आत्मसामर्थ्य - मंत्र प्रतिसादांचा
"आत्मसामर्थ्य आणि आत्मविश्वास सतत आपल्या 'आत' असतो. मी मात्र त्याचा शोध बाहेर घेत होते!" Anna Freud ह्यांचे हे वाक्य स्फूर्ती देणारे, आत्मचिंतन करायला लावणारे आहे. जीवनातील संघर्षांना समर्थपणे तोंड देण्यासाठी, नवी ध्येये गाठण्यासाठी, संघर्षांना शरण न जाता धैर्यानी आव्हाने स्वीकारण्यासाठी ह्या दोनही गुणांची सतत गरज असते.
अजून एक विचार मांडू इच्छिते. गेल्या अनेक वर्षांपासून एक जीवनसूत्र वैयक्तिक स्तरावर खूप उपयुक्त ठरत आले आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वा घडून गेलेल्या घटना, इतरांच्या कृती वा उक्ती यांवर आपले यत्किंचितही नियंत्रण नसते. नियंत्रण केवळ तीन प्रमुख गोष्टींवर असते. आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो, कोणते प्रतिसाद निवडतो, वर्तनाचे कोणते पर्याय अमलात आणतो आणि ती परिस्थिती कशी हाताळतो, केवळ ह्यांवरच आपल्या जीवनाचा दर्जा अवलंबून असतो ! ज्यावेळी हे वैश्विक सत्य आपणांस पटेल तो आपल्या आयुष्याचा सुवर्ण क्षण मानावा! हे वाक्य मी स्वतःचे 'मिशन स्टेटमेंट' बनवले.
आत्मसामर्थ्य - मंत्र प्रतिसादांचा
दोन उदाहरणे देऊ इच्छिते. Viktor Frankle ह्या जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाचे, "Man's search for meaning' ह्या, जीवनाचा अर्थ शोधण्याच्या ध्यासाचे जगप्रसिद्ध पुस्तक. (ह्याचा डॉ. विजया बापट ह्यांचा 'अर्थाच्या शोधात' हे पुस्तक उपलब्ध आहे) प्रत्येक मानवाला स्फूर्तिदायक आहे. प्रतिसादांमधील सामर्थ्याचा तो मानदंड मानला जावा ! नाझी छळ छावणीतील अमानुष कृत्यांवेळी प्रत्येक क्षण भयानक अनिश्चितीचा असे. Viktor ह्यांना आज कोणत्या कामावर नेमले जाईल ते माहीत नसे. माणसांना ढकलून मारण्यासाठी नेण्यात येणाऱ्या विषारी भट्टीत काम करायचे आहे की मृतदेह खड्ड्यांमध्ये ढकलून देण्याच्या कामावर ! जगण्याचे मार्ग पूर्णतः खुंटलेले असताना एका क्षणी Viktor, नग्न अवस्थेत एका रिकाम्या खोलीत बसलेला असताना त्यांना झालेल्या साक्षात्कारानी त्यांचे आयुष्य बदलले! 'बाह्य परिस्थिती टोकाची प्रतिकूल आहे, माझ्या शरीराचे छळ करण्यावर त्यांचे नियंत्रण आहे. परंतु माझ्या मनावर नक्कीच नाही! " 'The last of human freedom' म्हणजे माझ्या विचारांवर, कल्पनाशक्तीवर माझे पूर्ण नियंत्रण आहे, हे त्यांना त्या क्षणी जाणवले ! नाझींचे छळ हे stimulas, म्हणजे बाह्य कारण, त्यावर मी काय प्रतिसाद द्यायचा ते पूर्ण स्वातंत्र्य माझ्या हातात आहे, हे प्रचंड नवे भान त्यांना त्या क्षणी झाले. स्वतःची ही अमर्याद शक्ती त्यांनी ओळखली. इथून बाहेर पडल्यानंतर, 'मी पुन्हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिकवत आहे, ह्या छळाच्या अनुभवांमधून मी काय शिकलो ते मुलांना कसे सांगेन ? त्यासाठी आपली कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती कशी वापरेन ?' ह्या नियोजनात त्यानंतर सातत्यानी व्यग्र झाल्यामुळे बाह्य प्रतिकूलतेवर ते पूर्ण मात करू शकले. एवढेच नव्हे, तर ही स्वप्ने त्यांनी स्वतःसाठी न ठेवता, किमान हजार कैद्यांना दिली. 'इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला काय नवे करायला आवडेल? ती स्वप्ने पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसे वाटेल?' हे विचार ते कैद्यांना देऊ लागले. कॅम्पमध्ये डांबून ठेवलेल्या ज्यू लोकांच्या नाईलाजाने कराव्या लागणाऱ्या छळाला कंटाळलेले नाझी सैनिकही त्यातून प्रेरित झाले ! छळछावण्यांमधील अनेकांचे जीवन Viktor ह्यांच्या ह्या सिद्धांतामुळे सुसह्य झाले ! प्रतिसाद वा प्रतिक्रिया देण्यामधील पर्यायांचे स्वतःमधील सामर्थ्य ओळखणे, जीवनाचे अर्थ शोधणे आणि त्यानुसार वर्तन, ह्या सर्वांचे महत्त्व माझ्या मते, पुनर्जन्माइतके अतुलनीय आहे !
दुसरे उदाहरण. पुण्याच्या 'मुक्तांगण' ह्या व्यसनमुक्ती केंद्रात मी स्वतः गेली २० वर्षे शिकवत आले. व्यसनामागची कारणे देताना तेथील अनेक निवासी, त्यांच्या घरच्या लोकांचे वर्तन, धंद्यातील चढउतार, शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी अशांना जबाबदार धरतात. परंतु थोडे अंतर्मुख होऊन विचार केल्यास जाणवेल की ह्याच समस्यांना तोंड देणारे सर्वच जण व्यसनाधीन होत नाही. घडलेल्या घटनेला हाताळण्यासाठी स्वतःचे आत्मसामर्थ्य ओळखण्याचे भान महत्त्वाचे. आपल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी आणि त्यामुळे वाट्याला येणारे चांगले वा प्रतिकूल जीवन ह्या मागे आपली Response Ability असते !
'7 Habits of the most effective people' ह्या Steven Covey च्या प्रसिद्ध पुस्तकात लेखक म्हणतो, 'Between stimulus and response there is a Gap, there is a Pause. Man has a freedom to choose!' अर्थातच Stimulus म्हणजे जीवनात घडणाऱ्या बाह्य घटना. घटना घडल्यानंतर त्यावरचे प्रतिसाद आणि वर्तन ह्यासाठी दोनांच्या मधला वेळ ओळखण्यात बुद्धिमत्ता आहे ! तसेच तत्क्षणी केलेली कृती वा उक्ती ती प्रतिक्रिया आणि विचारपूर्वक दिलेला तो प्रतिसाद होय हे जाणणेही महत्त्वाचे ठरते.
बुद्ध म्हणतो त्याप्रमाणे, घटनांवर तत्क्षणी 'अंध प्रतिक्रिया' देण्यामुळे होणाऱ्या पश्चात्तापापेक्षा विचारपूर्वक दिलेल्या प्रतिसादांचे सामर्थ्य महत्त्वाचे. त्यासाठी क्षण प्रतिक्षणाची सतर्कता हवी! जागृतावस्थेतील प्रत्येक श्वासालाही हे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य आपल्यात असते. घडलेली घटना पूर्णतः स्वीकारण्याची क्षमता वाढविणे गरजेचे होय. विशेषतः जेव्हा ती दुर्घटना असते त्या वेळी तर ह्या स्वीकार-क्षमतेचा कस लागतो ! अशा वेळी किती काळ दुःख करावयाचे, हतबलता जाणवू द्यायची? की ह्याच काळात मन प्रसन्न ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक काही वेगळे करावयाचे ?
अस्वस्थतेची वारंवारिता
खाली दिलेल्या आकृतीत ह्या अवस्थतेतून बाहेर येण्यासाठी एक उपाय उपयुक्त ठरेल. चित्त स्थिर मन शांत ठेवण्यासाठी मधे जर एक रेष ओढली आणि त्यावर वा जास्तीत जास्त त्याच्याजवळ कसे राहता येईल ही सजगता वाढविल्यास जीवनात अनेक फायदे मिळतीत. जसे : एकाग्रता, निर्णयक्षमता वाढणे, शरीर आणि मनाचे संतुलन, प्रतिसाद क्षमता वाढणे इ.
NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ह्या आधुनिक वर्तनशास्त्रामध्ये, झाल्या घटनेवर ती 'का किंवा कशी' झाली ह्याचा खल करण्यापेक्षा ती स्वीकारून त्यावर लवकरात लवकर मार्ग काढणे, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहिल -म्हणजेच Who पेक्षा How वर अधिक भर दिला आहे. ज्येष्ठ विचारवंत विद्याताई बाळ म्हणत, 'एका टप्प्यावर मला जाणवले की, समोर चाललेल्या प्रत्येक उक्ती, कृती किंवा घटनेवर मी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असे नाही ! शांतपणे समोरच्याचे ऐकून घेणेही खूप महत्त्वाचे असते !' म्हणजेच प्रतिसाद 'न देणे' हा पर्यायही परिपक्वतेचे लक्षण होय ! NLP तसेच Transactional Analysis ह्या मनोविश्लेषणात्मक थियरीचा अभ्यास आणि सराव, विपश्यनेद्वारे जीवनातील खडतर आणि जीवघेण्या क्षणांचाही स्वीकार ताकदीने करण्याचे जीवनसार व्यक्तीशः वारंवार अनुभवले. आयुष्यातील क्षणाक्षणांची अनित्यता आत्मसात करण्याचा सततचा प्रयत्न, ह्या जीवनानुभवांच्या आधारे ह्या पुस्तकातील बहुतांश लेख लिहिले आहेत.
दैनिक 'तरुण भारत', नागपूरचे मुख्य प्रबंधक श्री. धनंजयराव बापट ह्यांचा अचानक फोन आला आणि परिचय नसतानाही दैनिकासाठी स्तंभलेखन कराल का असे त्यांनी विचारले. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे २०२१ ते २०२२ ह्या वर्षभरात स्वानुभवांवर आधारित विविध स्वमदत कौशल्ये सविस्तरपणे मांडण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ मिळाले, ह्याचा आनंद झाला. लेख प्रसिद्ध झाला की लगेच अगदी सकाळी सकाळी विदर्भातील कानाकोपऱ्यातून विविध पार्श्वभूमीच्या आणि विविध क्षेत्रांमधील वाचकांचे फोन येत राहिल्यामुळे लेखन अनेकांना उपयुक्त वाटत असल्याचे समाधान मिळाले. ते क्षण निश्चितच सार्थक देणारे होते. अखेर ह्या लेखांचे पुस्तक करावे असे वाटले. पुण्याच्या 'मिळून साऱ्याजणी' मासिकात आलेला NLP ह्या प्रभावी वर्तनशास्त्राचा परिचय करून देणारा लेखही ह्यात अंतर्भूत केला आहे. ट्रेकिंग संबंधित 'लोकसत्ता', वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले लेख ह्यात अंतर्भूत केले आहेत.
आत्मसामर्थ्य - मंत्र प्रतिसादांचा
हे माझे पहिलेच पुस्तक आहे. १९९३ साली पत्रकारितेच्या कोर्सनंतर, महाराष्ट्राच्या विविध प्रतिथयश मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रे ह्यांमधून जवळजवळ ४०० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले. 'माहेर' आणि 'स्त्री' मासिकातील स्तंभलेखनाद्वारे, असेच स्वविकसनात्मक लेख प्रसिद्ध झाले. त्याचे पुस्तक काढावे असे वाटत होते. परंतु सत्य सांगायचे तर पुस्तकाला शीर्षक काय द्यावयाचे हे गेली अनेक वर्षे सुचत नव्हते! आत्ताही ह्याच कारणामुळे पुस्तक प्रसिद्ध होणे कठीणच वाटत होते. मग बऱ्याच विचार- मंथनांनंतर सदरचे शीर्षक ठरविले. जे वाचक हे पुस्तक हातात घेतील वा विकत घेतील त्या सर्वांची आभारी आहे. ह्या विविध सूत्रांच्या आधारे मी अनेक संकटांवर मात करू शकले, काही यशे संपादू शकले. तसाच उपयोग तुम्हालाही झाला तर प्रत्येक लेखाच्या वेळी झालेल्या प्रसववेदना आणि पुस्तकरूपातील ह्या अपत्याला जन्म देण्याचे सार्थक होईल असे वाटते !
ह्या पुस्तकातील लेखांच्या वाचनानंतर, दिलखुलासपणे दाद देणारे आणि पुस्तक प्रकाशित करण्यापासून ते वितरणापर्यंतची जबाबदारी आनंदाने स्वीकारणारे श्री. गुलाबराव सपकाळ ह्यांच्याशी झालेले संवाद हे व्यावसायिकतेपलीकडचे समाधान देणारे होते. त्यामुळे त्यांचे खास आभार. मुद्रणशोधक आणि छपाईचे काम संयमाने करणारे श्री. भंडारी यांचे विशेष आभार. पुस्तकाचा नेमका दर्जा लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यातील आशयालाही उठाव मिळेल असे मुखपृष्ठ बनविणारे सागर नेने यांचे खास आभार.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पुस्तकाचे वाचन आत्मियतेने करून त्यावर अभ्यासपूर्ण प्रस्तावना / अभिप्राय लिहिणारे दिग्गज, ज्येष्ठ आणि प्रसिद्ध पत्रकार, लेखक, गीतकार, संपादक श्री. विजय कुवळेकर, विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात स्वतःची एक आगळी ऊर्जा निर्माण करणारे निवृत्त सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी ह्यांचे मनःपूर्वक आभार. अजून पुढे 'तरुण भारत' मध्ये लिहित राहावे अशी उमेद देणारे अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल, 'तरुण भारत' नागपूरचे मुख्य प्रबंधक श्री. धनंजयराव बापट आणि ह्या आवृत्तीचे संपादक श्री. गजाननराव निमदेव ह्यांचे आभार तर आहेतच. परंतु ह्या दोघांशी नवे नाते निर्माण झाल्याचा आनंद मनापासून व्यक्त करते. पुस्तकातील प्रत्येक लेखावेळी सयुक्तिक सूचना देणारे माझे पती हिमांशू भट नवंगुळ, तसेच जगण्यास बळ देणाऱ्या आणि वेळोवेळी माझ्याबद्दलचा अभिमान आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या माझ्या दोन्ही मुली, मोहिनी पंड्या आणि मंजिरी लाटे ह्यांचा सहभाग आवर्जून नोंद करावयाचा आहे. अनेक वाचक, जवळचे मित्र, नातेवाईक ह्यांच्या अभिप्रायांमुळे लेखनास स्फूर्ती आणि प्रेरणा मिळत गेली. हे पुस्तक अनेकांपर्यंत पोहोचो आणि त्यापासून त्यांच्या जीवनाला उभारी मिळो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना ! सरतेशेवटी, 'दैनंदिन जीवनासाठी NLP' ह्या माझ्या आगामी पुस्तकासाठी देखील असेच सहकार्य मिळो, ही मनःपूर्वक विनंती.
आत्मसामर्थ्य - मंत्र प्रतिसादांचा पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.