काळू-बाळूची कहाणी – तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे

WhatsApp Image 2022-01-13 at 3.29.58 PM

काळू-बाळूची कहाणी हे प्रकरण “तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे” या रवींद्र देसाई यांच्या पुस्तकातून
काळू-बाळूची कहाणी
काळू आणि बाळू हे दोन मित्र होते. तालुक्याच्या गावात राहत होते. दोघेही शाळेत बरोबर जायचे. कॉलेजमध्ये बरोबर जायचे. नोकरीलाही दोघे एकाच वेळी लागले. कामाच्या जागा वेगवेगळ्या होत्या पण दोघांचा हुद्दा आणि पगार मात्र तसा सारखाच होता. दोघेही तसे विचारी होते. छानछोकीची दोघांनाही फारशी ओढ नव्हती. शिवाय त्या छोट्याशा गावात हॉटेल, सिनेमा अशा बाबीही मर्यादितच असल्याने आणि हो, दोघांचीही अजून लग्ने (प्रत्येकी एकच हं) न झाल्याने, वर्षा-दीड वर्षांतच दोघांचेही आठ-दहा हजार रुपये बँकेत शिल्लक पडले होते. दोघेही ग्रामीण भागातले असल्याने, त्या पैशांतून दोघेही एकेक म्हैस खरेदी करायचे ठरवीत होते.
फुले फुलल्याचा मधमाशांना एक वेळ उशिरा पत्ता लागेल, पण कोणाकडे आणि किती पैसे आहेत, याचा सुगावा धूर्त माणसांना लगेच लागतो, तसा त्यांच्याकडे पैसे असल्याचा गावातील एका मेकॅनिकला पत्ता लागला आणि त्याने दोघांनाही एकेकटे गाठले.
फायदेशीर सौदा
तो आधी काळूला भेटला आणि म्हणाला, “माझ्याकडे एका अडलेल्या माणसाची मोटारसायकल आहे. तो पंधरा हजार म्हणतो आहे; पण तो इतका नडलेला आहे की आपण थोडे ताणून धरले तर तेरा-साडेतेरा हजारालाही तो नक्कीच गाडी देईल.”
काळू म्हणाला, “एक तर मला गाडीची तशी काहीच गरज नाही. दुसरे म्हणजे माझ्याकडे तेरा हजार रुपयेही नाहीत आणि तिसरे म्हणजे जे काही आठ-दहा हजार आहेत, त्यांची मी म्हैस घ्यायचे ठरवले आहे.”
मेकॅनिकला काळूच्या म्हशीशी काहीच देणे-घेणे नव्हते. गाडी विकून त्याला गाडीचा मूळ मालक आणि ती गाडी घेणारे गिऱ्हाईक अशा दोघांकडूनही कमिशन मिळवायचे होते; त्यामुळे आपले सारे विक्री-कौशल्य पणाला लावून तो म्हणाला, “काळूभाऊ, तू विचार करून पाहा. आपल्या गावात तू गाडीवरून फिरायला लागलास की, तुझा रुबाब किती वाढेल! उद्या काही दिवसांनी तुझे लग्न झाले की, बायकापोरांनाही कसा टेचात गाडीवरून हिंडवून आणू शकशील. काय दोन-तीन हजार कमी पडत असतील, ते आपण सावकाराकडून घेऊ आणि चार-सहा महिन्यांत फेडून टाकू. तू ही गाडी घेच गड्या. एकदम फायद्याचा सौदा आहे हा!”
तरी काळू नेटाने म्हणाला, “माझ्या लग्नाला अजून दोन-चार वर्षे तरी अवकाश आहे. शिवाय तसा मला गाडीचा तूर्तास खास काही उपयोगही नाही. वर अकारणच सावकाराचे व्याज भरायची तर माझी मुळीच तयारी नाही; त्यामुळे गाडीऐवजी मी तरी म्हैसच घेणे पसंत करीन.”
कमिशन मिळण्याची हाता-तोंडाशी आलेली संधी गमावणे, मेकॅनिकला परवडण्याजोगे नव्हते. त्याने आता वाकडा फासा टाकला. तो म्हणाला, “काळूराम, अरे, जरा विचार तर करून पाहा, उद्या कामावर जायला एखाद दिवशी उशीर झाला म्हणून तू जर म्हशीवर बसून कामाला गेलास तर किती खुळचटाजोगे दिसेल?”
कोणता वेडगळपणा चांगला ? हा की तो?
पण ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी! काळू म्हणाला, “तुझे म्हणणे अगदी खरे आहे, पण म्हशीऐवजी मी दररोज मोटारसायकलची धार काढायला बसलो, तर ते जास्तच वेडगळपणाचे दिसेल, नाही का ?’
आपली डाळ येथे शिजत नाही याची खात्री झाल्यावर त्या मेकॅनिकने बाळूला गाठले. बाळूला मात्र मेकॅनिकचे म्हणणे तंतोतंत पटले. पैसे नुसतेच मिळवून काय फायदा? माणसाने कसे चैनीत राहिले पाहिजे. रुबाबात हिंडले पाहिजे. त्याने सावकाराकडून चार हजार व्याजाने घेऊन व्यवहार पुरा केला. इकडे काळूने स्वतः जवळ जमलेल्या पैशातून म्हैसही खरेदी केली.
बाळूला मनाजोगी गाडी मिळाली. काळूला मनाजोगी म्हैस मिळाली. मेकॅनिकला मनाजोगे कमिशन मिळाले. सावकाराच्या व्याजाची सोय झाली. सगळीकडे आनंदीआनंद झाला. थोडक्यात म्हणजे, ‘साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.
छे, छे, पण कहाणी येथे संपली नाही….
उत्तरोत्तर काळूच्या आणि बाळूच्या बँक-बॅलन्समध्ये कमालीची तफावत पडत गेली. काळूच्या खात्यात पूर्वीप्रमाणेच दरमहा पगाराच्या रकमेतून बचतीमध्ये भर तर पडत होतीच पण त्या जोडीला आता दूध-विक्रीचे पैसेही त्या बचत खात्यात रोज जमा होऊ लागले. हायड्रोजन भरलेला फुगा जसा वेगाने वरवर जावा तसा त्याचा बँक बॅलन्सचा आकडा भराभरा वर जाऊ लागला. पहिल्या म्हशीपुरते पैसे बँकेत साठायला दीड-दोन वर्षे लागली होती पण आता या दुहेरी उत्पन्नामुळे व मधल्या काळात मिळालेल्या पगारवाढीमुळे, बोनसमुळे यावेळी केवळ वर्षभरातच तो आणखी एक म्हैस स्वतःच्या पैशांनी खरेदी करू शकला.
आणि बाळू ?
वाचक हो, तुम्ही सुज्ञ आहात. काळूचे चित्र उजळ रंगवायचे असल्याने मी आता बाळूचे चित्र एकदम काळेकुट्ट रंगवणार, त्याची गाडी किती डफ्फड निघाली, मेकॅनिक कसा लबाड निघाला, सावकाराने त्याला कसे पिळून काढले वगैरे खोट्या खोट्या ‘मेलो-ड्रामॅटिक’ गोष्टी मी सांगणार अशी तुमची नक्कीच खात्री असणार. पण काय आहे, शक्यतो खोटे बोलायचे नाही, असा माझा ‘पण’ आहे; त्यामुळे नेमके काय घडले तेवढेच मी सांगणार आहे.
बाळूची गाडीही चांगलीच निघाली हं!
बाळूची गाडी तशी चांगली निघाली. उगीच खोटे कशाला बोला? गाडीचे ‘अॅव्हरेज’ वगैरेही ठीक होते. मेकॅनिक आणि सावकारही काही हिंदी सिनेमात दाखवतात तसे ‘व्हिलेनिअस’ नव्हते, तुमच्या-माझ्या इतकेच, माफक प्रमाणातच लबाड होते. पण तरीही गाडी काही पाण्यावर चालत नव्हती. काळूप्रमाणे खरे तर त्यालाही कामावर जाण्यासाठी गाडीची जरुरी नव्हती. पण इतरांवर रुबाब दाखवायला गाडीने कामावर जायला सुरुवात केल्यावर आता परवडत नाही, म्हणून गाडी न वापरणे, त्याच्या इभ्रतीस बाधा पोहोचवेल, असे त्याला वाटत होते. प्रथम प्रथम मौज म्हणून आणि मग सवय म्हणून कोपऱ्यावरून भाजी आणायला जायलासुद्धा गाडी वापरणे अंगवळणी पडून गेल्याने आता चालत वा बसने कोठे जाणे नकोसे वाटत होते. पेट्रोलचे बिल देताना त्याच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. पण आता यातून सुटायचे कसे? गाडी जुनी असल्याने महिन्या-दोन महिन्यांनी का होईना पण गॅरेजमध्ये न्यावी लागत होती. कोणता ना कोणता तरी पार्ट महिन्या-दोन महिन्यांनी का होईना बदलावा लागतच होता. पण करणार काय? हां, एकच काम वाचले खरे! सावकाराचा हप्ता, त्याचे व्याज, पेट्रोलचा खर्च, दुरुस्तीचा खर्च, हे सारे काही वजा गेल्यावर आता बचत खात्यात पैसे भरायला त्याला बँकेत जायची गरजच उरली नव्हती. दुःखात सुख म्हणावे ते एवढेच!
मंडळी, काळू-बाळूची सारी कहाणी तर मी तुम्हांला हातचे काहीही न राखून ठेवता किंवा पदरचे काही तिखटमीठ न लावता सांगितली. काळू काही माझा सासरा नाही आणि बाळू काही माझा जावई नाही; त्यामुळे याची बाजू घेऊ की त्याची, असे करायची मला किंवा तुम्हांलाही काही गरज नाही.
मग एकाची भरभराट आणि दुसऱ्याची अधोगती का?
पण अखेर एकाचा बँक-बॅलन्स तर शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखा वाढतो आहे आणि दुसऱ्याचा मात्र वद्य पक्षाच्या चंद्रासारखा अवसेकडे झुकतो आहे, असे का ?
दोघेही सारखेच शिकले-सवरलेले, दोघांचाही हुद्दा सारखाच, पगार सारखाच, दोघांवरही घरची काही जबाबदारी नाही. दोघांनीही एकाच रेषेवरून एकाच वेळी धावायला सुरुवात केली होती, दोघेही तसे निर्व्यसनी, वस्तू खरेदी करण्यापूर्वी दोघांचाही बँक बॅलन्स सारखाच होता. म्हैस काय आणि मोटारसायकल काय दोन्हीची खरेदीची किंमतही थोड्या-फार प्रमाणात सारखीच होती.
दोघांनीही पैसे खर्च करून त्यातून भारंभार किंमतीची वस्तू आणली होती. मग काय म्हैस पायगुणाची होती आणि गाडी पांढऱ्या पायाची आहे, असे म्हणायचे? आणि ती गाडी ‘लाभली’ नाही, असे म्हणून विकून टाकायची आणि नवी गाडी आणायची ?
पण एक गोष्ट मात्र नक्की!
सारा फरक केवळ या एका खरेदीनेच पडला आहे, हे मात्र अगदी शंभर टक्के खरे आहे !!
काळूप्रमाणे आपली भरभराट व्हायला हवी असेल तर काय केले पाहिजे ? या प्रश्नाचे नेमके उत्तर तुम्हांला देता आले (आणि अर्थात तसे वागता आले) की तुम्ही ‘श्रीमंत’ झालाच म्हणून समजा!
प्रकार – व्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)

पुस्तक : तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे

लेखक रवींद्र देसाई

प्रकाशक :प्रफुल्लता प्रकाशन

किंमत : २२०/- Rs.

पाने : २४०

हे पुस्तक ग्रंथप्रेमी.कॉम वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

https://www.bitlylinks.com/Bh6QZBej6

 

148900cookie-checkकाळू-बाळूची कहाणी – तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही श्रींचीच इच्छा आहे
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.