सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याचं दिसतं, मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाचं गंभीरपणे स्वागत झालं आहे. या पुस्तकात अनिरुद्ध कनसेट्टी यांनी अंधारावर प्रकाशझोत टाकला आहे आणि मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीच्या म्हणजे सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळातील दख्खनला, त्याच्या सगळ्या ऐश्वर्यासह आणि निखळ कीर्तीसह चोखंदळ वाचकांसमोर जिवंत केलं आहे.
अनेक शतकं दक्षिण भारताला आकार देणाऱ्या चालुक्य या राजघराण्याच्या जन्माचा साक्षीदार होण्यासाठी कणिसेट्टी आपल्याला काळाच्या प्रवाहात मागे नेतात. दख्खनच्या माध्यमातून हिंदू धर्म तोपर्यंत स्वतःला प्रस्थापित करत होता. त्या वेळी दख्खनमध्ये मंदिरांचा अभाव होता. त्यानंतरच्या पाचशेहून जास्त वर्षांच्या कालावधीत या द्वीपकल्पाचा कायापालट झाला. मध्ययुगीन भारतातील बलाढ्य साम्राज्यं कशा प्रकारे उदयास आली, तसंच मंदिरांच्या बांधकामांना आणि भाषेच्या वापराला कशा प्रकारे राजकीय साधन म्हणून वापरण्यात आलं, हे कनिसेट्टी अत्यंत स्पष्ट आणि आकर्षक तपशिलांसह स्पष्ट करतात. जैन आणि बौद्ध, शैव आणि वैष्णव यांच्या धार्मिक संघर्षात राजे कशा प्रकारे गुंतले होते, राजांना त्यांच्या प्रतिस्पध्यांहून आणि प्रजेहून उच्च ठरवण्यासाठी कशा प्रकारे जरब निर्माण करणाऱ्या कर्मकांडांचा वापर करून घेण्यात आला, तेही ते स्पष्टपणे दाखवून देतात. हे करत असतानाच ते मध्ययुगीन भारतीय राजांचा, व्यापाऱ्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचा अस्पष्ट आकृत्यांपासून गुंतागुंतीच्या, जिवंत लोकांमध्ये कायापालट घडवून आणतात. कनिसेट्टी आपल्याला चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट आणि चोल राजघराण्यांच्या प्रभावी राज्यकर्त्यांच्या मनाच्या थेट गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातात. त्यांना आणि त्यांच्या जगाला ते माणुसकीनं, मार्दवानं आणि सखोलतेने जिवंत करतात.
ते जग हत्तींच्या रक्तरंजित युद्धांनी आणि शत्रूला चकवण्याच्या क्रूर लष्करी क्लृप्तींनी, युतींनी आणि विश्वासघातांनी भरलं जग होतं. इथे मनोभंग झालेला, हताश राजा विधिपूर्वक आत्महत्या करत होता आणि धूर्त, कुबडा राजकुमार त्याच्या शक्तिशाली भावाच्या नाकावर टिच्चून आपल्या स्वतःच्या राज्याची स्थापना करत होता. या जगात राजा अश्लील, बीभत्स नाटक लिहीत होता आणि धार्मिक स्पर्धेतील ती नीतिकथा असत होती. याच जगात भारताच्या राज्यकर्त्यांच्या प्रचंड शक्तीची आणि त्यांच्या शहरांची संपत्ती यांची अरबस्तानापासून आग्नेय आशियापर्यंत चर्चा होत होती आणि याच जगात दक्षिण भारतीय राज्यांनी उत्तरेकडच्या राज्यांवर लागोपाठ आक्रमणं करून त्यांचे पराभवही केले होते. भारताचा हा विस्मरणात गेलेला इतिहास अत्यंत परिश्रमपूर्वक संशोधन करून समोर आणण्यात आला आहे. तो वाचताना तुम्ही अक्षरशः एका जागी खिळून राहाल, अगदी मंत्रमुग्ध होऊन जाल.
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : डॉ. मीना शेटे-संभू (Dr. Meena Shete Shambhu)
Binding : Paperback
ISBN No : 9788195978458
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 364gms
Width : 14
Height : 2.1
Length : 21.4
Edition : 1
Pages : 416