पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया - या पुस्तकातून लेखकाचे मनोगत

तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी रेडिओ ऐकलाच असेल. आज अमूक वाजता आवडता कार्यक्रम ऐकायचाच असे ठरवून कदाचित दिवसभर वाट पाहात बसला असाल. पण ऐनवेळी रेडिओ लावायला थोडा उशीर झाला असेल आणि कार्यक्रमाचा काही भाग चुकला असेल. मग खूप हळहळ वाटली असेल. पण काय करणार? 'आकाशवाणी एकदाच होते' असे म्हणतात ना ! फिरायला जाताना, व्यायाम करताना हेडफोन लावून, इअरफोन लावून पुष्कळ गाणी ऐकली असतील पण सारखी तीच तीच गाणी ऐकण्यापेक्षा काही वेगळे ऐकायला मिळाले असते तर किती छान झाले असते, मनोरंजन झाले असते, ज्ञानात भर पडली असती, नेहमी पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असती असेही कधीतरी मनात आले असेल. तुम्ही मोबाईलवर यूट्यूबवर एखादे गाणे ऐकत आहात, किंवा एखादी मुलाखत ऐकत आहात, पण त्याच वेळेला व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेजही बघायचा आहे. पण दुसरी विंडो उघडली की यूट्यूब बंद पडते. तसे न होता व्हिडिओचा केवळ आवाज ऐकू येत राहण्याची सोय असती तर किती छान झाले असते असे त्या वेळी नक्की वाटलेअसेल. आणि कदाचित, रेडिओवरचा एखादा कार्यक्रम ऐकताना 'अरे, मलादेखील असा छान कार्यक्रम सादर करता येईल. माझ्याकडेही खूप काही सांगण्यासारखे आहे. पण मला कोण संधी देणार रेडिओवर?' असा विचार मनात आला असेल; आणि कदाचित व्यक्त होण्याची ऊर्मी दाबून टाकून फक्त श्रवणभक्ती करण्यावर समाधान मानावे लागले असेल. श्रोता म्हणून वाटणारी सगळी हळहळ; आणि एक सक्षम, पण योग्य संधी न मिळालेला सादरकर्ता म्हणून वाटणारी खंत एकाच वेळी दूर करू शकणारे माध्यम म्हणजे पॉडकास्ट. त्या माध्यमाचा सविस्तर परिचय करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. श्रोता म्हणून तुम्ही काय ऐकू शकता, आणि पॉडकास्ट निर्माते, सादरकर्ते म्हणून काय करू शकता या दोन्हींची माहिती या पुस्तकातून तुम्हाला मिळेल.

लेखिका - उज्ज्वला बर्वे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात अध्यापन) 

पुस्तकाचे आम्ही दोन्ही लेखक पॉडकास्ट या माध्यमाच्या आकंठ प्रेमात बुडालेले आहोत. उज्ज्वलासाठी रेडिओवरील वृत्तनिवेदिका ते पॉडकास्ट सादरकर्ती, आणि मग पॉडकास्ट अध्यापक हा प्रवास सतत काहीतरी शिकवणारा ठरला. तर मूलतः मार्केटिंगमध्ये असलेल्या नचिकेतसाठी पॉडकास्ट हा अचानक गवसलेला खजिना ठरला आहे. पहिला पॉडकास्ट ऐकल्यापासून अवघ्या तीन वर्षांत त्याने स्वतःचे सहा पॉडकास्ट सुरू करून, पॉडकास्टच्या कार्यशाळा घेण्यापर्यंतचा प्रवास झपाट्याने आणि झपाटल्यासारखा केला. मराठीतून पॉडकास्ट करणाऱ्यांचा गट स्थापन करून स्पॉटिफायसारख्या अग्रगण्य पॉडकास्ट सेवेला मराठी पॉडकास्टसाठी वेगळी लिंक सुरू करायला लावण्याचे काम त्याने यशस्वीरीत्या केले यावरूनच त्याचे या माध्यमावरचे प्रेम लक्षात यावे. आम्ही दोघांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पॉडकास्ट निर्मितीच्या काही कार्यशाळा आयोजित केल्या. त्या कार्यशाळांना उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु अशा प्रकारच्या कार्यशाळांची पोहोच मर्यादित असते. पुण्याबाहेरच्या मराठी भाषकांपर्यंत आम्ही कार्यशाळांच्या माध्यमातून पोचू शकत नाही; पण त्यांच्यातही अनेक उत्सुक पॉडकास्ट श्रोते आहेत, संभाव्य पॉडकास्ट सादरकर्ते आहेत हे आम्हाला माहीत आहे म्हणून आम्ही त्याविषयी पुस्तक लिहिण्याचा विचार केला.

नचिकेत क्षिरे ( मराठीतील प्रसिद्ध पॉडकास्टर व पॉडकास्ट कोच)

'पॉडकास्ट कसा करावा याविषयी खरे तर पॉडकास्टच करायला हवा होता तुम्ही!', असेही कुणी मनात म्हणतील. इंग्रजीत तसे अनेक पॉडकास्ट आहेत. मराठीत तरी हे पुस्तक लिहीपर्यंत तसा पॉडकास्ट आढळला नव्हता. पण प्रत्येक माध्यमाची उपयुक्तता आणि त्याचे सामर्थ्य वेगळे असते. आम्ही पॉडकास्ट या माध्यमाविषयी इतक्या तळमळीने बोलत असलो तरी तेच एकमेव आणि सर्वोत्तम माध्यम आहे असे अर्थातच आम्हाला अजिबात वाटत नाही. पुस्तकांची जादू वेगळीच असते हे आम्हीदेखील सतत अनुभवतो. आणि काय सांगावे, या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्हीच त्याच्यावर आधारित पॉडकास्ट करू ! साध्या सोप्या भाषेत, गप्पा मारत पॉडकास्टबद्दल माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात शक्यतो इंग्रजी शब्दांचा वापर टाळण्याचा प्रयत्न असला तरी तंत्रज्ञानाशी संबंधित इंग्रजी संज्ञा, शब्द वापरणे कधीकधी जास्त सोयीचे वाटते. 'पॉडकास्ट' हाच शब्द बघा ना. त्याच्यासाठी मराठी शब्द अजून तयार झालेला नाही; आणि ओढूनताणून तसा शब्द तयार करावा का हादेखील प्रश्न आहे. रेकॉर्डिंग, एडिटिंग, मिक्सिंग, होस्टिंग, अपलोड, डिरेक्टरी, प्लॅटफॉर्म असे अनेक शब्द या पुस्तकात पॉडकास्ट निर्मितीची प्रक्रिया समजून घेताना समोर येतील. पहिल्या वेळी त्यांचा अर्थ मराठीत स्पष्ट करून सांगितलेला आहे, किंवा त्यासाठी मराठी प्रतिशब्द वापरला आहे; पण नंतर स्पष्टीकरणाच्या ओघात इंग्रजी शब्द वापरले आहेत. खूप काटेकोरपणे पाहायला गेले तर पॉडकास्ट फक्त श्राव्य स्वरूपातीलच असतात असे नव्हे. दृकश्राव्य म्हणजे व्हिडिओ पॉडकास्टदेखील असतात. पण पॉडकास्ट या शब्दाचा बहुतांश वेळा श्राव्य आशयाशी संबंध जोडला जातो, आणि त्या रूपातच हे माध्यम जास्त लोकप्रिय झाले आहे. ते तसे असल्यामुळे त्याची निर्मिती सगळ्यांच्या आवाक्यात आली आहे, आणि त्याचा आस्वाद घेणे सुलभ झाले आहे. त्यामुळे या पुस्तकात पॉडकास्टचा केवळ श्राव्य माध्यम म्हणूनच विचार केला आहे. हे पुस्तक लिहिण्यामागे आमचे दोन मुख्य हेतू आहेत. जे लोक अद्याप पॉडकास्टचे श्रोते झालेले नाहीत, अशांना या अद्भुत विश्वाची माहिती देणे, श्रोते म्हणून हे माध्यम त्यांना काय देऊ शकते, याची जाणीव त्यांना करून देणे हा पहिला हेतू आहे. पण दुसरा आणि जास्त महत्त्वाचा हेतू असा आहे की ज्यांच्याकडे आशय, सादरीकरणाचे कौशल्य, तंत्रज्ञानाची जाण आणि चिकाटी आहे, ज्यांना पॉडकास्ट निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची इच्छा आहे अशांना प्रेरणा मिळावी, त्यांना सर्व प्रकारची मदत व्हावी. आमचा भर व्यक्तिगत पॉडकास्ट निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवण्यावर आहे. या क्षेत्रात काही पॉडकास्ट निर्मिती कंपन्याही उतरल्या आहेत. त्या व्यावसायिक स्तरावर पॉडकास्ट निर्मिती करतात. त्यांची पॉडकास्ट निर्मितीची पद्धत या पुस्तकात सांगितल्यापेक्षा वेगळी असू शकेल याची आम्हाला जाणीव आहे. एकट्याने स्वतंत्रपणे, व्यक्तिगत पातळीवर पॉडकास्ट करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला विविध अडचणी भेडसावतात, तिच्यासमोर अनेक प्रश्न असतात. 'मला पॉडकास्ट करायचा आहे; पण कोणत्या विषयासंबंधी करावा सुचत नाही', 'विषय आहे; पण मांडायचा कसा माहीत नाही', 'ते सगळे आहे; पण वेळ नाही', 'वेळ आहे; पण रेकॉर्डिंग-एडिटिंग करता येत नाही', 'रेकॉर्डिंग-एडिटिंग एक वेळ जमेल पण पॉडकास्ट अपलोड कसा करायचा वगैरे माहीत नाही' अशा सगळ्या खऱ्या आणि आभासी अडचणींवरचे उपाय या पुस्तकात सापडतील अशी आशा आहे.


पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 

एखाद्या उपक्रमाची कल्पना मनात येणे आणि तो प्रत्यक्षात येण्यासाठी सर्व गोष्टी छान जुळून येणे किती आनंदददायी असते याचा अनुभव आम्ही या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेदरम्यान घेतला. 'नीम ट्री पब्लिकेशन'च्या प्रकाशिका द्वितीया सोनावणे याही पॉडकास्ट सादरकर्त्या आहेत. त्यांचा 'ग्रंथप्रेमी' हा पॉडकास्ट लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्हाला त्यांना पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना, त्याची गरज यांविषयी काहीही सांगावे लागले नाही. त्यांनी संपूर्ण लेखन आणि मांडणीप्रक्रियेत जातीने लक्ष घालून पुस्तक देखणे व्हावे यासाठी मनापासून प्रयत्न केले. अक्षरजुळणी आणि मांडणीकार श्री. रमेश भंडारी पुस्तक निर्दोष व्हावे यासाठी जातीने त्यात लक्ष घालतात. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आम्हालाही झाला. पुस्तकाचे ब्लर्ब आणि प्रस्तावना यांमुळे पुस्तकाला खरी शोभा येते. त्या दोन्हींसाठी आम्हाला सुयोग्य व्यक्ती लाभल्या याचा विशेष आनंद आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक खासदार कुमार केतकर हे काळाच्या बरोबर असलेले, नवनवीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारे विचारवंत आहेत. त्यांनी देखील पॉडकास्टिंग या उभरत्या माध्यमाचे स्थान ओळखले आहे, आणि ते स्वतः नियमितपणे काही पॉडकास्ट ऐकतात. त्यांनी या पुस्तकाचे महत्त्व ओळखून त्याचा पुरस्कार केला यावरून आम्ही एक आवश्यक व उपयुक्त विषय वाचकांपुढे मांडत आहोत असा विश्वास आम्हाला मिळाला. ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार उत्तम लेखक आहेत, आणि विशेष म्हणजे 'कौशलकट्टा' व 'महाभारत आणि मी' या दोन लोकप्रिय पॉडकास्टचे ते सादरकर्ते आहेत. त्यांची प्रस्तावना म्हणजे पॉडकास्ट या माध्यमाचा मोजक्या शब्दांत घेतलेला वेध आहे. या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. आमचे कुटुंबीय नेहमीच आमच्या सर्व उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देतात, आवश्यक ती सर्व मदत करतात. या पुस्तकाच्या प्रक्रियेतही त्यांचे मोलाचे योगदान आहे.

पॉडकास्टींग डिजिटल आवाजाची दुनिया ( Podcasting Digital Avajachi Duniya  ) उज्ज्वला बर्वे , नचिकेत क्षिरे ( Ujvala Barve , Nachiket Kshire ) Cover Page

( पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया पुस्तक - नीम ट्री पब्लिशिंग हाऊस -२५०/- रु


हे पुस्तक वाचल्यानंतर सुजाण, चोखंदळ पॉडकास्ट श्रोते तयार होतील, ते अधिकाधिक मराठी पॉडकास्ट ऐकू लागतील, मग त्यामुळे उत्तमोत्तम मराठी पॉडकास्ट तयार होतील या आशेसह तुम्हाला घेऊन जात आहोत पॉडकास्ट विश्वाच्या अनोख्या सफरीवर!!

उज्ज्वला बर्वे । नचिकेत क्षिरे

पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.