'महाराष्ट्राची संतपरंपरा' या माझ्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. २०१२ मध्ये दिलीपराज प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता व त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही लाभला होता. त्यात महाराष्ट्रातील विविध धर्मांच्या व पंथांच्या शंभर संतांविषयी व महापुरुषांविषयी मी विवेचन केलं होतं.
या लेखनामागील पार्श्वभूमीचाही थोडासा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. महाराष्ट्र शासनानं इ.स. २०१०, ११ व १२ या काळात 'www.mahanews' ही वेबसाईट सुरू केली होती व त्यात या नावाचं स्तंभलेखन मी करावं, अशी इच्छा संबंधित विभागाच्या संचालकांनी मजकडे व्यक्त केली होती. जगभरातील मराठी माणसांपर्यंत 'मऱ्हाटी संस्कृती'चा (व पर्यायानं, भारतीय संस्कृतीचा) हा मौलिक वारसा या माध्यमातून पोहोचणार असल्यानं मी हे लेखन करण्यास सत्वर संमती दिली व जवळपास १५० संतांविषयी / महापुरुषांविषयी मी हे लेखन केलं. आश्चर्याची व आनंदाची बाब अशी की, या सदराच्या visits प्रारंभापासूनच अनेक लाखांपर्यंत होत्या व २०१२ साली हे लेखन संपविताना त्या ९५ (पंच्याण्णव) लाखांपर्यंत गेल्या! (या वेबसाईटवर लेखनाखाली visits च्या संख्या नोंदविल्या जात असल्यानं ही माहिती लगेच कळत असे.) या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्या visits ची संख्या नोंदविण्याचं राहून गेलं होतं. या ग्रंथातील ४७ संतांविषयी / महापुरुषांविषयी जेवढ्या नोंदी उपलब्ध झाल्या, त्या लेखांच्या शेवटी नोंदविल्या आहेत.
हे साक्षेपी लेखन करताना परिचित/अपरिचित संतांविषयी/महापुरुषांविषयी माहिती मिळविताना जसे परिश्रम करावे लागले, तशीच खूप दक्षताही बाळगावी लागली पण ही दोन-तीन वर्षं मी या लेखनात इतका गढून वा रमून गेलो की हे परिश्रम मला जाणवलेच नाहीत, उलट त्यांनी मला फारफार आगळंवेगळं समाधान नि आनंद दिला. हा आनंद तुम्हा-आम्हा सर्वांना मिळावा, यासाठी ‘महाराष्ट्राच्या संतपरंपरे'चा हा दुसरा भाग प्रकाशित करीत आहे. संतसाहित्यप्रेमी त्याचं निश्चितपणे स्वागत करतील, असा मला विश्वास वाटतो.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : यु. म. पठाण (Yu Ma Pathan)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549871
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 130gms
Width : 21.3
Height : 13.5
Length : 0.5
Edition : 1
Pages : 103