सहोदर

साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक प्रयत्न ‘सहोदर’ या साहित्य समीक्षा ग्रंथामध्ये घेतलेला आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या ‘सहोदर’ या ग्रंथाचे नाव खूप बोलके आहे. या तीन साहित्यिकांची वाचक-अभ्यासकांच्या मनातील प्रतिमा कोणती आहे? तर, आरती प्रभु-ग्रेस आणि जी.ए. हे अज्ञाताचे स्वामी म्हणून नावाजलेले प्रतिभावंत या तीन निर्मात्यांच्या लेखनप्रेरणांमधील समानता शोधण्याचा प्रयास ‘सहोदर मध्ये केलेला आहे. या निर्मात्या त्रयींच्या निर्मितिशक्तीमागे कार्यरत असणाऱ्या समान प्रेरणांचा वेध घेण्याचा अखंड, अविरत प्रयत्न माधवी वैद्य सातत्याने करीत आहेत. निरंतर कालप्रवाहाशी जोडलेल्या मानवी जीवनाचा अर्थ लावणाऱ्या आरती प्रभु, ग्रेस, जी.ए. यांच्या साहित्यकृतींशी संवाद साधत त्यामागचे कृष्णविवर उकलण्याचा प्रयत्न माधवीताई पंचवीस-तीस वर्षे करीत आहेत. कुणा एका लेखकाची ‘मनबाधा’ लागल्याने त्याच्या साहित्यकृतींना पंचवीस-तीस वर्षे सतत छेडणे, हे एकवेळ समजू शकते. पण कालप्रवाही मानवी जगण्याला प्रतिभेच्या कक्षेत आणू पाहणाऱ्या तीन प्रतिभावंतांना पुन्हा पुन्हा समजून-उमजून घेण्यासाठी पंचवीस-तीस वर्षे झटणे, हे दचकण्यासारखे आणि चांगल्या अर्थाने भयानक वाटण्याजोगे आहे. त्यांच्या या अजोड साहसाचे मनःपूर्वक कौतुक तर केले पाहिजेच, पण त्याचबरोबर आदराने नमस्कारही केला पाहिजेच.

आरती प्रभूंचे समग्र लेखन हा माधवीताईंच्या पीएच.डी.च्या संशोधनाचा विषय आहे. आणि मग ग्रेस आणि जी.ए. हे दोन साहित्यिक त्यांच्या अभ्यासाचा, चिंतनाचा विषय झाल्याचे दिसते. आरती प्रभु, ग्रेस यांच्या काव्यनिर्मितीचा वेधक प्रयत्न माधवीताईंनी ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या त्यांच्या दृक्-श्राव्य माध्यमातील कार्य-कार्यक्रमांमधून घेतलेला आहे. माधवीताईंनी स्थापन केलेल्या ‘आर्या कम्युनिकेशन्स अँड व्हिडिओज’ या संस्थेच्या माध्यमातून ‘कवी शब्दांचे ईश्वर’ ही एक दृक्-श्राव्य मालिका रसिकांच्या भेटीला आलेली आहे. हा काळही मला इथे नमूद करावासा वाटतो. १९८० नंतरच्या म्हणजे आजच्या भाषेत बोलायचे झाले, तर ऐंशीच्या दशकात कवीच्या समग्र साहित्याचे अभिवाचन करण्याचा सृजनोत्सव माधवीताई तरुणाईसह ‘अनन्वय’ या त्यांच्या संस्थेतर्फे करीत आहेत. ज्या काळात ‘डिजिटल क्रांती’चा नामोल्लेख नव्हता, ‘कवितेचे अभिवाचन’ करणे, हे करिअर घडविण्याचे साधन होऊ शकते अशा काही शक्यता दिसत नव्हत्या, त्या काळात तरुण, उत्साही विद्यार्थ्यांना काव्यवाचनातून कवीच्या काव्याची वीण सजग जाणिवेतून उलगडून दाखविण्याचे काम माधवीताईंनी संहिता लेखनामधून केलेले आहे. हे सगळे इथे नमूद का करायचे बरे? लेखकाचे कौतुक करण्यासाठी, की प्रस्तावना गोड होण्यासाठी? या साऱ्याच प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच असणार.

‘सहोदर’ या आरती – प्रभु – ग्रेस जी.ए. या साहित्य अनुजांच्या निर्माणक्षमतेतून आणखी नवीन, अपूर्वाईची चीज निर्माण करण्याचा हा वेगळा प्रयत्न आहे. या तीन साहित्यिकांच्या साहित्यकृतींची चिकित्सा करणे, त्यांचे मूल्यमापन करणे ही ‘सहोदर’ ची निर्मितिरेखा नाही. आरती प्रभु-ग्रेस आणि जी.ए. यांच्या परस्पर प्रभावी, परस्पर प्रेरक, परस्पर पोषक निर्मितितत्त्वांचा शोध आणि वेध घेणे, ही ‘सहोदर’ ची लेखन प्रेरणा आहे. पूर्ण झालेल्या साहित्यकृतीचे नव्याने अवलोकन करून नवा निर्मितिबंध प्रस्थापित करणे, ही ‘सहोदर ‘ची बीजभूमी आहे. निर्मितीचा अनुबंध शोधणारी सृजनशील निर्मात्याची प्रेरक दृष्टी ‘सहोदर’च्या मुळांशी जोडलेली आहे. लेखक-साहित्यकृती-कलावंताची दृष्टी लाभलेल्या अभ्यासक माधवीताई यांच्या दृष्टादृष्ट भेटीमधून ‘सहोदर’ ची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच ‘सहोदर’ हे नावही सृजनवेधातून घडलेल्या सृजनाशी लगटलेले भावस्पर्शी भावव्यंजक नाम आहे. ‘सहोदर’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील उपशीर्षकाचा उल्लेखही इथे करावाच लागेल. ‘जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभु), ग्रेस यांच्या प्रकृतिसाधर्म्यावर आधारित असे उपशीर्षक आहे. या तीन साहित्यिकांच्या लेखन प्रकृतीचा, वाङ्मयीन व्यक्तित्वाचा समानधर्म शोधणे, हा सृजनवेध आहे. नवनिर्माणक दृष्टीने पूर्ण झालेल्या कलाकृतींचा अभ्यास करणे आणि त्याचा सृजनशील अनुबंध मांडणे, अशी सहोदरच्या लेखनाची जातकुळी आहे.

जी.ए., आरती प्रभु, ग्रेस यांच्या साहित्यकृतींची मोहमाया झपाटून टाकते. भुरळ पाडते, वेढून उरते. या तीन साहित्यिकांच्या लेखन-गारुडातून बाहेर पडणे, हीच मोठी परीक्षा असते. माधवीताई या प्रथमदर्शनी निर्माण होणाऱ्या आसक्त लेखन गारुडातून मुक्त होऊन त्या पलीकडे दिसणारा, जाणवणारा कवीचा / लेखकाचा पिंडधर्म, त्याची वैशिष्ट्यपूर्णता कोणती यांचा शोध घेतात. आणि मग त्यानंतर ‘समान शीले व्यसनेषु सख्यम् ।’ या न्यायाने या तीन निर्मात्यांची पुनःस्थापना केली जाते. या तीन लेखकांचा वाङ्मयीन व्यक्तित्वातील जनुकांचा शोध घेऊन त्यांची नव्याने जोडणी करणे, असे दोन स्तरांवरचे हे काम आहे. साहित्यकृतींच्या विश्लेषणातून, लेखनातील वैशिष्ट्यपूर्ण घटक बाजूला काढणे, त्यांचे वर्गीकरण करणे आणि त्यांचे संश्लेषण करणे म्हणजे त्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांची पुन्हा नव्याने जोडणी करणे, रचना करणे अशी ‘सहोदर’ या पुस्तकाची ठेवण आहे आणि म्हणूनच ‘सहोदर’ हा ग्रंथ जी.ए., आरती प्रभु, ग्रेस यांच्या साहित्याची सृजनवेधी समीक्षा आहे.

‘सहोदर’ला आस्वादक समीक्षा म्हणता येणार नाही. ती आस्वादक समीक्षा नाही. कारण साहित्यकृतीच्या आस्वादनातील संस्कारक्षम जागांची, स्मरणठशांची मांडणी आस्वादक समीक्षेत केलेली असते. अशा केवळ संस्कारक्षम ठशांची नोंद ‘सहोदर’ मध्ये जी.ए., आरती प्रभु, ग्रेस यांच्या साहित्यकृतींमधील परस्पर सहसंबंधांचा नव्याने शोध घेतलेला आहे. या अर्थाने ती आंतरसंहितात्मक समीक्षा आहे. एका साहित्यसंहितेतून दुसरी नवी साहित्यसंहितेची निर्मिती होणे, या अर्थानेही ‘सहोदर’ ही आंतरसंहितात्मक समीक्षा आहे. ही आंतरसंहिता निर्माण करण्यासाठी निर्माणकर्त्याचा पिंड सृजनवेधी असणे गरजेचे आहे.

माधवीताईंचा पिंड अथवा प्रकृतिधर्म हा सृजनशील कलावंताचा पिंडधर्म आहे. त्या स्वतः उत्तम नाट्यकलावंत, चित्रकार, गायक, परफॉर्मिंग आर्टिस्ट आहेत. जात्याच कलावंत असलेला लेखक जेव्हा साहित्यसमीक्षेच्या प्रांतात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या व्यक्तित्वाचा कल आणि तोलही निर्माणक्षम होतो… ती त्याच्या निर्माणक्षम व्यक्तित्वाची आंतरिक खेच असते, आंतरिक आकर्षण असते. आणि निर्माणक्षम असणे आणि होणे, ही सृजनशील कलावंताच्या व्यक्तित्वाची आंतरिक प्रेरक शक्ती असते. ‘कवी शब्दांचे ईश्वर’ची निर्मिती हा त्याचा दृश्य आविष्कार आहे. तर, ‘सहोदर’ हा निर्माणशक्तीचा शब्द आविष्कार आहे. म्हणून ‘सहोदर’ ही आंतरसंहितात्मक समीक्षा आहे. संहितांमधून संहितेची निर्मिती, असा तिचा सृजनवेधी प्रवास आहे.

‘सहोदर’ या संकल्पनेची मांडणी पुस्तकाच्या प्रारंभी केलेली आहे. ही मांडणी म्हणजे निर्मितीची बीजपेरणी आहे. या तिघाही लेखकांच्या कलाकृतींचा उगम, जन्म निर्मितीच्या एकाच गर्भगृहातून झाला आहे. या तिघांच्याही लेखनात काही सूत्रे समान आहेत. या अर्थाने ‘सहोदर’ ही संकल्पना योजिली असल्याचे नमूद केले आहे. परंतु ‘सहोदर’ ही संकल्पना कवी ग्रेस यांची आहे, हे नमूद करीत माधवीताई ग्रेसना अभिप्रेत असलेली ‘सहोदर’ ही संकल्पना त्यांच्याच अवतरणातून स्पष्ट करतात. “जीवन, घटना, आठवणी, व्यक्ती, वस्तू, चिन्हे वा प्रतिमा यांच्या बरोबरच कविता मला छेदून, भेदून जात असतात. या छेदून, भेदून जाणाऱ्या काही विवक्षित कवितांच्या निर्मात्यांना मी माझे सहोदर समजतो. हे माझे सहोदर माझ्या भूतकाळात, कुठेही सापडू शकतात. ‘एमिली ब्रांटे मला माझी सहोदर वाटते. करुणाष्टकाचा उद्गाता रामदास मला माझा सहोदर वाटतो. एमिली डिकिन्सन ही मला माझी सहोदर वाटते. आरती प्रभु, दौलतराव गोळे, तुकाराम अंबिले, श्री. कुलकर्णी (ज्ञानेश्वर) हे माझे आवडते कवी, माझे सहोदर आहेत” असा उल्लेखही ते करतात.

“माझ्या निर्मितिशील कृती प्रवृत्तींना छेडून जाणाऱ्या व समांतर जाणाऱ्या वाङ्मयपिंडातून त्यांच्या निर्मितीतून संक्रांत होणाऱ्या लहरी पकडण्याची माझी अंत:स्थ प्रक्रिया नेहमीच कार्यशील असते…. (या सहोदरांचे) आघात, संधान कधीकधी वाद्यवृंदाच्या अमिट लहरींप्रमाणे माझ्या मनोभूमीत निनादत असतात. या वृत्तीचे काव्यावतरण होते. ”

कवी ग्रेस यांनी ‘सहोदर’ या संकल्पनेतून त्यांची निर्माणक प्रेरणास्थाने आणि त्यातून दीप्तीमान होणारी नवनिर्मिती स्पष्ट केली आहे. रवींद्रनाथ टागोरांचे गीतांजलीतले काव्य, रिल्के, रामदासस्वामी, ज्ञानोबा-तुकोबा, उल्मन लिव्ह ही अभिनेत्री, रॉबर्ट फ्रॉस्ट, ग्रेस यांची आई, जी.ए., आरती प्रभु हे सारे सृजनशील कलावंत म्हणजे ग्रेस यांचा ‘चंद्रमाधवीचा प्रदेश’ आहे. या कलावंतांच्या निर्मितीची सुरावट ग्रेस यांना सृजनोत्सुक करते. काव्यनिर्मितीच्या उन्मन अवस्थेकडे खेचणाऱ्या या सहोदरांना ग्रेस यांच्या भावविश्वात खास स्थान आहे. जी.ए., ग्रेस, आरती प्रभु हे तीनही निर्माते परस्परांचे आत्मज सहचर होते, याची खोल जाण या तीनही आत्मनिष्ठ साहित्यिकांना होती. जी.ए. आणि ग्रेस यांची खास, अनोखी ‘पत्रमैत्री’ होती. शब्दांना ओलांडून जाणारी निःशब्द आणि विश्रब्ध अवस्था व्यक्त करणारे, जपणारे हे तीन कलावंत, एरवी व्यवहाराच्या जनरीतीपासून माणसांच्या कल्लोळापासून दूर राहिले. जनांच्या           कोलाहलापासून आपले निर्माणक आत्मनिष्ठ विश्व कसोशीने जपणे, ही या तीनही साहित्यिकांची खास जीवनरीत होती.

या तीनही काव्यमुहृदांना परस्परांबद्दल नैतिक, शालीन आदर होता. आत्मनिष्ठ जगण्यातून व्यक्त होणारी प्रखर नैतिकता या तीनही सौमित्रांनी आयुष्यभर जपली. याचा निर्देश माधवीताईंनी केलेला आहेच. जी.ए. आणि ग्रेस या दोघांची मने एकमेकांना इतकी आदरपूर्वक जपत होती, की आपल्या मनातील भावपूर्ण मैत्रीला, त्या भावपूर्ण सौहार्दाला कोणत्याही कारणाने तडा जाऊ नये, त्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून त्यांनी आपण ठरवलेली भेटही अखेर रद्द केली. हे मैत्रीचे अनोखे स्नेहबंध कलावंताच्या नजाकतीने, रसिकतेने आणि आत्मनिर्भर काव्यवृत्तीने टिपण्याचे काम माधवी वैद्य यांच्या लेखणीने केलेले आहे. इथे मला कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या बा.सी. मर्ढेकर यांच्याशी संवाद साधणाऱ्या कवितेची आठवण होते. आणि त्याहीपेक्षा खूप खूप आठवते ती विंदांची सुप्रसिद्ध कविता, विल्यम शेक्सपिअर आणि मराठमोळ्या तुकोबांच्या काव्यगत भेटीवर आधारित कविता. माधवी वैद्य यांचा ‘सहोदर’ हा ग्रंथ म्हणजे काव्यमनोगतांची गात्रे कान लावून ऐकण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. समुद्राच्या लाटांचा दूरवर येणारा आवाज म्हणजे गाज. ‘सहोदर’ मध्ये जी.ए., आरती प्रभु, आणि ग्रेस यांनी ऐकलेली परस्पर संवादी काव्यनिर्माणक्षम ‘गाज’ पानोपानी ऐकू येते. म्हणूनच यापुढे माधवीताईंनी या तीन सहोदरांच्या भेटीवर आधारित स्वतंत्र काव्यनाट्य रचले, तर मला मुळीच आश्चर्य वाटणार  नाही. आरती प्रभु हा त्यांचा केवळ अभ्यासाचा किंवा संशोधनाचा विषय नाही. तो त्यांचा ‘ध्यासविषय’ आहे. ध्यासाकडेही तटस्थ वृत्तीने पाहण्याची खास नजर त्यांच्यापाशी असल्यामुळे माधवीताई ध्यास विषयाला प्रेमाचा हळवा विषय होऊ देत नाहीत. बाईपाशी असलेल्या रोकड्या व्यवहारी दृष्टीचा तो एक भाग आहे. आपले मूल कितीही प्रिय असले, तरी आई त्याच्या जगण्याकडे, त्याच्या वाढत्या वयाकडे ‘जगाच्या डोळ्यांनी’ पाहायला विसरत नाही. म्हणून प्रत्येक आई मुलासाठी कठोर ‘सरन्यायाधीश’ असते. माधवीताई या सहोदरांकडे रोकड्या वत्सल नजरेने पाहतात. आरती प्रभु (चिं.त्र्यं. खानोलकर), ग्रेस, (माणिक गोडघाटे) आणि जी.ए. (गुरुनाथ आबाजी कुलकर्णी) या तिघांमधील सारखेपणा म्हणजे त्यांनी साहित्यलेखनासाठी टोपणनाव धारण केले. त्यामागचे कारण काय असावे, याचा भाष्यासह घेतलेला शोध ‘सहोदर’ मध्ये आलेला आहे. आपले वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मयीन ‘व्यक्तित्व’ कसोशीने जपणे, त्या मागची आत्मनिष्ठा आणि पुरे जाणतो मीच माझे बळ’ याची आत्मप्रत्ययी जाण या साऱ्या गुणांची एकवट म्हणजे या सहोदरची टोपणनावे आहेत.

माधवीताई या तीन साहित्यिकांनी टोपणनावे धारण करण्यामागची कारणे शोधतात. त्या संदर्भात झालेला पत्रव्यवहार, अभ्यासकांनी मांडलेली मते, दस्तूरखुद्द लेखकाने दिलेली कारणे या साऱ्यांची साधार चर्चा करतात. पण त्याच वेळी या साहित्यिकांना झालेली स्वतःची ओळख, लेखक/कवी म्हणून घडत जाण्याचा त्यांचा लेखनप्रवास यांचा एकत्र विचार केलेला आहे. त्यामुळे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आकार येण्याचा लौकिक जगण्यासह झालेला प्रवास टोपणनावाच्या शोधनातून उलगडत जातो. म्हणून या पुस्तकाला आंतरसंहितात्मक समीक्षा असे म्हणता येते. या पुस्तकामध्ये लेखक / कवींनी मांडलेले विचार त्यांच्याच अवतरणांमधून जसेच्या तसे दिलेले आहेत. आता या अवतरणांचा विचार वाचकाने करावयाचा आहे आणि त्याची संगती लावण्याचे अन्वयार्थ लावण्याचे कामही वाचकानेच करावयाचे आहे, म्हणजे जी.ए.-ग्रेस आरती प्रभु ‘सहोदर’ आहेत किंवा नाहीत, हे ठरविण्याचे स्वातंत्र्य वाचकाला आहेच. लेखिका तिची मते, तिचा दृष्टिकोन अभ्यासकावर लादत नाही. वाचकाला त्याच्या जबाबदारीवर अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळे प्रत्येक वाचकाची ‘सहोदर’ची आंतरसंहिता त्याच्या अवलोकनातून स्वतंत्रपणे घडत जाण्याची नवी शक्यता निर्माण होते. या अर्थानेही मला ‘सहोदर’ ही जी.ए.- आरती प्रभु-ग्रेस यांच्या वाङ्मयीन व्यक्तित्व शोधाची आंतरसंहितात्मक संहिता आहे, असे वाटते.

विजनवास हा या तीनही सहोदरांचा खास वारसा आहे. काव्यतंद्रीत जगण्याचे, निर्माणकाची धग साहण्याचे निर्मितीच्या क्षितिज दर्शनाने विद्ध व्याकूळ होण्याचे ‘एकट साहस’ या तीनही साहित्यिकांनी नैतिकतेने जपले. ‘आपुलाची वाद आपणासी’ हे आत्मसंघर्षाचे असिधारा व्रत जपणाऱ्या निर्मात्याबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात उत्सुकता, भीती क्वचित रागही असतो. या तीनही सहोदरांचा लोकांताकडून एकांताकडे झालेला प्रवास समजून घेताना लेखिका माधवी वैद्य निर्मात्या कलावंतांना जनांच्या कोलाहलापासून दूर जावेसे का वाटते? त्याची भावनिक मानसिक-आत्मिक गरज वेगळी असते. आत्मचिंतनाच्या, आत्मसोबतीच्या गरजांमधून एकटे असावे असे वाटणे भोवतीचा समाज, आप्त, मायेची माणसेही समजून घेऊ शकत नाही. त्यातही परत स्त्री-पुरुष असण्याला वेगवेगळी किंमत आणि चवही आहे. माधवीताईंनी उलगडलेल्या सहोदरांच्या विजनवासाच्या कोड्यामुळे वाचक स्वतःशी एकटा –   निवांत होऊन विचार करू लागतो. स्वतःशी स्वतःबरोबर शांतपणे असणे, ही कलावंताची खूप तीव्र आणि मोठी मागणी असेल. पण प्रत्येक माणसाला त्याचा खाजगी आत्मकोष हवा असतोच. तो असणे ही एक गरज असते, याची जाणीव ‘सहोदर ‘तील अनेक अवतरणांमधून होते. एकटेपणा आणि एकाकी असणे या दोन भिन्न अगदी निराळ्या धारणा आहेत. एकाकीपणात तुटलेपणाची जाणीव असते. एकटेपणात स्वतःची स्वतंत्र ओळख असण्याची होण्याची सुप्त शक्यता दडलेली असते. एकटेपणात स्वतःची निरामय सोबत अनुभवण्याची नितांत गरज आणि त्यातून मिळणारा आनंद सामावलेला असतो. हा फरक लक्षात घेतला, की मग भारतीय परंपरेतील गौतम बुद्धाचे शाश्वत सत्य शोधनातील एकटेपण, ताटी लावून बसलेल्या ज्ञानदेवांचे संत होण्याच्या प्रवासातील एकटेपण, काबाडकष्ट करणाऱ्या जनीचे जगावेगळे होऊन विठूची सोबत अनुभवणारे एकटेपण यांची नेमकी, स्पष्ट ओळख पटते. ग्रेसची काव्यतंद्री, जी.एं. नी नेकीने जपलेला अज्ञातवास आणि आरती प्रभूंची लेखन प्रबळ आत्मतल्लीनता हे केवळ प्रसिद्धीचे वलय नव्हते. अथवा लेखक आहोत, कवी आहोत म्हणून त्यांनी घेतलेली विशेष सवलत अथवा चैनही नव्हती. ‘मी माझे मोहीत राहिले निवांत’ असे म्हणणाऱ्या ज्ञानदेवांशी आणि कलावंताच्या व्याकूळतेसाठी ‘लाही’ या संपूर्णपणे नव्या शब्दाची निर्मिती करणाऱ्या तुकोबांशी सांस्कृतिक नाळ जोडलेल्या सहोदरांचे एकटेपण हे खास भारतीय परंपरेतले एकटेपण आहे. पाश्चात्त्य साहित्यविश्वातील लेखक कवींचा विजनवास आत्मरत असण्याशी, होण्याशी जोडलेला आहे. जी.ए., ग्रेस, आरती प्रभु, आत्मतल्लीनतेला एकांतवास अनुभवत होते. तो स्वतः ‘सह’ असण्याचा एकटेपणा होता. याची जाणीव सहोदरच्या निमित्ताने होते.

या सहोदरांचे साहित्यलेखनाशी असलेले नाते नेमक कसे होते, यावर माधवीताईंनी केलेले भाष्य खूप अर्थपूर्ण आहे. जमीन नांगरण्याच्या फाळाला जशी भूमिकन्या सीता अचानक गवसावी तद्वत त्यांची स्वयंभू कविता. तीच त्यांची खरी निज ओळख, त्यांची अस्मिता, श्रद्धा सारे काही. या तीन सहोदरांची जीवनदृष्टी आणि वाङ्मयीन दृष्टी यांचा संमेळ या एका अवतरणामध्ये झालेला आहे. माधवीताईंना उमजलेले सहोदरांचे भावबंधही या अवतरणातून स्पष्ट होतात.

‘सहोदर’ ही Texts within text आहे. अनेक साहित्यकृतींच्या संहितांच्या संवादांमधून निर्माण झालेली आंतरसंहिता आहे, त्याला आपण संवाद संवादी संहिता असेही म्हणू शकतो. त्याचप्रमाणे, संवादनिष्ठ कथनसंहिता असेही म्हणता येईल. जी.ए.-ग्रेस-आरती प्रभु यांच्या साहित्यकृतींमधून स्पष्ट होणाऱ्या जीवनमूल्यांचा एकमेकांशी झालेला संवाद आणि त्याचे निवेदन अथवा कथन करणे अशा प्रकारची संवादनिष्ठ कथनसंहिता, असे या समिक्षेचे स्वरूप आहे. या तीन सहोदरांच्या जीवनमूल्यांचे निरीक्षण परस्परांच्या छाया-प्रकाशात केल्यास हाती लागणारे संचित या पुस्तकाद्वारे मांडलेले आहे. त्यामुळे संदर्भनिष्ठ संवादाचे स्वतंत्र प्रारूप (मॉडेल) रचण्याची एक नवी शक्यता ‘सहोदर’च्या माध्यमातून व्यक्त होते आणि त्यापासून प्रेरणा घेऊन अधिक नवे काहीतरी घडू शकते.

 

या तीन सहोदरांच्या साहित्यकृतींमधून व्यक्त होणारी समान जीवनमूल्ये शोधण्याचे महत्त्वाचे काम आहे आणि ते लेखिकेने अतिशय काळजीपूर्वक केलेले आहे. बाटिक शैलीत चित्रकला करणाऱ्या माधवीताईंनी शब्द माध्यमातून व्यक्त होताना निरीक्षण, समतोल आणि वळण-वाटांची पुरेपूर दक्षता घेतलेली आहे. ‘दुःख’, ‘नियती’, ‘वासना’, ‘पाप-पुण्य’ या चार जीवनमूल्यांच्या प्रकाशात सहोदरचे जिव्हार जाणून घेण्याचा आणि त्यांचे मर्मबंध उलगडून दाखविण्याचा प्रयत्न माधवीताई करतात. या तीनही निर्मात्यांची लेखनातील व्यथा कोणती आहे? असा प्रश्न कोणी विचारल्यास त्याचे दुःख सापडेना हाती’ ही (माणसांच्या) जगण्याची व्यथा आहे. या निर्मात्यांची तीच लेखन-व्यथा आहे. ‘दुःख सापडेना हाती’ असे कवी ग्रेस यांना का वाटते? त्याची ओळख त्यांच्या कवितेमधून होते. डोळ्यांतील बाहुली

 

कशी दिसते दृष्टीला?

झाडाझाडांत पाचोळा

कुरवाळितो फुलाला

डोळियातली बाहुली

मागेपुढे लळामेळा;

तिथे वेचतो पाचोळा

फुलझाडांचा सोहळा…

दुःख सापडेना हाती असे जी.एं. ना का वाटते, याचे विवेचन ‘जी.एं. ची निवडक पत्रे’ (खंड ५) मध्ये आलेले आहेच.

“आपला आनंद सर्वार्थांनी दुसऱ्यापुढे ठेवता येत नाही, दुःख सर्व उत्कटतेने दुसऱ्याला स्पष्ट करता येत नाही. त्यामुळे कलावंताचा प्रवास एकाकीच असतो. आणि एवढे झाल्यावर मृत्यूचा तर अत्यंत एकाकी क्षण! एवढ्या प्रवासात आपण काय मिळवले हेदेखील स्वतः आपल्यालाच न देणारा तो सण! कारण आपण एवढे पाहिले हे उमगायला जाणीव हवी. आणि जाणीव आहे तोपर्यंत प्रवास संपलेला नसतो. जाणीव संपली की मग सारेच संपले. सगळा हिशेब संपतो. पण तो हिशेब काय झाला हे समजण्याचेदेखील समाधान लाभत नाही.

‘दुःख सापडेना हाती’ ही आरती प्रभूंच्या कवितेतील एक ओळ आहे. यामागचे कारण म्हणा किंवा प्रेरणा म्हणू त्यांनी कवितेमधूनच स्पष्ट केलेली आहे. त्या इथे उद्धृत करते.

 

गोड गडे आरंभाचा श्रीगणेशाय इवला

अंतपास अज्ञ आहो पंतोजीचा नाही डोळा

सुटकेचा नको श्वास, नको आताच सोडूस

आहे अजून पांगळा, तुझा माझा गर्भवास

या तीनही सहोदरांच्या लेखनात माणूस जगत असतो. जगताना प्रेयस मिळविण्यासाठी धडपडत असतो. क्वचित काहींना प्रेयसाहून श्रेष्ठ, उच्च अशा श्रेयसाची ओढ लागते. श्रेयसाच्या मागे वेड्यासारखे उरी-पोटी धावणे, हेच त्याचे जगणे होते. असे असले तरीही माणूस ‘अंतापास’ अखेरच्या क्षणीही अज्ञच असतो. जगण्याचे अर्थ त्याला उलगडत नाही. जगताना ज्याला महत्त्व दिले, ज्याला जगण्याचे प्रयोजन मानले त्यातले हाती काय आणि किती आले! मागे किती उरले? किती आणि काय काय सरले! या प्रश्नांची नीट, स्पष्ट उत्तरे मिळतच नाही. कारण माणसाचे जगणे जैविक भ्रमाशी बांधलेले आहे. बालपण किशोरवय-तारुण्य-प्रौढत्व- वार्धक्य या शरीराच्या अवस्थांशी माणसाचे जगणे बांधलेले आहे. त्याचप्रमाणे त्याचे जगणे विशिष्ट काळाशी किंवा काळाच्या एका स्वतंत्र, सुट्या तुकड्याशी जोडलेले आहे. परंतु उत्पत्ती-स्थिती-लय तत्त्वांशी संबंधित कालप्रवाह अनंत आणि निरंतर आहे. सतत प्रवाहित होणे, गतिमान असणे हा कालचक्राचा गुणधर्म आहे. कालचक्राच्या गतीचा, दिशेचा, मार्गक्रमणाचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूनही त्याचे ज्ञान आणि भानही मानवी बुद्धीच्या कल्पनाशक्तीच्या कक्षेत आलेले नाही. जी.ए., ग्रेस, आरती प्रभु विशिष्ट काळाशी आणि जैविक अवस्थांशी बांधलेल्या माणसाच्या जगण्याला कालप्रवाहाच्या वाहत्या धारेत सोडून देतात. आणि मग प्रवाही कालतत्त्वाची माणसाला येणारी अर्धीमुर्धी जाण कधी आणि कशी येते. अवस्थांतरणाची चित्रे रेखाटतात.

कालप्रवाहाला जाणून घेण्यासाठी झगडणारे, अस्वस्थ होणारे, एकटे होणारे, अपुरे पडणारे हे

तीन ‘सहोदर’! कालप्रवाहाच्या जाणिवेने दुभंगतात, स्वतःपासून, आप्त समाज या साऱ्यांपासून दूर होतात, तुटतात. तुटलेपणाचे दुःख साहतात. कालप्रवाहाच्या वाहत्या – निरंतर असण्यातून चिमूटभर ज्ञान तरी आपल्याला लाभले का? याचे उत्तर असमाधानकारकच असणार! हे माहीत असूनही मनोमन तुटणारे, आतल्या आत तुटण्याचीच व्यथा आणि कथा ललित साहित्यातून मांडणारे हे ‘सहोदर’ अज्ञाताचे स्वामी होतात. अनेकदा गूढयात्री होऊन दुर्बोधतेचे लेणे धारण केलेले निर्माते कलावंत होतात. विराट कालप्रवाहाला मानवी समजशक्तीच्या कक्षेत आणताना समजणाऱ्या जगण्याचे माणसांचे रंग-रूप रेखाटताना त्यांची भाषा जाणिवांची लाट खेळविणारी शब्दांच्या मागे-पुढे पार पलीकडे अर्थाच्याही पार पलीकडे दिगंताला स्पर्श करीत जाते.

दिगंतापार जाणाऱ्या सहोदरांच्या भाषेचा स्वतंत्र, वेगळा विचार या पुस्तकामध्ये केलेला आहे. अनंत, अविनाशी कालप्रवाहाचा अर्थ लावताना जाणविणारी माणसाच्या बुद्धीची मर्यादा या सहोदरांना पुनःपुन्हा विचार करावयास लावते. कालचक्राचे भान, जाणीव होते, तेव्हा माणसाला त्याचे अंदाज, त्याचे समज तोकडे पडले. मानवी जगण्याच्या शक्यतांना निर्मम होऊन तुडवित झिडकारत पुढे जाणाऱ्या कालचक्रापुढे माणूस नगण्य, अपूर्णच आहे. याची जाणीव ‘सहोदर’नी घडविलेल्या भाषेमधून, वर्णनामधून, प्रतिमांमधून होते. आरती प्रभु, ग्रेस यांची भाषा शब्दांच्या धुक्यामध्ये, भुयारांमध्ये आणि निर्मळ दवबिंदूपाशी घेऊन जाते. जी.ए. कथाकार असल्याने निवेदनाच्या वर्णनाच्या, भाष्याच्या एका वाक्यामधूनही अमर्याद, गतिमान कालप्रवाहाच्या दर्शनाने विंधणाऱ्या, तुटणाऱ्या माणसाच्या समजुतींची चित्रे रेखाटली जातात. ‘सहोदर’चा आंतरसंहितात्मक समीक्षेतून निर्माण झालेल्या स्वतंत्र संहितेच्या निमित्ताने हे पुन्हा नव्याने समजते.

डॉ. रूपाली शिंदे

मराठी विभाग,

फर्ग्युसन महाविद्यालय ,  पुणे

पुस्तक : सहोदर
लेखक : डॉ. माधवी वैद्य
प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन
पाने : ३४४
किंमत : ३८० रुपये

 

हे पुस्तक ‘ग्रंथप्रेमी.कॉम’ वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

https://granthpremi.com/product/sahodar

146320cookie-checkसहोदर
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.