माऊलीचा मळा (लेखक - दिलीप नाईक निंबाळकर) - म सा प पुरस्कार प्राप्त - "अंत्राळी" पुस्तकामधून!
खूप वेळ बसल्यामुळे मांडीला रग लागायला लागली,तरी विनायकरावांना उठावसं वाटेना. मग बसल्या जागीच त्यांनी पाय लांबवले. तळ हातावर रेलून शरीराचा भार मागे टाकला.पायांची आपोआपच तिढी टाकली गेली. पालखी तळावर दुपारी झाल्या घटनेचा पट मनात घोळत होता. त्या सगळ्यांचा अर्थ कसा लावायचा, हे त्यांना अजूनही कळत नव्हतं.
खरं तर मळ्यातील ही विहिरीच्या धावेवरची जागा विनायकरावांची आवडती जागा. आजवरच्या आयुष्यातील कितीतरी कोडी त्यांनी येथे बसून सोडवली होती.विहिरीच्या रुंद कठड्यावर असे रेलून बसल्या बसल्या सगळ्या मळा नजरेखाली यायचा अन् मनातल्या विचारांना वावरायला ऐसपैस वावही मिळायचा. कधीकाळी आजोबा पणजोबांनी बांधलेल्या या विहिरीवरची ही धावेवरची जागा एका परीने विनायक रावांची चिंतनिकाच होती. पाण्याच्या मोटार  बंद झाल्या तरी मोटरने खेचून आणलेलं पाणी थारोळ्यात पडायचं. वावरायला पोहोचायचं.पाणी प्यायलेला तृप्त मळा पाहताना जीव सुखावायचा. मळ्यात कोण येतंय, कोण जातंय हे इथून स्पष्ट दिसायचं. मळ्यात कोण कशासाठी येत असेल याचा अंदाज ती व्यक्ती जवळ येईपर्यंत घेता यायचा. विनायकरांचा तो एक चाळाच होता. मळ्यात येणारी व्यक्ती जवळ येईपर्यंत, तर्क आराखड्यांच्या आट्यापाट्यातून बहुतेक वेळा ते अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचायचे. जागेचा गुण की काय कुणास ठाऊक येथे बसल्यावर सगळ्या समस्या आपण सोडवू शकतो हा विश्वास त्यांना होता.
गेल्या काही दिवसापासून मात्र हे सारे संपत आल्याची भावना मनात मूळ धरायला लागली होती. धावे वरच्या दोन चिऱ्यांच्या मध्ये पाखरांच्या शिटेतून कधीतरी जीव धरलेल्या पिंपळाच्या रोपट्याने हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली होती. कितीही खुडली तरी काही दिवसातच ती नव्या जोमाने लवलवायला लागायची. एक ना एक दिवस ती विहिरीची तोड न् तोड निकामी करणार, ही भीती विनायकरावांच्या मनात रुजली होती. त्याला कारण होते गेल्या तीन वर्षाचा दुष्काळ पाठीवर घेऊन आलेला यावर्षीचाही कोरडा ठक्क आषाढ. आताही मोकळी वावरं लख्खपणानं दाखविणारा आषाढ रात्रीचा उजेड त्यांना भेसूर वाटायला लाग
ला होता. शिवारात गवताची काडी नाही, विहिरीतला तळचा खडा न् खडा उघडा पडलेला, रानोमाळ भुतासारखा पिसाटल्यासारखा वाहणारा वारा, मनातीलही ओल उडवून लावत होता. कुठवर दम काढायचा आता ?आणि कशाच्या जोरावर ? सलग चौथ्या वर्षातला आषाढ कोरडा चालला होता. त्याआधी नवरात्रात हस्ताचा तरी पाऊस हमखास व्हायचा. पण आता कोणत्या मुलखाला तो पसार झाला होता ते पांडुरंगाच जाणे. शेवटचा पाऊस कधी झाला ते देखील आता   आठवत नाही.     
                                                                                                        
तसा तर हा पावसाळी मुलुख नाहीच. पण आषाढ श्रावणातला एखादा, गौरी गणपती बरोबर कधीतरी चुकारीने येणारा, नंतर हस्तात एक दोन वेळा खात्रीने पडणारा पाऊस झाला की संपला पावसाचा हिशोब. चुकून माकून कधी काळी दिवाळी झाल्यावर पाऊस पडलाच तर माणसं हारखायची. ज्वारीचे पीक हमखास येणार या खात्रीने बाणगंगेच्या कोरड्या पात्रातूनही रामाचा रथ ओढत वर्षाचा सण उत्साहात पार पाडायची. हे दर सालाला घडायचं असं नाही, पण पहिल्या दोन-तीन पावसावर साल बेगमी व्हायची. या वर्षाचं त्या वर्षाला धान्य पुरलं म्हणजे आबादी आबाद समजावं.
गेल्या चार वर्षात मात्र पावसाची आणि या मुलखाची नजर भेट ही झाली नव्हती. दुनियाभर पडणारा पाऊस जणू या मुलखाचा रस्ताच विसरला होता. पहिली दोन वर्षे धूळपेरणी करून दाणं मातीत घालून होतं नव्हतं तेवढंही गमावून बसलेल्या मनाचा कोळसा झाला होता. आता पाऊस पडला तरी पेरणीसाठी काही शिल्लकच राहिलं नव्हतं. निम्म्याहून अधिक गावाने मुंबई गाठली होती. जगायलाच बाहेर पडायचं तर खात्रीशीर वळचणीला जाण्याचं शहाणपण होतं त्यात. कोण कसा,काय करून, काय खाऊन जगतोय याचे हिशोब पोट भरलेल्यांनी करावेत. आला दिवस पार पाडण्याच्या विवंचनेत असणाऱ्यांना कसले हिशोब न् कसलं काय ! काहींनी कॅनाल बागायतदारांच्या बंगल्यापुढे पालं टाकली होती. त्यांच्या उसाच्या वाढ्यावर शेरडा करडांबरोबर माणसही अंग धरून होती. बागायतदारांना तरी इतक्या कमी हजेरीत माणसं कुठे मिळणार होती ?
मोल मजुरांचं, एखादा दुसरा जमिनीचा तुकडा मालकीचा असणाऱ्यांचं हे असं जगायला बाहेर पडणं ठीक होतं. दर दिवसाला नव्या गावाची एक वेस ओलांडली तरी त्यांचे दिवस पार पडणार होते. तेवढ्याच साठी तर गाव सोडलेल्यांनी हे अवघडही वाटत नव्हते‌ विनायक रावांची गोष्ट वेगळी होती. घरातली दहा माणसं, कोंबड्या,बैल- बारदाना इतकं सगळं घेऊन कोणाच्या दारात जायचं हे प्रश्नचिन्ह ही लहान वाटावे इतका मोठा दुसराच प्रश्न होता. जगण्यासाठी, दुष्काळाला तोंड देता येत नाही म्हणून बाहेर पडायचं ?बापजाद्यांनी कमावलेली प्रतिष्ठा टांगून ठेवून, दिवस पार पाडण्यासाठी बाहेर तरी कुठे जायचं ?स्वतःच्या दोन- दोन पदव्यांचं शिक्षण पोट भरण्यासाठी कुणाकडे घाण टाकायचं नाही म्हणून तर मळ्याची वाट धरली होती. या गोष्टीला आता तीस वर्षे होऊन गेली होती आणि आता या वयात---
शे दोनशे रुपयासाठी मन मारून,खाली मान घालून लायकी नसलेल्या पुढे हात बांधून उभा रहात नोकरी करण्यासाठी आपला जन्म नाही,हे ओळखूनच त्यांनी शेतीचा मार्ग स्वीकारला होता. इतक्या वर्षानंतर तरुणाईतील ती तडफ तो जोश कमी कमी होत गेलेल्या पाऊस काळा सारखाच नाहीसा होत आला होता. खरंतर कमी झालेल्या पावसाचा हा परिणाम होता. नियमित पाऊस पडत राहिला असता तर ही वेळ आली नसती. अगदी साध्या साध्या अपेक्षाही विरी गेलेल्या कपड्यासारख्या भसकन टरकत होत्या.दहा ठिकाणी उघडं पाडत होत्या. पाऊस पाण्यावर मळा पिकत होता तोवर एवढ्या मोठ्या खटल्याच घर चालविणं कधी जड गेलं नाही .पण आता मात्र जीव घायकुतीला आला होता.
नक्षत्रासारख्या देखण्या गुणवान पोरीला उजवण्यासाठी घरातून बायकोचा रोजचा घोशा सुरू झाला होता ‌विश्रामचं --म्हणजे मुलाचं वकिलीचे शिक्षण संपत आलं होतं. पण पुण्यासारख्या शहरातील त्याच्या शिक्षणाचा खर्च मेटा कुटीला आणत होता.अजून चार-पाच वर्षे तरी त्याच्या कमाईची अपेक्षा करता येणार नव्हती. आई-बाबांची किरकोळ आजारपणं, रक्ता- नात्याचा नसलेला पण या घरासाठीच लहानपणापासून राबत आलेला भावड्या आणि त्याची बायको बबईचे मावळतीचे दिवस, या सगळ्यांचे ओझं आता पेलवेनासं झालं होतं. पाय लटपटायला लागले होते. कमाईची खात्रीशीर एकही वाट राहिली नव्हती,पण खर्चाला मात्र दहा दहा वाटा. रानात काय आणि मनात काय, नुसत्या वांझोट्या वाऱ्यांचा धिंगाणा सुरू असायचा.
ज्या मळ्याच्या मोहात पडून शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता त्या माऊलीच्या मळ्याचा आधार मिळेनासा झाला होता, याचीच खंत दिसामाजी उफाडाल्या आलेल्या पोरीगत वाढतच होती. उत्तम मार्कांनी एम ए उत्तीर्ण झाल्यानंतर त्या काळात सहजी नोकरी मिळत असतानाही नोकरीची संधी शेतीच्या प्रेमापायी त्यांनी नाकारली होती. त्या पाठीमागे काही भावना होत्या, विचार होते. नोकरीसाठी नाही, तर मनापासून शिकावं वाटलं म्हणून ही नेमकी जाण, घरच्या शेतीत घालण्याचं लक्ष घालण्याचा आबांचा आग्रह आणि मुख्य म्हणजे माऊलीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मळ्याचा मनातील उमाळा या सगळ्यामुळे नोकरीचा मोह झाला नाही. माती आड केलेल्या एका एका दाण्यातून चैतन्याचा कोंब सळसळून वर येताना पाहण्यातील आनंद विनायकरावांचा मोलाचा वाटत राहिला होता. इतक्या वर्षानंतर ही त्यातील नवलाई,कोवळे पण सरलेलं नव्हतं. दरवर्षीच्या या निसर्ग निर्मित सोहळ्याला--' नेमेची येतो मग '--असं स्वरूप इतक्या वर्षानंतरही आलेलं नव्हतं.पेरणीनंतर रानाला येऊ लागणारं पोपटी जावळ दिसायला लागल्यापासून ते थेट, शिवार मोत्याच्या माळा- मुंडावळ्या बांधून उभा राहीपर्यंत विनायकराव मळा सोडायचेच नाहीत.माऊलीचा मळा या नावाने ज्ञानियांचा पसायदानाचा हा प्रसादच जणू आपल्या वाट्याला आला आहे, या कृतज्ञ भावाची साय त्यांच्या आयुष्यावर दाटली होती.
दरवर्षी आषाढात माऊलींची पालखी पंढरपूरला जातेवेळी दुपारच्या एका जेवण वेळी गावाजवळ थांबायची. प्रपंचातून सुटका नसणारे विठुरायांचे माऊलीचे भक्त पालखीच्या दर्शनासाठी पालखी तळावर गर्दी करायचे. इथेच त्यांच पंढरपूर आणि इथेच आळंदी. जमेल तसा घासातला घास वारकऱ्यांच्या मुखी घालताना विठोबाचे मुख न्याहाळीत असल्याचे सुख त्यांना पुढच्या वर्षापर्यंत पुरून उरते. वारकऱ्यांना एक वेळचे जेवण देण्यासाठी म्हणून कधीतरी पाच दहा पिढ्या मागे हा मळा विनायकरावांच्या पूर्वजांना मिळाला होता. तोच हा 'माऊलीचा मळा'. या मळ्यातील धान्यावरचा वारकऱ्यांचा हक्क आजवर कोणीही डावलला नव्हता. जुन्नरकडील मारुती बुवांच्या दिंडीची एक दुपार वेळ या मळ्यातील धान्यावर भागत असे.यात देणारा मालक नसे-- घेणारा याचक नसे. पंढरीच्या वाटेवर कुठले दिल्या घेतल्याचे हिशोब ?
दिंडीचे नाव मारुती बुवांची दिंडी असं असलं तरी आता मारुती बुवां हयात नसताना, पुढच्या पिढ्यांनी दिंडीचा वारसा चालविला होता. पण यामुळे काही फरक पडत नव्हता.वर्षातल्या एका दिवसाची दुपार, दोन-तीन तासांचा सहवास दोन्ही बाजूकडील पिढ्यांनी जपला होता. पाऊस पाण्याच्या, पिकांच्या वर्षभरातील सुख-दुःखांच्या गोष्टीची विचारपूस जेवताना व्हायची. जेवण तरी काय-- भाकरी बरोबर कधी मटकीची उसळ तर कधी हुलग्याची. गोड पदार्थ म्हणून लापशी असायची. अन्नब्रह्माचा घास प्रत्यक्ष विठुरायाला भरवीत असल्याचं हे समाधान पुढच्या पूर्ण वर्षावर सावली धरायचं.भाकर तुकडा खाऊन झाला की थोड्या विश्रांतीनंतर पालख्या मार्गस्थ व्हायच्या. दिंडी पुढच्या गावाच्या शिवेत जाईपर्यंत विनायकराव पालखी सोबत जायचे. मुलखा असा बेभरवशी पाऊस पाण्याचा. मळा कधी पिकायचा, --कधी नाही. एखादं दुसरं वर्ष असं ना पेरीचं जायचं. पण दिंडी सहित घराची साल बेगमी विहिरीच्या पाण्यावर व्हायची. ही देखील माऊलीचीच कृपा असल्याचा विनायकरावांच्या मनातील कृतज्ञ भाव मात्र कधीच मावळला नाही. दरवर्षी दोन-तीन हारे भरून भाकऱ्या, दोन-तीन गड्यांनी उचलावी लागावीत अशी उसळ आणि लापशीची मोठी भांडी बैलगाडीत घालून पालखी तळावर जाण्याचा,वारकऱ्यांना जेवू एक सोहळाच असायचा. तो पार पाडण्यासाठी सगळं घरदार उत्साहाने राबायचं. अगदी कळत्या वयापासून विनायकरावांचे एक देखील पालखी दर्शन, दिंडीचे जेवण चुकलं नव्हतं.दिंडीची बदलती रूपे ते इतकी वर्षे पहात आले होते. निव्वळ विठोबाच्या चरणावर डोळे लावून जळी -स्थळी -काष्टी- पाषाणी विठ्ठलच पहात होते. पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना सोय गैरसोयीचे भान नसायचं. त्यामुळे पंढरीच्या वाटेवर मुखी घालणार मुखी पडणारा घास,-- मग तो हातावर घेऊन खाऊ लागणारे पिठलं भाकरी असो वा पत्रावळीवरील लापशीचे जेवण असो, यज्ञकर्मातील ती आहुती मानून त्याचा स्वीकार व्हायचा.
आता मात्र सगळच बदलत चाललं होतं‌ दिंड्यांचं सामान वाहून न्यायला आता ट्रक टेम्पो दिसायला लागले होते. त्यात सगळा संसार बरोबर घेतला जाई. वारकऱ्यांना जेवू घालण्यात, त्याची जाहिरात करण्यात चक्क स्पर्धा होती. पिढ्यान पिढ्या वारकऱ्यांच्या मुखी विनायकरांसारख्या माऊली भक्तांनी घरचा घास घेऊन घातला. ते अन्नदान नव्हतं वा वाटपही नव्हतं. गेल्या काही वर्षापासून मात्र वारकऱ्यांना 'अन्नदान' केले जाऊ लागलं होतं. ग्रामीण अर्थकारण ताब्यात ठेवणाऱ्या सहकारी संस्थांनी ही संस्कृती जन्माला घातली होती. दूध,लाडू ,केळ्यांपासून कपड्यांपर्यंत मोफत वाटप व्हायला लागलं होतं.हे अन्नदान वाटप करतानाचे फोटो दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात कसे येतील, याबाबत मात्र ते कमालीचे दक्ष असायचे. विनायकरावांना याचेही फारसं आश्चर्य वाटलं नाही. दानाची जाहिरात करण्याच्या, त्याचे प्रदर्शन करण्याच्या काळाला हे साजेसे होतं. आपण करीत असलेले दान देखील कॅश करण्याची कला, हे तर या दानशूरांच्या यशस्वी आयुष्याचा रहस्य होतं.आणि हे समजण्याइतके विनायकराव सुज्ञ होते. त्यांना समजली नाही ती वारकऱ्यांची बदलेली पावलं. याच गोष्टींची खंत मनात ठसठसती घेऊन ते आज इथे बसले होते. गेल्या काही दिवसातील उलघालीचे क्षण ते परत न्याहाळायला लागले. जणू काही त्यातून ते स्वतःलाच नव्याने शोधत होते.
सलग चौथ्या वर्षी दुष्काळ मुक्कामाला थांबला होता. चार-दोन दिवसांनी एखाद्या शेतकऱ्यानं गळफास लावून स्वतःची सुटका करून घेतल्याच्या बातम्या रोज यायला लागल्या होत्या. अगतिकतेची ही भावना रोगाच्या साथीसारखी पसरायला लागली होती. निराधार होत असल्याची भावना विनायकरावांच्याही मनात प्रथमच घर करायला लागली. पालखीचा दिवस जवळ घ्यायला लागला तसतसे ते सैरभैर व्हायला लागले. कधी नव्हे तो प्रश्न पडला होता, दिंडीला भाकरी घालायच्या कशातनं ? गेल्या वर्षी मळ्यात झालेला ज्वारीचे बाचकं तर महिनाभरात संपलं होतं. त्या आधीच्या वर्षातल्या शिलकीच्या दाण्यावर दिवस कसेबसे रेटणं चाललं होतं. दिंडीसाठी तर शिलकीचा साठा वापरला अन् यावर्षी पाऊस झालाच तर पेरायचं काय आणि पीक येईपर्यंत घरी खायचं काय ? सांभाळायचं काय काय ? वारकरी की घर ? वाडवडिलांपासून माऊलीच्या नावानं मिळालेल्या या मळ्यानं दिंडीला जेवू-खाऊ घालायला बळ दिलं होतं. ते बळ सरल्यावर करायचं काय ? वारकऱ्यांच्या मुखी घालायचं तरी काय ? माऊली चरणाची पोहोचण्याची ही एकुलती एक वाट देखील मोडून टाकायची मग जगायचं तरी कशासाठी ? ना घराला पुरे पडतोय ना वारकऱ्यांना. लोळागोळा झालेलं हे आयुष्य कडेला पोहोचविण्याचा हट्ट कशासाठी ?चाळीस एकराचा हा मळा चाळीस वारकऱ्यांच्या दिंडीला एक वेळचीही भाकरी पुरविणार नसेल तर आपल्याला काय अधिकार आहे हे माऊलीचं धन सांभाळण्याचा ?एकाच प्रश्नाची विविध रूपातील भुतं रोजच फेर धरायला लागली होती.
सैरभैर झालेल्या मनातील वादळ नाहीसं झालं होतं ते अगदीच अनपेक्षितपणे. प्रतापने म्हणजे सौदामिनी बाईंच्या भावाने पालखीच्या चार दिवस आधी ज्वारीची दोन पोती, गव्हाचं एक पोतं, मटकीच बाचकं स्वतःच्या जीपमधून आणून घरात टाकलं होतं.तेव्हा नाराजीची एक बारीकशी आठी विनायकरावंच्या कपाळी नकळत आलीच होती. पै पाहुण्यांच्या दारात धान्यासाठी आजवर ते कधीच गेले नव्हते‌. एवढ्या दुष्काळात देखील गावातल्या गावात वाढी-दिढीनं ज्वारी बोलीवर घेतली होती. पण दहा मैलावर कॅनाल बागायतदार असलेल्या मेहुण्याकडे ते कधीच हात पसरायला फिरकले नव्हते. आत्ताच हे काम देखील सौदामिनी बाईंच्या निरोपानच झालं असणार याची त्यांना खात्री होती. ते काही बोलण्याआधीच प्रताप म्हणाला होता,
" दाजी मी स्वतः होऊन हे घेऊन आलोय. दिंडीसाठी आणलय. नाही म्हणून नका. पाहिजे तर वाडीदिढीनं दिलय असं समजा ."
प्रतापच्या खुलाशाने विनायकरांना गप्पच बसावं लागलं. माऊलीची इच्छा असेल तर हे ओझंही पुढच्या सुगीपर्यंत वागवलंच पाहिजे म्हणून ते गप्प बसले. चालत आलेली रीत आता तुटणार नाही याचे समाधानही त्या गप्प बसण्यात होतं.
या समाधानातच मारुती बुवांच्या दिंडीचे पत्र अजून आलं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. दिंडी प्रमुखाचं पालखीच्या मुक्कामाचे वेळापत्रक कळविणारे पत्र येत असे. इतक्या वर्षानंतर असं पत्र म्हणजे केवळ एक औपचारिकता झाली होती. काही वेळा तर पालखी येऊन गेल्यानंतर अशी पत्र मिळाली होती.
"पोस्टाचा गहाळपणा असेल यात" हे घरात सांगत रिवाजाप्रमाणे विनायकराव पालखीतळावर हजर झाले होते. पालखी दर्शनासाठी, दिंडीला जेवण देण्यासाठी नेहमीप्रमाणे घरातील सगळी जणच आली होती.पालखी दर्शन झालं, माऊलींच्या पादुकावर डोकं टेकून ठरल्या जागी दिंडीकऱ्यांची वाट पहात सगळेजण थांबले. पोरं मात्र पिपाण्या, रेवड्या घ्यायला पळाली.
विसाव्यासाठी पालखी थांबून तास होत आला तरी दिंडीतील कोणीही कसं फिरकले नाही ,म्हणून पालखीतळावर एक चक्कर मारून तरी बघावी म्हणून विनायकराव उठले.वारकरी जेवू घालायला,पालखी दर्शनाला आजूबाजूच्या दहा गावातील माणूस गोळा झालं होतं.मैल - दीड मैल लांबीच्या रस्त्यावर, बाजूच्या वावरात माणसांचा लोंढा पसरला होता.हौसे-गवसे- नवसे सगळ्यांचा पूर आलेला. त्यात भर पडली होती ती फिरत्या दुकानदारांची रेवडी फुगेवाल्यांची. हे कमी म्हणून की काय वारकऱ्यांना जेवू घालण्यासाठी ठिकठिकाणी मांडलेल्या मांडवांची दाटी झाली होती.तिथले लाऊड स्पीकर खच्चून किंचाळत होते.हे आता एक नवं खुळ वाढीला लागलं होतं. वर्षानुवर्ष झाडाच्या सावलीला दिंड्या जेवू घातल्या जात होत्या.तसा दोन तासांचा तर प्रश्न असे. कोण मांडव टाकणार आणि कोण स्पीकर लावणार ? पण गेल्या पाच सहा वर्षांपासून सगळंच चित्र बदललं होतं. पिढ्यानपिढ्या वारकऱ्यांसाठी भाकरी घेऊन येणाऱ्या विनायकरावांसारख्या अनेक जणांना आताच्या पालखीतळावर जागाच मिळायची मारामात होत असे. सहकारी दूध सोसायट्या, खरेदी विक्री संघ, सहकारी साखर कारखाने यांनी मांडव घालून आधीच जागा अडविलेली असायच.पाण्याचे टँकर, सदा सर्वकाळ कोकलत राहणारे लाऊड स्पीकर्स, त्यावरून चेअरमनचा चाललेला उदो उदो ----सगळा बाजारच झाला होता. संस्थेच्या खर्चानं वारकऱ्यांना अन्नदान करून स्वतःच्या नावे पुण्य लावण्यासाठी पुढाऱ्यांच्या चाललेल्या स्पर्धा उबग आणणाऱ्या होत्या.
या सगळ्याकडे निर्लेपपणे बघण्याची ताकद माऊलीने विनायक रावांना दिली होती. त्यामुळेच असल्या बाजारातही माऊलीच्या पादुका मनात वागवत, दिंडीतील कोणी दिसते का याचा शोध घेत ते फिरत होते. दिंडीचे प्रमुख पद गेल्यावर्षी पर्यंत तरी अण्णा बुवांकडे होतं .त्यांच वय झाल्याचं, ते थकल्याच गेल्याच वर्षी जाणवलं होतं. म्हणूनच नसत्या शंका मनात घेऊनच विनायकरावांचे डोळे भिरभिरत होते. तोच हिरामण म्हणजे अण्णाबुवांचा मुलगा दिसला. गेल्या काही वर्षापासून तो दिंडीत यायला लागला होता. गर्दीतून पुढे सरकत विनायकरावांनी त्याला गाठलं. हातातल्या मोबाईलवर तो कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत होतं. पाहून न पाहिल्यासारखं करीत निघालेल्या हिरामणला थांबवत विनाकारण म्हणाले,
" कुठे पत्ताय माऊली ? तास झाला वाट बघतोय तिकडं. सगळी मंडळी ताटकळलीत. चला चला लवकर ,--अण्णा बुवा कुठं आहेत? दिंडीतील बाकीची मंडळी दिसत नाहीत ती ?"
हातातल्या काडीने दात टोकरत हिरामण म्हणाला, "बुवांनी हातरुन धरलयं चार महिन्यापासून. ते कशाचं येत्यात आता ? पण दिंडी थांबविता येतीय का ? वारी चुकवायची नाही म्हणून आम्हीच आलोय बाकीची सगळी जण. जेवायचं म्हणाल तर विनायकराव हितनं पुढं आता तुम्ही त्रास घेत जाऊ नका. तुम्हाला बी झेपनासं झालेलं दिसतय दिंडीला जेवण घालायचं. तुमच्याच गावच्या भाऊसाहेब शिंदे यांच्याकडं --इथल्या साखर कारखान्याचे चेअरमन-- जेवण झालयं आत्ताच.तिकडनच येतोय बघा. मी बाकीची मंडळी, दिंडीतील आमची लोकं आहेत तिथेच अजून. लाडू मसाले भाताचे जेवण म्हटल्यावर दोन घास जादा जाणारच की.बाकी सगळं ठीकाय नव्ह ?"
पायाला खिळे ठोकल्यासारखे जागीच उभं राहून गप्प झालेल्या विनायकरावांना पाहून हिरामण पुढे म्हणाला,
" एवढे गप्प का होताय ? दिवस बदलले आता विनायकराव, चालायचच. उसळ भाकरी खातच पांडुरंगाची वारी केली पाहिजे असं कुठे लिहिलय ? चार चांगले घास दिंड्यांच्या मुखी पडणार असतील तर तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय ?" माऊलीची सेवा केलीस की तुम्ही इतकी वर्ष, ते कोण विसरणाराय का ? चलतो मी. जरा बाजूला जाऊन फोन लावतो घरी. या गर्दीत काही धडपणाने ऐकायला येईनासं झालय."
पाठमोऱ्या हिरामण कडे बघत उभा असलेल्या विनायकरावांना एवढ्या गर्दीतही एकटं,आधारहीन झाल्यासारखं वाटायला लागलं. एखाद्या निर्जन माळरानातून चालत आल्यासारखं, बधिरपणानं पाय ओढत ते घरच्या माणसांपर्यंत पोहोचले.
तिथं वावरात ढेकळातच पंगत बसली होती. पण पंगतीतला एकही जण वारकरी वाटत नव्हता. पत्रावळीवरच्या अन्नब्रम्हात मग्न झालेल्यांकडे रिकाम्या नजरेने पहात राहिलेल्या विनायकरावांना विश्राम म्हणाला,
"बापू कुठवर दिंडी वाल्यांची वाट बघत थांबायचं ? त्यांची कुठतरी सोय झाली असणारच बघा.म्हणून आईनं आणि मी विचार केला, पांडुरंगाच्या वाटेवर असणारा तो प्रत्येक जण वारकरीच की. टाळ पताका नसली म्हणून काय झालं ? मिळतय,ज्यांची पोटं भरलीत त्यांनाच खायला घालण्यापेक्षा कुठेच सोय नसणाऱ्यांना खायला घातलं तरी सेवा माऊलीचीच होणार आहे ना ? बदलत्या दिवसाबरोबर आपणही थोडसं बदलूया की. तुम्हाला विचारायला येणारच होतो. पण पालखी हलायची वेळ झाली. मग बसा म्हटलं या मंडळींना. माऊली,पांडुरंग घेतील समजून आपल्याला."
"घेतील. समजून घेतील नक्कीच. न समजायला ते काय माझ्यासारखा वेडे आहेत का ?" असं म्हणत विनायकरावांनी पंगतीत वाढण्यासाठी लापशीचे घमेल हातात घेतलं होतं.
Copyright - दिलीप नाईक निंबाळकर.