१४ एप्रिल २०१४. बी. व्ही.जी. इंडिया कंपनीच्या वार्षिक परिषदेत अरुणिमा ऊर्फ सोनू सिन्हांचं भाषण सुरू झालं.अगदी थेटपणे, अनलंकृत भाषेत त्यांनी आपली हृदयद्रावक आणि चित्तथरारक कहाणी ऐकवली, तेव्हा काही श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले,तर कुणाला अश्रू अनावर झाले. समारोप करताना अरुणिमाजींनी पुढील काव्यपंक्ती उद्धृत केल्या.


अभी तो इस बाज की
असली उडान बाकी है ।
अभी तो इस परींदेका
असली इम्तिहान बाकी है ।
अभी अभी मैने लांगा है समुंदरोंको
अभी तो पूरा आसमान बाकी है ।

कंपनीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आभारप्रदर्शन करण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनाही गहिवरून आलं. कंपनीच्या सदिच्छा दूत होण्याचं अरुणिमा सिन्हा यांनी मान्य केल्याची घोषणा त्यांनी केली तेव्हा टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. कार्यक्रमानंतर भेटल्यावर, आपलं आत्मकथन इंग्रजीतून पेंग्विन इंडिया प्रसिद्ध करणार असल्याचं अरुणिमाजींनी सांगितलं, तेव्हा मी पटकन बोलून गेलो,“त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करायला मला खूप आवडेल, कारण तुमची ही स्फूर्तिदायक कहाणी महाराष्ट्रातल्या तरुणाईपर्यंत जायलाच हवी. त्या म्हणाल्या,"नक्की" त्यानंतर आमची भेट झाली तेव्हा त्या आफ्रिका खंडातलं सर्वोच्च शिखर किलीमंजारो २५ नोव्हेंबर २०१४ रोजी सर करून नुकत्याच परतल्या होत्या.तिरंग्याबरोबरच बी. व्ही. जी.चा ध्वजही किलीमंजारो शिखरावर फडकवल्याची बातमी त्यांनी दिली.'मला एवढ्यावरच थांबायचं नाही.सात खंडातल्या प्रत्येकी सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न मी पाहते आहे', त्या म्हणाल्या. त्या आधी युरोपमधील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूसची मोहीम २५ जुलै २०१४ रोजी फत्ते झालेली होती. ऑस्ट्रेलियातलं माऊंट कोशिस्को त्यांना खुणावत होतं.इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचा विषय मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे काढला. "अवश्य" त्या म्हणाल्या, "आधी ते पुस्तक बाहेर तर पडू द्या!"


पद्मश्री डॉ. अरुणिमा सिन्हा जगातील पहिली  विकलांग महिला जिने केलं ऐवरेस्ट सर केले

१२ डिसेंबर २०१४. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीत 'बॉर्न अगेन ऑन द माउंटन (Born Again on the Mountain) च प्रकाशन झाल .आणि थोड्याच दिवसांत,त्याची प्रत अरुणिमाजींनी मला पाठवून दिली. ई-मेल आणि टेलिफोनवरून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो.दरम्यान प्रफुलता प्रकाशनचे श्रीपाद सपकाळ आणि त्यांचे उत्साही पिताजी गुलाबराव यांनी मराठी पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी आनंदाने उचलली होती. मला रॉयल्टीत वाटा नको आहे, प्रकाशक जी काही रॉयल्टी देतील ती सगळी तुम्हीच घ्यावी.”असं मी अरुणिमाजींना सांगितलं तेव्हा क्षणाचाही विलंब पुस्तक न लावता त्या म्हणाल्या, “मानधन तर मलाही नकोय.जास्तीत जास्त मराठी वाचक विशेषत: विद्यार्थी आणि युवती यांच्यापर्यंत ते पोहोचावं, म्हणजे झालं.” या पुस्तकाची सगळी रॉयल्टी अरुणिमा फाऊंडेशनला देण्याची सूचना गुलाबरावांनी केली. त्यामुळे या पुस्तकाची प्रत विकत घेणाऱ्या प्रत्येक वाचकाला आपण चंद्रशेखर आझाद अपंग क्रीडा संकुलाच्या उभारणीत खारीचा वाटा उचलल्याचं समाधान मिळावं अशी त्यांची भूमिका होती. अरुणिमाजींनी त्याला तत्काळ होकार दिला! त्यांचे आभार कसे मानावे ते मला कळत नाही.
मी यापूर्वी भाषांतराचं एकही काम केलेलं नाही.असं असतानाही, अरुणिमाजींनी मला परवानगी दिली हा त्यांचा मोठेपणा. त्या व त्यांचे सहलेखक मनीष चंद्र पांडे यांनी साध्या परंतु अत्यंत प्रवाही आणि प्रभावी इंग्रजीत लिहिलेलं पुस्तक वाचकांच्या काळजाचा ठाव घेतं. त्याचा अनुवाद करणं हे माझ्यासारख्या नवथर भाषांतरकाराच्या दृष्टीनं एक आव्हानच होते. पुस्तक मुळांत मराठीतच लिहिलं असल्यासारखं वाटावं आणि प्रत्येक वेळी मराठी प्रतिशब्द वापरण्याच्या अट्टाहासामुळे ते क्लिष्ट होऊ नये हीच दोन सूत्रं स्वीकारून मी लिहीत गेलो. गिर्यारोहणातल्या काही तांत्रिक गोष्टी आणि शब्दप्रयोग याबाबत मला माझे गिर्यारोहक मित्र आणि लेखक वसंत लिमये यांची खूप मदत मिळाली. माझ्या या पहिल्यावहिल्या प्रयत्नाला वाचकांकडून कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता मला लागून राहिली आहे.

 

इंग्रजी पुस्तकाचं बॉर्न अगेन (Born Again) हे शीर्षक वाचताच मला कै. सुधीर मोघे यांच्या 'एकाच या जन्मी जणू, फिरूनी नवी जन्मेन मी' या सुप्रसिद्ध गीताची आठवण तीव्रतेनं झाली. त्या गीताचा मुखडा किंचित बदलून मी मराठी शीर्षक मुक्रर केलं. आज सुधीर मोघे हयात असते तर दिलखुलासपणे हसत त्यांनी माझ्या या 'चौर्या'वर पसंतीची मोहोर उठवली असती, हे नक्की! त्यांचं ऋण मान्य करायलाच हवं.ईश्वर, नियती, पुनर्जन्म या संकल्पना मला अगदी अगम्य आणि अगाध वाटतात. त्यांच्यावर गाढ श्रद्धा किंवा त्यांना ठाम नकार यांच्या सीमारेषेवर मी अद्याप तरी घुटमळतो आहे. अरुणिमाजींच्या जगावेगळ्या आयुष्याची पटकथा खरंच नियतीने लिहून ठेवलेली असेल (तसं त्या स्वतःच म्हणतात) तर नियतीच्या कल्पनाशक्तीची तारीफ करावी तेवढी थोडीच! फार तर तिचा लखनौ-दिल्ली रेल्वेप्रवास अनपेक्षितपणे कुंठावा आणि क्षणार्धात, तिने मृत्यूचा दरवाजा ठोठवावा या दुर्घटनेचं श्रेय आपण नियतीला देऊ शकतो; परंतु त्यानंतर, कुणीही थक्क होऊन तोंडात बोटं घालावीत असा जो अचाट पराक्रम या तरुणीनं केला, तोही पूर्वनियोजित असेल यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तिच्या जिद्दीचं आणि मनोबलाचं मुक्तकंठानं कौतुक करताना कुठंतरी नियतीआणि ईश्वरी कृपा यांची गालबोटं लावण्याचं पातक माझ्या तरी हातून घडणार नाही. मानवी बुद्धीला जे जे काही अनाकलनीय ते ते सारं नियतीच्या ओटीत घालून मोकळं होणं ही एक सोईस्कर पळवाट आहे, असंच मला वाटतं.
माझे ज्येष्ठ मित्र मनोहर सप्रे यांनी आपल्या प्रगल्भ प्रस्तावनेला दिलेलं “येथे ओशाळली नियती...' हे शीर्षक मला मनोमन पटलं. त्यांच्याकडे इंग्रजी पुस्तकाची प्रत रवाना करताना, मी फोनवरून 'मराठी अनुवादाला तुम्ही प्रस्तावना लिहावी' अशी विनंती त्यांना केली आणि ती त्यांनी तत्काळ मान्यही केली. त्यांचे आभार मानावे तितके थोडेच.
प्रकाशनाच्या बाळंत-कळा गुलाबराव आणि श्रीपाद सपकाळ यांनी हौसेनं सोसल्या. त्यांची तत्परता आणि आत्मीयता याचा प्रत्यय साक्षेपी वाचकांना या पुस्तकाच्या पानोपानी येईल, याची मला खात्री वाटते. 'पद्मश्री' अरुणिमा सिन्हांची ही लोकविलक्षण कहाणी वाचून, आपल्या कमनशिबापुढे हतबल आणि हतबुद्ध झालेल्यांचं नैराश्य दूर झालं आणि 'ज्याचा त्याचा हिमालय' शोधून त्याला गवसणी घालण्याची इर्षा त्यांच्या मनात जागृत झाली तर फक्त मलाच नव्हे, तर खुद्द अरुणिमाजींनाही अत्यानंद होईल. इंग्रजी पुस्तक लिहून पूर्ण झाल्यानंतरचा कथाभागही तेवढाच आश्चर्यकारक आणि रोमहर्षक आहे. ह्यांतील काही घटना वाचकांच्या माहितीकरता नोंदविण्याची संधी मी घेतो आहे.

 


जगाच्या सात खंडांतील प्रत्येकी सर्वोच्च अशा शिखराच्या समुहाला सप्तशिखर (Seven Summits) अशी संज्ञा आहे. ही सातही शिखरं पादाक्रांत करण्याची चाकांक्षा अनेक साहसी गिर्यारोहकांना खुणावते. एव्हरेस्ट विजयानंतर अरुणिमाला या नव्या आव्हानानं भारून टाकलं. अद्याप एकाही विकलांग व्यक्तीला हा विक्रम साधता आलेला नाही हे लक्षात येताच, तिनं गिर्यारोहणातल्या ह्या अश्वमेध यज्ञाचा संकल्प सोडला! युरोप खंडातील माऊंट एलब्रूस,    आफ्रिकेतील किलीमंजारो, ऑस्ट्रेलियातील कोशिस्को आणि दक्षिण अमेरिकेतील ॲकॉन्कागुआ या मोहिमा सुखरूप पार पडल्या. या मोहिमांचे प्रायोजक बी.व्ही.जी. इंडिया लि. होते. आता तिची नजर उर्वरीत दोन शिखरांवर खिळली आहे. नजीकच्या भविष्यकाळात ह्या नव्या विश्वविक्रमाची नोंद तिच्या नावावर व्हावी, यासाठी सर्व वाचकांतर्फे हार्दीक शुभेच्छा! या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी, अरुणिमाला पद्मश्री किताबाची घोषणा झाली आणि ३० मार्च २०१५ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते तिने तो स्वीकारला. दरम्यान अरुणिमाला गिर्यारोहणातील अत्यंत मानाचा तेनझिंग नोर्गे हा पुरस्कार मिळाला.

-- प्रभाकर दत्तात्रेय करंदीकर (फिरुनी नवी जन्मले मी या पुस्तकाच्या मनोगतातून)

 
 -- प्रभाकर दत्तात्रेय करंदीकर- लेखक  (उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म.प्र.से विभागीय आयुक्त पुणे)


                              फिरुनी नवी जन्मले मी या पुस्तकाचा अभिप्राय


फिरुनी नवी जन्मले मी  दुनिया पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.