Description
आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय- नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेऊन स्व-अस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा आहे मी. हजारो वर्षांपासून जाळत आलात तरी संपलो नाही. आजवर कथा, साहित्य, पुस्तके यातून मी बोललो नाही, त्यामुळेच तुम्हाला कधी समजलो नाही. दुर्गुणी, अवगुणी म्हणून मला हिणवले गेले.
बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र, यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून मी राक्षस संस्कृतीचा पाया रचला. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद, इत्यादीं सारख्या अनेक विषयांत पांडित्य मिळवूनही मला खलनायक ठरवून माझी कायम उपेक्षाच केली गेली. अवहेलनेच्या फेऱ्यांत गुरफटलेल्या माझ्या आयुष्याचं सार वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं. हजारो वर्षांपासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो. विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपाळी घ्यावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडली तर तत्वांसाठी मरावं आणि मारावही लागतं.
माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, आलेली अनपेक्षित वादळं... त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर लंकाधिपती झालो. इतर राजांसारखी मी एकट्याने सुखं उपभोगली नाहीत. माझी जनताही सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षांपासून अनुत्तरीत असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्याचा, माझ्या अंगभूत व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेतला का कधी? माझं आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भारलेलं आहे. स्वतःच्या बळावर सर्व देवांना मी पराभूत केलं. मला न जाणता माझी प्रतिमा जाळणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते. सीतेचे अपहरण केल्याचा मला दोष देता, पण मी तिची विटंबना केली नाही, हे का विसरता ?
कादंबरी वाचा आणि ठरवा... मी खरोखरच खलनायक होतो, की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक...!
Additional Information
Publications : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस ( New Era Publishing House ) Author : शरद तांदळे( Sharad Tandale )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788193446812
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 480
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 432