इन्फोटेक आज सगळीकडे 5G, जीपीएस, जीपीआरएस, जीआयएस, गुगल ग्लास, गुगल मॅप्स, सेन्सर्स, 3D प्रिंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, बिग डेटा, डेटा एन्क्रिप्शन/कॉम्प्रेशन, डेटा मायनिंग, डेटा अॅनालेटिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, सॅटेलाईट्स, आरएफआयडी, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्यूअल रिअॅलिटी, ब्लॉकचेन, बिटकॉईन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, क्वांटम कॉम्प्युटर्स, नॅनोकॉम्प्युटर्स, बायोकॉम्प्युटर्स आणि असे अनेक शब्द आपण रोज ऐकतो आणि आपल्याला उगाचच त्यांची भीती वाटते. या सगळ्यांची भीती मनातून काढून टाकण्यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. ज्यांची कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीशी काहीही ओळख नाहीये अशांकरताही हे पुस्तक लिहिलंय आणि ज्यांना थोडीफार त्यातली माहिती आहे त्यांनाही हे पुस्तक भरपूर काहीतरी देऊन जाईल. इंग्रजीत 'कॉम्प्युटर्स फॉर डमीज' किंवा 'इडियट्स गाईड' अशा तऱ्हेची जी पुस्तकं असतात, त्याहीपेक्षा हे पुस्तक आठवीतल्या मुलालाही कळेल अशा अत्यंत सोप्या भाषेत मांडलेलं आहे. यासाठी पूर्वज्ञानाची गरज नाही. बिट्स आणि बाईट्सपासून सुरुवात करून कॉम्प्युटर्स कसे चालतात, इंटरनेट कसं चालतं, मोबाईल कसे काम करतात, इथपासून वर सांगितलेल्या सगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख आपल्याला या पुस्तकात होईल.