकत असता द्विगुणीत झाला. टाइम्स ऑफ इंडिया या जगप्रसिद्ध वृत्तपत्रात कोकणातील माझ्या संशोधनावर द ओल्ड मॅन अँड द सी हा अग्रलेख वाचण्यात आला तेव्हाही मी सागरमायेच्या सावलीत भटकत होतो. वाटलं, कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील अज्ञात प्रदेशात फिरत असता महाराष्ट्रातील रसिक वाचक आपणाला विसरले नाहीत तर !

माझ्या साहित्यावर प्रेम करणारा विशेष वाचक वर्ग आहे. तो जसा महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रात पसरला आहे तसाच तो परदेशात आहे. ही सारी निसर्गप्रेमी माणसं आहेत. त्यांच्यासाठी लेखन करायला मला नेहमीच आवडले आहे.

‘चैत्रपालवी’ हे माझं सोळावं पुस्तकपुष्प रसिक वाचकांना सादर करताना आनंद होतो.

कोकणचा अभ्यास दौरा संपवून मी नागपूरला परतलो. तो काही दिवसांनी केशव गोरे स्मारक ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र फाउण्डेशन मराठी साहित्य गौरव पुरस्कार मिळाल्याची वार्ता कळली. गेल्या अनेक वर्षांत निसर्ग साहित्याची निर्मिती करीत असता, मराठी साहित्यातील हिरव्या

वाटेने जात असता त्याची नोंद घेतली गेल्याचा आनंद अवर्णनीय होता. अरण्यातील चैत्रपालवी मोठी आनंददायी असते. त्या वेळच्या कोवळ्या पानापानांचा रंगबहार पाहून माणूस थक्क होतो. या चैत्रपालवीबरोबर बांबची वने आणि मुंडनथोराईच्या सदाहरित वनाचे वर्णन आहे. प्राणिजगतात हर्णुल दिवस, वानरे, सिंहमाकडाचे दर्शन, नीलगाय, चांदी अस्वल यांचा समावेश आहे. वाघ, माणसाचे नाते, वाघ आणि माणूस या लेखात आहे. बहिष्कृत मुकणा हत्तीचा स्वीकार आता रानटी हत्तीच्या कळपाने

केला आहे. वीरप्पन या हस्तिदंत तस्कराने दक्षिण भारतातील रानटी हत्तींची हत्या केली ती हस्तिदंताच्या लोभाने. आता हत्तीणी मुकणा हत्तींना जन्म देतात. कारण, तस्कर दात असलेल्या हत्तीची हत्या करतात. निसर्गनिरीक्षण एक तपश्चर्या आहे. त्यामुळे अरण्यवाचन आणि वनविद्या यातील फरक कळू लागतो. व्यंकटेश माडगूळकरांबरोबर एक दिवस डेड्रा खोऱ्यात भटकत होतो त्याचे वर्णन या लेखात आले आहे. सारिस्कातील वन्यप्राणी गणना या लेखात प्राण्यांची गणना कशी करतात याचा तपशील दिला आहे. अरेबियन नाईट्समधील सिंदबादचा रुख पक्षी माझ्या मनन-चिंतनाचा विषय आहे. एका दुर्गम खोल दरीत हस्तिदंताची खाण आहे. रुख पक्ष्याचा उपयोग करून तेथून सिंदबाद हस्तिदंत गोळा करीत असतो. एवढे हस्तिदंत या दरीत कोठून आले ? हत्ती जिथे खोऱ्यात आत्मसमर्पण करतात अशा स्थळांचं वर्णन सिंदबाद करीत असावा!

रसिक वाचक याही पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा.

– मारुती चितमपल्ली

102 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चैत्रपालवी”

Your email address will not be published.