Description
खिन्नता, स्वनिर्मित दुःख, अवसाद, स्वतःला दोष देण्याच्या सवयीपासून तर आत्महत्येचा विचार करणाऱ्या सर्वांना या पुस्तकाने एक संजीवन मंत्र दिला आहे. तो म्हणजे, स्वतःचा प्रतिसाद बदलण्याचा. घडणारी घटना, त्यामधील पात्रांचे वागणे व विचार यावर आपला काहीच ताबा नसतो, पण त्याबद्दल आपण स्वतःला काय वाटून घ्यावे हे तर आपल्या हातात असते ना ? बस्. तिथे समस्येतून सुटकेची किल्ली आहे.
स्वतःचा प्रतिसाद बदलता येतो कारण तो आपला स्वतःचा असतो. त्यामध्ये अटकेऐवजी सुटका, दुःखाऐवजी सुख, निराशेऐवजी आशा, मरण्याऐवजी जगणे, खिन्नतेऐवजी प्रसन्नता आणता येते. "गेले, सगळे काही हातातून सुटले" असे म्हणण्याऐवजी, " ते परत मिळविता येईल असे म्हणता येते. "माझा नाइलाज आहे" याऐवजी " मी इलाज शोधीन " असा विचार आणता येतो. "मल छान व तंदुरुस्त वाटत आहे", " हो, हे मी करू शकतो”, "मी परत उभा राहू शकेन " अशा प्रकारचे पुनरुत्साह देणारे प्रतिसाद देता येतात.
आणि हा काही भोंगळ आशावाद नाही. यामागे अनेक मानसशास्त्रज्ञांचे संशोधन उभे आहे. त्यापैकी न्यूरोलिंग्विस्टिक प्रॉग्रामिंग (एन. एल. पी.) या विचारतंत्राचा मुख्य आधार लेखिका रविबाला काकतकर यांनी घेतला आहे: आपल्या विचारांचा मेंदूमधील आराखडा बदलता येतो. तो हताशेऐवजी फलान्वेषी बनवता येतो. हातपाय गाळून बसण्यापेक्षा, 'हो… हे मी करू शकतो’ ही विचार योजना तिथे आणून बसविता येते, असे या पुस्तकात अनेक उदाहरणे व अनेक मानसशास्त्रज्ञांच्या विचारांचा मागोवा घेवून सांगितले आहे. Transactional Analysis, व्हिक्टर फ्रंकल यांची लोगो थेरपी, भारतीय विचारसरणीमधील विपश्यना अशा अनेक विचारधारांचा सज्जड पाया घेऊन त्यावर लेखिकेने आपले म्हणणे बेतलेले आहे. शिवाय, मदतीला आपले स्वतःचे मानसशास्त्रीय ज्ञान तथा समुपदेशक म्हणून बहुविध आणि प्रदीर्घ अनुभव यांचे पाठबळ आहे. एवढेच नव्हे तर, भर बर्फात हिमालय चढणे, पाच हजार फुटावरून खाली धाडस - उडी मारणे असे स्वतःचे असाधारण पण यशस्वी प्रयोगही त्यांच्या या आत्मविश्वासवर्धक शिकवणुकीला बळ देतात.
निवेदन अगदी सोप्या भाषेत व मुद्देसूद केले आहे. कुठेही अकारण पाल्हाळ नाही.
Additional Info
Binding : Paperback
ISBN No : 9788195862894
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 252gms Dimensions : 21.7 * 14 * 1.1
Pages : 192 Edition : 1