वाचन संस्कृतीच्या बैलाला

vachan sanskruti

मायमराठीच्या भवितव्याविषयी चिंतातूर असलेल्या सहोदरांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. साहजिकच या विषयावर सातत्यानं बरंच काही लिहून येतंय आणि विविध व्यासपीठावरून उच्चरवात बोललंही जातंय. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही समस्या खरोखरच बिकटअसली पाहिजे आणि गेल्या दिवसागणिक ती अधिकाधिक गंभीर होत जात चालली असावी. या ढासळत्या स्थितीची कारणं (आणि साहजिकच उपाय योजनाही) प्रत्येक जण आपापल्यापरीनं सुचवतोय. त्या कारण मीमांसेत ‘वाचन संस्कृतीचा ऱ्हास’ या मुद्द्यावर बराच भर दिलेला दिसतो. त्यामुळे असं वाटायला लागतं की वाचन संस्कृतीचा प्रश्न सोडवला की बऱ्याच प्रमाणात मराठी भाषेला नक्की चांगले दिवस येतील.

संस्कृत म्हणजे सातत्यानं सुधारत (संस्कारित होत) जाणारी भाषा पण तिचा ऱ्हास मराठीपेक्षाही अधिक झाल्याचं लक्षात येतं. कारणांमध्ये न शिरता, असं म्हणता येईल का की जे संस्कृतचं झालं तेच मराठीचं होणार आहे? प्रश्न काय तो ही प्रक्रिया किती झपाट्यानं हे घडणार एव्हढाच आहे? त्याबाबत मला तरी वाटतं की संस्कृत आणि मराठी यांची तुलना थोडीशी अव्यवहार्य होईल. याचं एक कारण म्हणजे प्रत्येक भाषेला (मराठी, बंगाली, पंजाबी वगैरे) जसा एक भक्कम भौगोलिक संदर्भ आहे, तसा संस्कृत भाषेला नाही. दुसरं असं की भाषा सुधारत जाण्याची (संस्कारित होण्याची) प्रक्रिया संस्कृत भाषेच्या बाबतीत थंडावत गेल्यामुळे हळू हळू त्या भाषेचा जनाश्रय घटत गेला असावा. म्हणजेच, मराठी भाषेनं जर ही जाणीव ठेवली तर तिचा ऱ्हास होणे थांबू (किमान पक्षी मंदावू) शकेल का?

गेल्या एक हजारभर वर्षांचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की मराठीनं या बाबतीत खूपच लवचिकपणा दाखवला आहे. मुळात आपली भाषा हीच संस्कृत, कन्नड, तेलगू अशा अनेक भाषांच्या मिश्रणातून घडली. दुसरं म्हणजे ती आधी एक बोलीभाषा म्हणून उदयाला आली आणि स्थिरावली. हळू हळू तिचं स्वतंत्र व्याकरण आकाराला आलं. ग्रंथरचना आणि राजाश्रय या दोन महत्वाच्या कारणामुळे तिचं संवर्धन झालं. इतर अनेक भाषामधले शब्द आणि विभक्ती-प्रत्यय तिने स्वीकारले. राजकीय कारणांमुळे असेल पण फारसीतले अनेक शब्द तिने आत्मसात केले. त्यामुळे प्रशासनात आणि कोर्ट-कचेरीच्या कामात बरीच सुलभता आली. पुढे इंग्रजीच्या बाबतीतही हेच घडलं. याशिवाय राज्याच्या विविध भागातल्या बोली उपभाषा मराठीनं आपल्याशा केल्या, त्यांना सामावून घेतलं. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. या गोष्टीचं आपण स्वागत करायला हवं. ‘प्रमाणित’ भाषेचं महत्व मी अमान्य करत नाही पण त्याचं अवास्तव स्तोम माजवलं जाऊ नये इतकंच. जिथे (विशेषतः माध्यमांमध्ये) विकृतीकरण आणि विद्रूपीकरण होत असेल तिथे जरूर विरोध करावा.

वाचन संस्कृतीच्या बाबतीतही हेच म्हणता येईल की जिथे सुधारणेची (संस्करणाची) प्रक्रिया मंदावते तिथे ऱ्हास सुरू होतो. त्यामुळे वाचन संस्कृती कशी रुंदावेल आणि सखोल होईल याचा विचार व्हायला हवा.

छापील इतकंच महत्व इथून पुढे डिजिटल माध्यमालाही येणार आहे. त्यामुळे इ-पुस्तकं, इ-नियतकालिकं, इ-वर्तमानपत्रं, ब्लॉग, ध्वनी-पुस्तकं (ऑडियो बुक्स) अशा अनेक माध्यमातून साहित्य उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. महत्व आहे ते वाचनाला, कोणत्या माध्यमातून वाचन होतंय हे महत्वाचं नाही.

ग्रंथालयांचं योगदानही तितकंच महत्वाचं राहील. संख्येनं पाहू गेलो तर राज्यातल्या अनुदान-पात्र ग्रंथालयांची संख्या काही कमी नाही पण त्यांची अवस्था अगदीच दयनीय वाटते. शासकीय अनुदानाची रक्कम त्यांच्या हाती पडायला पूर्वी काही महिने उशीर व्हायचा पण हल्ली तोच उशीर वर्षात मोजावा लागतो. पुस्तकांच्या खरेदीत होणारा भ्रष्टाचार हाही एक चिंतेचा विषय आहेच. महानगरांचं भौगोलिक क्षेत्र झपाट्यानं विस्तारत आहे. तेथे ग्रंथालयांच्या संख्येत बरीच वाढ व्हायला हवी आणि त्या बाबतीत पालिकांना पुढाकार घ्यावा लागेल पण त्या आघाडीवरही सामसूम दिसते.

वाचनाची आवड निर्माण करण्यात शाळा आणि महाविद्यालयं यांची भूमिका फार महत्वाची परंतु त्याबाबतीतही दुर्लक्ष होताना दिसतं. प्राथमिक शाळातून ग्रंथालयं क्वचितच आढळतात. माध्यमिक शाळांची स्थिती वाईटच म्हणावी लागेल. प्रदीप लोखंडे सारखा एखादा माणूस माध्यमिक शाळांना मराठी पुस्तकं मोफत पुरवण्याचा उपक्रम राबवताना दिसतो पण शाळांना पुस्तकं खरेदीत फारसा रस दिसत नाही. शाळकरी वयात वाचनाची आवड लागावी असे प्रयत्न झाले नाहीत तर पुढे ती आवड कशी उत्पन्न होणार?

मराठी साहित्याला माध्यमातून अगदी अल्प स्थान आहे. वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाचं हे एक लक्षण आहे की अनेक कारणांपैकी एक महत्वाचं कारण आहे? याला माध्यमांची अनास्था म्हणावं की अनभिज्ञता म्हणावं ? मराठीत डझनावारी वाहिन्या निघाल्या आहेत, नित्य नव्या वाहिन्यांची भर पडते आहे. त्यातला ‘कन्टेन्ट ‘ वाहून जाण्याच्याच लायकीचा असतो, ते सोडा पण आठवड्यातून निदान एखादा तास तरी मराठी साहित्य-विश्वातल्या घडामोडी आणि आस्वादक समीक्षा यांच्यासाठी द्यावा असं त्यांना का वाटत नसावं? वर्तमानपत्रांचीही तीच गत. मोठ्या अपेक्षेने प्रकाशक आपली नवी पुस्तके त्यांच्याकडे पाठवतात पण समीक्षा सोडाच, साधी पोच सुद्धा प्रसिद्ध करण्याइतका पाचपोच त्यांना नसतो. साहित्य संमेलनांच्या वार्षिक उरुसांच्या निमित्तानं उद्भवणाऱ्या (आणि पूर्णतः दुर्लक्षित करण्याच्या लायकीच्या) वादविवादासाठी मात्र हीच माध्यमं किती तरी वेळ आणि जागा वाया घालवतात. पण माझ्या मते यात आश्चर्य करण्यासारखं फारसं काही नाही; कारण साधं शालेय व्याकरण ज्यांना माहीत नाही अशा अडाणी माणसांकडून अपेक्षा ती किती करावी?

मराठी साहित्याचं प्रकाशन आणि वितरण यांचं अर्थशास्त्र सुद्धा दयनीय आहे. पुन्हा एकदा, वाचन-संस्कृतीच्या ओहोटीचं हे लक्षण आणि कारणही म्हणावं लागतं. नव्या पुस्तकाच्या आवृत्ती फार तर एकेक हजाराच्या असतात आणि त्याही खपायला कित्येक वर्ष लागतात. ज्यांना ‘तडाखेबंद’ खपाची पुस्तकं म्हटलं जातं त्यांच्याही किती हजार प्रती खपतात? त्यातून पुस्तक-विक्रेत्यांना किती नफा होतो आणि प्रकाशकांना काय सुटतं? लेखकांची पाळी त्यानंतरची. आपलं पुस्तक कोण्या प्रकाशकानं काढावं यातच तो बिचारा धन्य होऊन गेलेला असतो. मानधन दूरच राह्यलं. कित्येकदा पुस्तक खपलं तरी त्याच्या तोंडाला पानं पुसली जातात, ते वेगळंच. पुस्तक किक्रेत्यांकडून विक्री खालेल्या पुस्तकांची उधारी वसूल करण्यासाठी प्रकाशकांनाही कोण आटापिटा करावा लागतो. थोडक्यात म्हणजे, ज्याने त्याने, शक्य होईल तसं, कोणा ना कोणाच्या तरी तोंडाला पानं पुसणं हे मराठी प्रकाशन व्यवसायाचं एक प्रमुख लक्षण असावं. तरीही तो व्यवसाय टिकून आहे हे विशेष.

कोणत्याही व्यवहारात मागणी आणि पुरवठा हे अनिवार्य घटक असतात. त्यामुळे वाचन व्यवहारातला एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे लेखक (आणि प्रकाशक). सकस आणि वाचनीय साहित्य निर्माण झालं नाही किंवा अगदी कमी प्रमाणात झालं तर आपण वाचकांच्या उदासीनतेला कशी नावं ठेवणार? एक तर फक्त लेखनावर चरितार्थ चालवणारे लेखक / कवि मराठीत जवळपास नाहीतच. उपजीविकेचं साधन काहीतरी वेगळंच असतं (बहुदा प्राध्यापकी) त्यामुळे मराठीतला लेखक वर्ग मला तरी बराचसा आत्ममग्न आणि अल्पसंतुष्ट वाटतो. त्यांच्या अनुभव विश्वाला खूप मर्यादा आहेत हे तर खरंच पण आपल्या परिसरातल्या समकालीन वास्तवाचं बारीकीनं निरीक्षण करणं, कारण-मीमांसा करणं, त्यातून निष्कर्ष काढणं,आणि त्यांचं कलात्मक वैश्वीकरण (universalization) करणं या गोष्टी फार अभावानं घडताना दिसतात. इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादांची संख्या दरसाल शेकड्यात मोजावी लागेल पण मराठीतून इतर भाषांत अनुवादित होणारी पुस्तकं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी तरी असतात का? भाषांमध्ये आदान -प्रदान व्हायलाच हवं यात शंका नाही पण मराठीच्या बाबतीत हा व्यवहार एका दिशेनेच का व्हावा? नक्कीच कुठेतरी मराठी साहित्याचा कस कमी पडत असावा.

प्रत्येक नियमाला अपवाद असतातच किंबहुना अपवादानेच नियम सिद्ध होतो असं तर्कशास्त्र सांगतं. हा सिद्धांत मान्य करून पुढे मी म्हणतो की, मराठीत कसदार आणि वाचनीय साहित्य कमी निर्माण होतं त्यामुळे वाचकांचा उदार आश्रय मराठी साहित्याला मिळत नाही. हे विधान पुरेसा अभ्यास न करता केलेलं असेल आणि ते वादग्रस्त ठरू शकतं याची मला पुरेपूर कल्पना आहे, तरीही ते निरीक्षण मी थोड्याशा धाडसानं मांडतो आहे. कदाचित प्रत्येक भाषेतल्या साहित्य निर्मितीला हे विधान थोड्याफार अंशी लागू पडत असेलही पण मी मराठी भाषी, त्यामुळे ते मला मराठीच्या बाबतीत विशेषरित्या जाणवतं. जे जे म्हणून काही प्रकाशित होतं, ते राहू द्या पण ज्या काही साहित्यकृतींचा थोडाफार बोलबाला होतो आणि ज्यांना गावगन्ना (फुटकळ) पुरस्कार मिळतात, त्यापैकी कितीशी पुस्तकं खरंच वाचनीय असतात? माझ्या मते, फारच थोडी. कुठेतरी, कोणीतरी नावाजलं म्हणून उत्साहानं एखादं पुस्तक खरेदी करावं आणि ते पुरतं वाचवूही नये हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे.

सुप्रसिद्ध अमेरिकन लेखिका टोनी मॉरिसन (पुलित्झर आणि नोबेल पुरस्कार विजेत्या) यांनी म्हटलं आहे, “ तुम्हाला वाचावंसं वाटतं असं पुस्तक लिहिलं जात नसेल तर मग ते तुम्हालाच लिहिणं भाग आहे. ” त्यांचा हा उपदेश शिरोधार्य मानून मी लिहिता झालो. माझं हे विधान कुणाला शिष्टपणाचं वाटेल, कुणी मला अति-शहाणा ठरवेल पण माझ्या पुरतं ते प्रामाणिकपणाचं आहे. साहजिकच, माझी पुस्तकं कितीजणांनी वाचली आणि वाखाणली ह्या बाबी मला अप्रस्तुत वाटतात. तरीही, प्रश्न प्रकाशकांचा उरतोच. माझी पुस्तकं छापून त्यांना तोटा व्हावा हे मात्र मला खुपतं. मी हा मुद्दा त्यांच्याकडे काढला. एकदा नव्हे, अनेकदा. ते म्हणाले, “ प्रकाशन हा एक व्यवसाय आहे, त्यामुळे त्यात चढ-उतार असणार हे आम्हाला गृहीतच धरावं लागतं पण माझ्या बाबतीत म्हणाल तर आधी मी वाचक आहे आणि प्रकाशक नंतर. त्यामुळे मला जे वाचायला आवडतं, ते मी छापतो.” एकंदरीत काय, तर त्यांची जातकुळीही टोनी मॉरिसनचीच. अशा प्रकाशकांच्यामुळेच मराठी वाचन संस्कृती तग धरून राह्यली असावी. 

 

प्रभाकर करंदीकर

Image by Dariusz Sankowski from Pixabay
55451cookie-checkवाचन संस्कृतीच्या बैलाला
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.