मी लहान होतो. आईची इच्छा होती की, मी शाळेत जावं. त्याप्रमाणं एके दिवशी मला शाळेत घातलं. पण मी शाळेचा उंबरठा ओलांडू शकलो नाही. कारण, गुन्हेगार जातींची सर्व मुलं शाळेच्या अंगणात बसून फुटक्या पाट्या घेऊन अध्ययन करीत होती. मी त्या रांगेत बैठक मारली. दुपारी सूर्य डोकीवर येऊन तापू लागला. मग तो मावळतीकडंही निघाला, पण गुरुजी बाहेर आले नाहीत. तो दिवस तसाच गेला.
दुसरे दिवशी गुरुजींची वक्रदृष्टी माझ्याकडं फिरली नि त्यांनी स्पर्श न करता दुरूनच मला शासन केलं.
तेवढीच मला प्राप्ती झाली. शाळा सुटली. पुन्हा आम्ही शाळेचं तोंड पाहिलं नाही. पण ती जीवनातील उणीव माझे बंधु ज्ञानेश्वर यांनी भरून काढली, मी माझी मराठी शिकलो, नि मग लिहू लागलो. म्हणून मला माझं आश्चर्य वाटतं.
जे जीवन जगलो, जे जीवन अनुभवलं व जे जीवन पाहिलं, तेच मी आता लिहीत आहे. त्यात दोष आहेत. पण माझा मंगल महाराष्ट्र हा कसदार आहे. माझ्या उणीवा पोटांत घेऊन तो आजपर्यंत माझ्या साहित्याचं कौतुक करीत आला आहे. म्हणूनच मी लिहीत आहे.
Publications : प्रतिमा पब्लिकेशन्स (Pratima Publication)
Author : अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)
Binding : Hardcover
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 993 gms
Width : 15
Height : 4.2
Length : 22.5
Edition : 4
Pages : 876