पुस्तक परिचय – वॉल्डनकाठी विचारविहार

WhatsApp Image 2022-01-09 at 1.59.29 PM

“वॉल्डनकाठचा विचार विहार”
हेन्री डेव्हिड थोरो. अनुवाद दुर्गा भागवत.
जागतिक तापमानातील वाढ हा आजचा बहुचर्चित विषय झाला आहे. या समस्येची कारणे आणि त्याचे परिणाम, याची चर्चा जागतिक व्यासपीठावर पासून बसच्या रांगेपर्यंत सर्वत्र चालूच असते .या समस्येचे काही परिणाम तर गेल्या काही वर्षापासून दिसायला लागलेले आहेत. पृथ्वी व्यापी या समस्येचे कारण एका वाक्यात सांगायचे झाले तर, आजच्या उपभोगवादी जीवनशैलीचे हे विनाशक अपत्य आहे, असे सांगता येईल .अशा वेळी निसर्गाचा विनाश करणाऱ्या जीवनशैली कडे पाठ फिरवून,निसर्गपुत्र होऊन जगणाऱ्या डेव्हिड थोरो ची आठवण होते. त्याच्या त्या तळ्याकाठच्या वास्तव्याची, त्यातून निर्माण झालेल्या विचार विचार संचिताचे स्मरण होते.
“वॉल्डनकाठी विचार विहार “हे थोरोचे पुस्तक दुर्गा भागवतांनी अनुवादिले आहे .आदिम काळातील माणसाशी आणि निसर्गाशी एकरूप होऊ पाहणारा थोरो खऱ्याखुऱ्या अर्थाने निसर्ग पूजक आहे .एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, सर्वसाधारण नागरि जीवनाकडे पाठ फिरवून, काही काळ त्याने एका तळ्याच्या काठी किमान गरजासह जगणे पसंत केले. या काळात जसा तो स्वतःला शोधत गेला, तसाच माणूस निसर्गातील अनुबंधाची खोलवर गेलेली मुळेही पहात गेला.
पशु, पक्षी, वृक्ष व वनरायांची ठायी-ठायी वर्णने करणारा थोर शास्त्रज्ञ नव्हता वा अभ्यासकही नव्हता.पण माणसाला अंतर्यामी समृद्ध करणाऱ्या विचारांची पाळेमुळे,त्याच्या निसर्ग सहवासातच दाखवून देणारा निसर्ग पुत्र होता पारमार्थिक, अध्यात्मिक जीवन, माणसाचे नीती आणि आनितीचे जगणे या सर्वांशी निसर्गाचा संबंध आहे, असे ठामपणाने सांगणारा, त्यासंबंधीचे आदिम काळापासूनचे पुरावे देणाऱ्या थोरोचे सगळेच विचार आपल्याला पटतील असे नाहीत. जसेच्या तसे ते स्वीकारण्या- —सारखी परिस्थिती आता नाही. एकूणच सगळे संदर्भ बदलले आहेत हे याचे कारण आहे.
पण लौकिक अर्थाने यशस्वी म्हणजे उपभोगाच्या सर्व साधनसामग्रीनी समृद्ध असलेल्या व्यक्तींपेक्षा,निसर्ग सान्निध्यात राहाणार्‍या व्यक्तीलाच निर्भेळ सत्याचे दर्शन घडत असते, हे थोरोचे विधान आपण नाकारु शकत नाही .कारण समृद्धीकडे जाण्याचा संघर्षमय वाटचालीत कुठेतरी कळत नकळत सत्याचा अपलाप होतच असतो. या कारणास्तव हे सद्विवेक दूषित करणारे जगणेच नाकारुन थोरोने वनाची वाट धरली होती.
रोजच्या जगण्यातील संघर्ष किमान पातळीवर आणायचा असेल तर मीतव्ययाला पर्याय नाही. यातूनच निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबेल,ही थोरोची ठाम श्रद्धा होती. तळ्याकाठच्या वास्तव्यातून त्याने हे दाखवूनही दिले. त्याच्या अनुभव आणि विचारांचा मागोवा घेत गेलो तर, लक्षात येते की आजच्या आपल्या जीवनशैलीतील पुष्कळश्या गरजा,मागण्या अनावश्यकच आहेत. सध्या चालू असलेल्या सक्तीच्या बंदिवासात आपणही याचा अनुभव घेतला आहे. माणसाच्या नितिमान जगण्यातील त्या अडथळाही आहेत. सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावा धावा करताना,आंतरिक उन्नतीचे, समाधानाचे सुख निसटून गेले असते.उपभोगाचे क्षणिक बुडबुडे मात्र आपण मिरवीत राहतो. निसर्गाशी तुटलेल्या नात्याचा हा परिणाम आहे.
वॉल्डनकाठच्या वास्तव्यात संवेदनांना कमालीची तरलता प्राप्त झालेला थोरो वनाशी संवाद साधू शकला. खारी, निळकंठ, चिमण्या,घुबडे यासारख्या छोट्या प्राणी-पक्ष्यांची त्याचे मित्रत्वाचे संबंध झाले. त्याला हेच तर अपेक्षित होते.वनातील सगळ्याच मोसमात निसर्गाच्या निरनिराळ्या अविष्कारांचे त्याला कौतुक होते. या आविष्कारांचा मानवी जीवनावरील परिणाम निरखणे, याचे अन्वयार्थ लावणे आणि त्यातून अचूक सार काढणे, हा त्याचा आयुष्यभरचा छंदच झाला होता. त्याने म्हटले आहे की, जो माणूस निसर्गाच्या संगतीत राहतो आणि त्यामुळे ज्याच्या वृत्ती शांत झाल्या आहेत , त्या माणसाच्या बाबतीत निराशा ही अगदी काळीकुट्ट कधीच राहत नाही.
चाकोरीतून जाऊन एकाच प्रकारचे अनुभव घेत जगणे हा निसर्ग संवादातील मोठा अडथळा आहे, तो ओलांडून पुढे गेलो तर या जीवसृष्टीची आपली या जीव सृष्टीशी, ऋतू बरोबर आपले मैत्री जुळते. आयुष्यातील निरामय शांततेचा, समाधानाचा लाभ हे थोरोचे वनातील वास्तव्याचे फलित होते.
माणसापासून गर्दीपासून दूर एकांतवासात,निसर्ग सान्निध्यात राहिल्याने कदाचित थोरोला विक्षिप्तपणाची दूषणे मिळालीही असतील.समाजमान्य जीवनशैलीशी फटकून राहणाऱ्या प्रत्येकाला ती मिळतच असतात. पण त्यामुळे त्याच्या झालेल्या उन्नतीची प्रगतीची मोजमापे करणारी परिमाणे तरी कुठे आपल्याकडे आहेत ?मग प्रश्न पडतो खरे संपन्न कोण? मोजता येणाऱ्या साधनसंपत्तीचे ,कधी तरी या कधीतरी संपणाऱ्या या संपत्तीचे आपण मालक की चिरंतन समाधानाचा ठेवा मिळालेला थोरो.
-दिलीप नाईक निंबाळकर.

पुस्तक :वॉल्डनकाठी विचारविहार

लेखक : दुर्गा भागवत
प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पाने : ३५२
किंमत : ५०० रुपये
148260cookie-checkपुस्तक परिचय – वॉल्डनकाठी विचारविहार
Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.