ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या महाभारत मालिकेमुळे महाभारतातील पात्र घराघरात पोहोचली. सध्या, लॉकडाउन मुळे पुन्हा एकदा महाभारत मालिकेचे प्रसारण चालू झाले आहे. मालिकेमुळे आपल्याला कृष्ण, कर्ण, अर्जुन, भीष्म, भीम, द्रोणाचार्य, युधिष्ठिर आणि आणखी काही पात्र चांगली वाटली, आवडली. आपण त्यांच्या प्रेमात पडलो. पण, दुर्योधन, शकुनी, दुःशासन हे खलनायकच वाटले. आणि सगळं महाभारत होण्याला कारणीभूत असणारा दुर्योधन नेहमी आपल्या तिरस्काराचा पात्र ठरला.
आपल्याला माहीत असलेला दुर्योधन -
लहानपणी भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणारा...
पांडवांना लाक्षागृहात जाळून मारणारा...
द्यूतक्रीडेमध्ये फसवून त्यांचं राज्य लुबाडणारा...
द्रौपदीच्या वस्त्रहरणाला कारणीभूत ठरणारा...
शेवटपर्यंत पांडवांचा दुस्वाह करणारा...
आणि शेवटी महाभारताच्या युद्धात प्रचंड संहाराला कारणीभूत ठरणारा...
पण खरंच, एखादा माणूस एवढ्या हीन पातळीवर जाऊ शकतो का? का त्याने एवढ्या टोकाची भूमिका घेतली? का तो एवढ्या मोठ्या युद्धासाठी तयार झाला? का त्याने पांडवांचा अधिकार नाकारला? का त्याने कुरुच्या राज्याचा सुईच्या टोकावर मावेल एवढा धूलिकणही देण्यास नकार दिला?
दूरदर्शनवरचे महाभारत, श्री कृष्णा, महारथी कर्ण, पाच सहा वर्षांपूर्वी स्टार वर प्रसारित झालेली महाभारत, सोनी वरील सुर्यपूत्र कर्ण या मालिका पहिल्या. पण, दुर्योधन असा का वागला याचं खरं कारण कळलंच नाही. तो कसा होता? त्याचा स्वभाव कसा होता? का तो पांडवांचा एवढा तिरस्कार करत होता? हे मात्र अनुत्तरित राहिलं. त्यासाठी आधी दुर्योधन आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि म्हणुन काका विधाते यांची कादंबरी नक्कीच वाचली पाहिजे.
मृत्युंजय वाचलं कर्ण कळला, आवडू लागला. युगंधर वाचलं कृष्ण आवडू लागला. काका विधाते यांचे दुर्योधन बरेच दिवस वाचायचं मनात होतं. कोरोनामुळे लॉकडाउन झालं आणि दूरदर्शनवर पुन्हा एकदा महाभारत मालिकेचं प्रसारण चालू झालं. आणि दुर्योधन वाचायचा योग आला. श्रीमानयोगी नंतर एकाच पुस्तकात हजारच्या वर पानं असलेली ही कादंबरी.
कादंबरीची सुरुवात द्रुतराष्ट्राच्या कथनाने होते. ज्याप्रमाणे सावंतांच्या मृत्यूंजयमधील पात्र आपल्याशी बोलत असतात अगदी त्याच पद्धतीने द्रुतराष्ट्र, दुर्योधन, दुःशासन, भानुमती, कर्ण, कृष्ण आणि शेवटी अश्वत्थामा हे सर्व आपल्याशी बोलतात. स्वतःची कहाणी सांगतात. वाचताना आपण त्या त्या पात्राशी इतकं एकरूप होऊन जातो की, ते सगळं आपण स्वतःच अनुभवत आहोत की काय असे वाटू लागते!
कादंबरीमध्ये लेखकाने सर्वांनाच मानवाच्या पातळीवर आणून स्वतःच्या पराक्रमाने मोठं दाखवलं आहे. कुणालाही दैवी शक्ती वगैरे आहे, देवांचे अवतार, पुत्र, वरदान, शाप वगैरे असल्या तथाकथित भाकड कथांना पुस्तकात अजिबात स्थान नाही. त्या कथा कशा प्रचलित झाल्या? त्यांतला फोलपणा लेखकाने नेमका सांगितला आहे. आणि त्यामुळे पुस्तक नक्कीच वाचनीय झालेले आहे.
दुर्योधनाच्या बाबतीत घडलेल्या बऱ्याचश्या प्रकरणांमध्ये विदुराचा कसा हात होता, हे लेखकाने खंबीरपणे मांडले आहे. काही दाखलेही दिलेले आहेत. आणि ते पटण्यासारखे आहेत. विदुर हा नेहमी कौरवांचा विरोधी तर पांडवांच्या बाजूने दाखवला आहे. दुर्योधन आणि त्याच्या भावांचा नेहमी तिरस्कार, अपमान करताना, त्यांना प्रत्येक गोष्टीत विरोध करताना दिसतो. ते पांडवांना दैवी शक्ती प्राप्त झाली आहे, ते देवांचे पुत्र आहेत आणि नेहमी त्यांचे गुणगान गाताना, दुर्योधनावर खोटे आरोप, अफवा, कट करून फसवणे अशा नाना प्रकारे त्याचा मानभंग करताना, त्याला तुच्छ लेखताना, नेहमी विरोध करताना दिसतो.
ना द्रोपदीला वस्त्रहरणावेळी आकाशातून कृष्णाने कसलीही वस्त्रे पुरवली. ना द्रौपदी, दृष्ठद्युमन यज्ञातून जन्मले. ना अर्जुन हा कुणी देवाचा मुलगा होता. ना त्याच्याकडे कसलीही अद्भुत अस्त्रे होती, नाही कसली दैवी शक्ती. तेच युधिष्ठिर, कर्ण, भीम, दुर्योधन यांच्या बाबतीतही. एकट्या गांधारीला शंभर पुत्र झाले नसून तिचे सात, आठ, काही दासींकडून झालेले आणि बरेचसे सांभाळायला घेतलेली मुलं, असे मिळून शंभर कौरव होते. गांधारीच्या आशीर्वादाने ना दुर्योधनाचे शरीर वज्राचे झाले. ना कर्णाकडे कसलेही अभेद्य कवच होतं. ना भीमाला नागलोकातून वासुकीकडून कसली दैवी शक्ती मिळाली. ना हनुमानाने भीमाला कसली दैवी शक्ती दिली. ना तो अर्जुनच्या रथाच्या ध्वजावर जाऊन बसला. ना अश्वत्थामाच्या डोक्यावर कसला मणी होता. अश्या कोणत्याही भाकड कथा पुस्तकामध्ये नाहीयेत. त्यामुळेच सगळी पात्र अगदी वास्तव आणि आपल्यातलीच असल्यासारखी वाटतात.
कृष्णाचा भाग खूपच तत्वज्ञानाचे डोस पाजल्यासारखा वाटतो. हे सर्व माझ्या मर्जीने होते आहे. मला सर्वकाही माहीत असल्यासारखं दाखवलं आहे. थोडंस कंटाळवाणे वाटते. पांडवांनी राज्य नाही निदान पाच गावे मागून संधी करण्यासाठी कृष्णाला सांगितले होते. पण कादंबरीमध्ये कृष्णाने याचा शांती प्रस्तावामध्ये उल्लेख केलेला कुठेही नाहीये. भीम हा बलशाली पण रागीट आणि रानटी दाखवला आहे. आपल्या शत्रूंना तो कसलीही दयामाया दाखवत नाही किंवा त्यांना मारण्यासाठी कसलेही नियम पाळत नाही. भलेही शत्रूने पराभव स्वीकारला असेल किंवा अभयदान मागत असेल, भीम त्यांना क्रौर्याने मारताना दाखवला आहे. युधिष्ठिर हा नेहमी साधू संतांच्या संगतीत, धर्माच्या गोष्टी करण्यात, यज्ञ करण्यात मग्न दाखवलेला आहे. सदा इतरांना धर्माचे, उपदेशाचे डोस पाजताना दिसतो. बाकीचे भाऊ त्याच्या हो ला हो म्हणणारे नंदी बैल असल्यासारखे वाटतात. स्वताची कसलीही मते नसणारा, निर्णय क्षमता शून्य असणारा असा अर्जुन नेभळट वाटतो. नेहमी मोठ्या भावांवर आणि कृष्णावर अवलंबून असलेला वाटतो. किंबहुना सर्व पांडव दिशाहीन, भरकटलेले, स्वतःची कसलीही मतं नसलेले, निर्णय क्षमता नसलेले, नेहमी कृष्णाच्या मतावर विसंबून असणारे वाटतात.
याउलट, दुर्योधन स्वतःची वेगळी मतं असणारा, राजकारण धुरंधर, जबरदस्त निर्णय क्षमता, प्रसंगी मोठ्यांशी वाद घालणारा, आपल्या निर्णयांवर ठाम असणारा, गदायुद्धामध्ये कौशल्य, निपुणता आत्मसात केलेला, राज्याच्या विभागणीच्या विरोधात असणारा, पांडवांचा विरोध करणारा पक्का द्वेष्टा दाखवला आहे. आता कादंबरीच त्याच्यावर लिहिली म्हटल्यावर इतरांना खलनायक ठरवून त्याला नायक करण्याचा प्रयत्न असू शकतो. भानुमातीचा भाग अगदी उत्कंठावर्धक आणि वाचण्यासारखा झाला आहे. त्यावेळी दुर्योधनाचा मानी स्वभाव, तिच्यासमोर तो नेहमी शांत, समंजस, तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
कर्ण त्याच्यावर लहानपणापासून झालेल्या पक्षपातीपणामुळे, अपमानामुळे, आपल्या जन्माच्या रहस्यामुळे गोंधळलेला दिसतो. स्वतःच्या जिद्दीवर, आत्मविश्वासाने त्याने धनुर्विद्येत प्राविण्य मिळवलेले आहे. पांडवांनी, द्रौपदीने केलेल्या अपमानामुळे तो नेहमी त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा, बदला घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. अर्जुनाशी स्पर्धा करताना दिसतो. जन्माचे रहस्य कळल्यावर तर तो अगदी निराश, हताश झालेला वाटतो. शेवटच्या युद्धामध्ये कर्ण जेव्हा जेव्हा पांडवांना पकडतो तेव्हा तेव्हा त्यांच्या गळ्यात धनुष्य अडकवतो आणि काहीतरी सुनावून सोडून देताना दाखवला आहे. (मृत्युंजयमधेही असेच काहीसे आहे.) युद्धामध्ये प्रत्यंचा तोडली, धनुष्य तोडले, सारथी मारला, घोडे मारले हे सारखं सारखं येत राहतं. काही योद्धे बेशुद्ध पडून, जखमी होऊनही पुनः पुन्हा रणांगणात सामोरे येताना दिसतात.
दुर्योधनाच्या जन्मावेळी विदुराने रचलेल्या भंपक रंजक कथा. म्हणे, वादळी पाऊस झाला, कुत्रे, कोल्हे व्हीवळू लागले, जन्मतःच गाढवसारखं आवाज काढला, वगैरे वगैरे. युवराज युधिष्ठिरच असावा, राज्यावर त्यांचाच हक्क असावा म्हणून द्रुतराष्ट्राला अशुभ मुहूर्तावर जन्मलेल्या अपशकुनी मुलाचा त्याग करण्यासाठी सांगणे. जनतेमध्ये अश्या अफवा पसरवणे. कुठलंही मुलं हे जन्मतः कलंकी, अपशकुनी, कुलक्षणी कसं काय असु शकत? कुमार वयामध्ये कणिक या मंत्र्यामुळे दुर्योधनाला मिळालेली सद्य राजकारणाची शिकवण, तो जीवनभर विसरू शकला नाही. आणि त्यानुसारच त्या वर्तन, वागणे केले.
कुंतीच्या पुत्रांना राज्याचा हक्क मिळावा, म्हणून सतत त्यांचे गुणगान गाणे. त्यांचा जन्म देवांपासून झाला आहे, दैवी शक्ती मिळाली आहे अशा बतावण्या करत राहणं. त्यासाठी द्रुतराष्ट्राच्या मुलांचा सतत अपमान, तिरस्कार करणे, लहानसहान गोष्टींवरून लावालाव्या करणं, सतत टोमणे मारणे, धर्माचे डोस पाजणे, दुर्योधन कसा नालायक आहे, हा सततभीष्म, गांधारी आणि धृतराष्ट्रासमोर घोकणे. यासगळ्यांचा परिणाम दुर्योधनाच्या मनावर होणे स्वाभाविक होते.
लहानपणी भीमाकडून आपला आणि भावांचा झालेल्या छळामुळे नकळत दुयोधन पांडवांचा तिरस्कार करायला लागतो. त्यांच्यात वैमनस्य वाढू लागते. लाक्षागृह जळण्याचा प्रसंग एका वर्षानंतर घडला. पांडवांना मारायचेच असते तर आधीच मारले असते. त्याचा सगळा आळ, आरोप, निंदा, नालस्ती, दुर्योधनाची. यामागेचे कारस्थानही विदुराचेच. नंतर पांचाल नरेशाने रचलेल्या स्वयंवरात सुतपुत्र म्हणून द्रौपदीने कर्णाचा केलेला अपमान. कर्ण शेवटपर्यंत विसरू शकला नाही आणि द्यूतक्रीडेनंतर झालेल्या वस्त्रहरणावेळी त्याने त्याचा सूड उगवला. एक तर कौरव आणि पांडवांच्या वादामध्ये पडण्याचा कर्णाला काहीही एक अधिकार नव्हता. ती चूक त्याच्या हातून घडली आणि ते पाप त्याला महागात पडले. भीमाच्या साहाय्याने जरासंध, किचक तसेच राजसूय यज्ञावेळी शिशुपाल यांच्या हत्याही कपटनीतीची, राजकारणाची अपूर्व उदाहरणं.
इंद्रप्रस्थमध्ये राजसूय यज्ञावेळी मयसभेमध्ये दुर्योधनाचा द्रौपदीने केलेल्या अपमानाचा बदल घेण्यासाठी द्यूत खेळलं गेलं. दुर्योधन आपल्याला द्यूत क्रीडेत मनोरंजनासाठी नव्हे तर आपलं राज्यच बळकावण्याच्या हेतूने खेळण्यासाठी आवाहन करतो आहे. हे पांडवांना माहीत होतं. युधिष्ठीर हा प्रस्ताव नाकारू ही शकत होता, पण वैयक्तिक स्वार्थापोटी आणि आपणही कौरवांना हरवून त्यांचं राज्य जिंकू शकतो या लालसेपोटी युधिष्ठिराने ते स्वीकारलं आणि सर्वकाही गमावून बसला. यावेळी स्वतः हरलेला असताना पांचालीला डावावर लावणे, म्हणजे मूर्खपणाच. बाकीचे भाऊही षंढासारखे मूग गिळून गप्प बसले. आपल्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी दुर्योधनाने द्रोपदीला भर दरबारामध्ये बोलावणे आणि वस्त्रहरण करणे निंदनीय. भर दरबारामध्ये स्त्रीचा अशा प्रकारे अपमान करणे म्हणजे पापच.
कृष्ण हस्तिनापुरी शांतीचा प्रस्ताव म्हणून नव्हे तर युद्ध निश्चित करण्यासाठी आला होता. कारण पांडवांनी उपप्लव्य या पांचाल राज्यामध्ये जमवलेली सात औक्षहिनी सेना. दुर्योधनाने अकरा औक्षहिनी सेना जमवली होती. शिवाय, भीष्म, द्रोण, कर्ण, अश्वत्थामा, शल्य, पौरव, कृतवर्मा दुःशासन, जयद्रथ तसेच भारतवर्षामधील इतर अनेक पराक्रमी योद्धे होते. तरीही त्याचा पराभव निश्चित होता. याची प्रमुख कारण म्हणजे त्याचे सेनापती-
१. भीष्म - मी पांडवांना मारणार नाही आणि जो पर्यंत मी रणांगणामध्ये आहे तोपर्यंत कर्ण युद्धात भाग घेणार नाही. रोज दशसहस्र निष्पाप सैनिकांचा वध करून काय उपयोग.
२. द्रोणाचार्य - पांडव यांना प्रिय. अर्जुन तर सर्वात प्रिय शिष्य. भारतवर्षामध्ये त्याला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्यासाठी त्यांनी काय नाही केले. मग ते कसे पांडवांना मारू शकतात. त्यांचं खरं वैमनस्य होतं ते द्रुपदाशी, ते त्यांच्या वैयक्तिक सूड भावनेने युद्धात उतरलेले.
३. कर्ण - याच्यावर दुर्योधनाची सर्वात जास्त भिस्त आणि विश्वास. याच्याच जीवावर तर दुर्योधन पांडवांशी युद्धासाठी उभा राहिला होता. पण यानेही विश्वासघात केला. युद्धाआधी कृष्ण आणि कुंतीने त्याचे जन्म रहस्य सांगून त्याचे मनोधैर्य खच्चीकरण केले. अशा अवस्थेत तो आपल्याच भावांना कसे मारेल? आणि इथेच कौरवांचा पराभव स्पष्ट झाला. अर्जुन सोडून सगळ्यांना त्याने जिवंत सोडून दिले. न मारता बंदी बनवुन युद्धाचं पारडं निश्चितच फिरवता आलं असतं. पण यांनी सगळ्यांना सोडून दिले. आणि कौरवांच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं.
४. शल्य - हा निष्णात मल्ल आणि गदाधारी. कर्णाचे सारथ्य करताना त्याचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. त्याचा मानभंग करण्याचा, मनोधैर्य खच्ची करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नकुल सहदेवाचा हा सख्खा मामा. आता मामा आपल्या भाच्यांना कसा मारू शकेल.
या चारही सेनापतींची युद्धाचे कोणतेही नियम न पाळता पांडवांकडून कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अधर्माने हत्या करण्यात आली. कारण युद्धधर्माच्या नियमांचे पालन करून यांना हरवणे शक्यच नव्हतं. आणि यांची हत्या झाल्याशिवाय विजय असंभव होता.
कर्णाच्या हत्येनंतर हे युद्ध पूर्णपणे पांडवांच्या बाजूने झुकलं. आपल्या सेनेत शल्य, अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य असे चारच योद्धे असूनही दुर्योधन पांडवांपुढे नमला नाही. शल्याच्या हत्येनंतर कौरव सेना उधळली गेली. दुर्योधन स्यमंतक सरोवरामध्ये विश्रांती घेत असताना, त्याची इच्छा नसतानाही भिमासोबत गदायुद्ध करावं लागतं. त्यावेळी बलराम उपस्थित असल्यामुळे अधर्म होण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे दुर्योधन निश्चिन्त होता. पण अखेर कृष्णाचं कपट पुन्हा एकदा दुर्योधनाच्या हत्येला कारणीभूत ठरलं. भीमाने गदायुद्धामध्ये कमरेखाली प्रहार निषिद्ध असतानाही दुर्योधनावर प्रहार केले. आणि दुर्योधनाला मरणासन्न सोडले. कृष्णाला शेवटीसुध्दा अर्धमाचीच साथ घ्यावी लागली.
या कादंबरीच्या रूपाने महाभारतातील काही प्रश्न मात्र विचार करायला लावतात.
- पांचाल नरेशाने रचलेल्या स्वयंवरात दुर्योधनाबरोबर सूतपुत्र कर्ण आलेला आहे. हे द्रुपदाला आणि कृष्णालाही माहित होतं. मग त्याला आधीच स्वयंवरामध्ये आपण भाग घेऊ नये म्हणून का सांगण्यात आलं नाही? कि सर्व राजा महाराजांसमोर त्याचा अपमानच करायचा होता म्हणून, मत्स्यभेदावेळीच नेमकं सुतपुत्र म्हणून द्रौपदीने कर्णाचा केलेला पाणउतारा, जाणूनबुजून केलेला होता का?
- कौरव आणि पांडवांच्या घरगुती भांडणांमध्ये एक तर कृष्णाने पाडण्याचे काही कारण नव्हते. पांडवांचे जन्मरहस्य त्यालाही माहित असणार. कौरवांच्या राज्याचे विभाजनाला दुयोधनाचा विरोध होता. तरीही पांडवांना अर्धे राज्य मिळवून दिले. राज्य स्थापण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. पण हे कळत नाही कि, त्याने पांडवांना आपले स्वतंत्र राज्य स्थापण्यासाठी मदत का नाही केली? किंवा त्यांना तसे मार्गदर्शन का नाही केले. भविष्यात होणाराअठरा औक्षहिनी सैन्याचा, वीरांचा, योध्यांचा संहार तरी झाला नसता!
- पांडव जर खरंच देवाचे पुत्र होते तर स्वतःच्या पराक्रमाने सारी पृथ्वी पादाक्रांत करून आपलं वेगळं राज्य का नाही स्थापन केलं? का हस्तिनापूरचे अर्धे राज्य मागण्याचा अट्टाहास? एकदा पांडवांना दिलेल्या राज्यावर दुयोधनाने तरी का हक्क सांगावा?
- कृष्ण जर विश्वरूप होता, महाशक्तिशाली होता तर मथुरेवर सतत होणाऱ्या जरासंधाच्या आक्रमणांना घाबरून दूर समुद्रामध्ये द्वारका का स्थापन केली? जरासंधाला त्याच्या राज्यात वैराग्याच्या रूपात जाऊन भीमकरवी का मारले?
- आपल्या पत्नीचे भरसभेत वस्त्रहरण होत असताना कोण शांत बसेल! दुसरं कुणी असतं तर तिथल्या तिथं एकमेकांच्या जीवावर उठले असते. मुडदे पडले असते. मग पांडव का शांत बसले? जाउद्याना आपल्याला आपापल्या बायका आहेत ना! हि कुठं माझी एकट्याची आहे? अशी तर भावना नसेल न प्रत्येकाच्या मनात? असो!
- कुंतीने कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य आधीच का नाही सांगितले? किंवा कृष्ण जर सर्व जाणणारा होता तर त्यानेही आधी का नाही सांगितले. नेमके युद्धाच्या आधीच का सांगितले?
- कृष्णाने हत्यार उचलण्यासाठी जसे अर्जुनाला मार्गदर्शन केले तसेच दुर्योधनाला संधी करण्यासाठी का नाही केले?
- अंतिम क्षणी कर्णाच्या रथाचे चाक जेव्हा भूमीमध्ये रुतून बसले.तेव्हा त्याला खाली उतरून चाक बाहेर काढण्यासाठी खटाटोप करण्याची काय गरज होती का? रथारूढ होऊनच सूर्यास्तापर्यंत का नाही लढला? रथाचे चाक बाहेर काढून कुठे जायची घाई होती? जरी चाक निघाले असते तरी कृष्णाने रथ त्याच्यापासून दूर पळवलाच असता. पुन्हा पळ मग त्याच्या मागे. शेवटपर्यंत अर्जुनाशी द्वंद्व करण्यासाठी त्याच्या मागे मागे पळत होता. रथाचे चाक अडकल्यामुळे तरी तो सामोरा आला. मग लढायचं ना? आत्तापर्यंत कृष्णाने किती जणांची हत्या अधर्माने, युद्धाचे नियम मोडून केली. हे माहित नसावे का कर्णाला? रथाचं चक्र काढेपर्यंत कृष्ण थोडीच थांबणार आहे! कि कृष्ण म्हणेल, 'काढ बाबा चाक, आम्ही थांबतो तोपर्यंत. तुझं झालं कि सांग, मग पुन्हा युद्ध सुरु करू'. अरे काय? जर परशुरामांच्या शापवाणीनुसार कठीण समयी विद्येचे विस्मरण होईल. हे माहित असताना, युद्धावेळी कोणता प्रसंग कठीण असेल नाही सांगता येत. मग आधीच ब्रह्मास्त्राचं आवाहन का नाही केलं?(जर खरंच दैवी शक्ती होती आणि ब्रह्मास्त्राचं ज्ञान होतं.) शेवटीच का? गोहत्येच्या पापासाठी ब्राह्मणाने दिलेल्या शापामुळे आपलं रथचक्र जमिनीमध्ये रुतून बसेल आणि त्यातच तुझा अंत होईल. हे माहित असूनही,चाक बाहेर काढण्याची काय गरज? कि कुंतीला दिलेल्या वचनानुसार स्वतःच्या मृत्यूची वाट बघत होता?
असे कितीतरी प्रश्न महाभारत वाचल्यावर पडतात. पडत राहतील.
स्यमंतक सरोवरकाठी शेवटची घटका मोजत असलेल्या दुर्योधनाच्या मनातले विचार लेखकाने मांडले आहेत.
रण शांत झालंय...
अंधार दाटू लागला आहे...
सगळीकडे सैनिकांची छिन्नविच्छिन्न शरीरे विखुरलेली आहेत...
श्वापदे, गिधाडे लचके तोडण्यासाठी हिंडतआहेत...
इथे फिरतोय फक्त मृत्यूचा सुमसान वारा...
ज्या विजयाची स्वप्न पहिली होती...
त्याची सावली कुठंच दिसेना...
शरीरामध्ये असंख्य वेदनांनी विजांच्या कडकडाटासारखा खेळ लावलाय...
आता माझी प्राणज्योतही थरथरू लागली आहे.
पुस्तकाच्या मागच्या पानावर दुर्योधनाच्या मनातले विचार बरोबर होते कि चूक? विचार करायला लावतात.
राज्य विस्तार पावू शकतात.
त्यांचं अधःपतन वा विभाजनाला राजनीतीत स्थान नाही.
इतिहासाने मला नीच, प्रचंड संहाराचा जबाबदार ठरवलं तरी मी भूमीशी द्रोह करणार नाही.
प्राण गेला तरी राजधर्म सोडणार नाही.
महाराज धृतराष्ट्रांनी कौंत्येयांना दिलेलं राज्य हे दान होतं, हक्क नव्हे.
आता मी जिवंत असेपर्यंत त्यांना या सुईच्या अग्रावर मावेल एवढा धूलिकणही मिळू देणार नाही.
केशवा, तू समेटासाठी नव्हे तर युद्ध निश्चित करण्यासाठी आलेला आहेस.
दिवस सांगून जा. ठरलेल्या वेळी रणांगणामध्ये मी तुमचं स्वागत करण्यासाठी सज्ज असेन.
कादंबरीमध्ये लेखकाने खूप छान विचार मांडले आहेत आणि वाचल्यानंतर आपल्याला काही गोष्टी नक्कीच शिकायला मिळतात.
- कधीही कुणाचा अपमान करू नका. कारण, अपमान झालेली व्यक्ती जीवनभर त्याचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करते.
- दुसऱ्याच्या स्त्रीची, संपत्तीची कधीही हाव धरू नये.
- एकदा दिलेल्या गोष्टीवर पुनः अधिकार सांगू नका. मग ती धन, संपत्ती, जमीन, वस्तू किंवा आणखी काही असेना!
- कोणत्याही स्त्रीचा मानभांग होईल असे वर्तन कधीही करू नका.
- सामंजस्य, सहकार्य आणि चर्चेने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असावं.
- एखाद्याला वचन देतांना, प्रतिज्ञा करताना विचार करा. नंतर ते पूर्ण करताना स्वतःची मूल्ये डावावर लावायला लागू नये.
- आनंदाच्या भरात कुणालाही वचन देण्याआधी विचार करूनच द्या.
- कोणत्याही गोष्टीचा डोळसपणे विचार करा. डोळेझाकून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा नव्हे, अंधश्रद्धा! त्यासाठी पाठपुरावा करायला शिका.
- संघर्षाशिवाय जीवनात काहीही प्राप्त होत नसतं. संघर्षासाठी जिद्द आणि सामर्थ्य आवश्यक आहे.
- हक्कासाठी लढायला शिका. हे जग निर्दय आहे. सुखासुखी इथे काहीही प्राप्त होत नाही.
- शकून अपशकुन या माणसाच्या मनात नाचणाऱ्या भयाच्या सावल्या. बुद्धिवादी विचार केला की त्या आपोआप नाहीश्या होतात.
- आयुष्य हे एक अघोषित युद्ध आहे. जगण्यासाठी संघर्ष करून जगासमोर आपलं स्थान निर्माण करावं लागतं.
- कानापर्यंत आलेली कोणतीही गोष्ट सत्य मनू नका, पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.
- ज्याला देव मानलं आहे, देवत्व बहाल केलं आहे. त्याचं सत्य, कष्ट, संघर्ष जाणून घ्यायचा प्रयत्न करा. डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि हात झटकून जबाबदाऱ्यांपासून पळू नका.
- युद्ध कोणत्याही समस्येचा अंतिम मार्ग असावा.
- दोन व्यक्ती शांती, प्रेम, सामंजस्याने एकत्र राहू शकत नसतील, एकमेकांच्या कामाचा आणि विचारांचा आदर करत नसतील, तर त्यांनी एकमेकांपासून दूर राहिलेलंच बरं!
- संघर्ष तेव्हाच केला पाहिजे, जेव्हा त्याची आवश्यकता असेल. जर प्रत्येक पावलाला संघर्ष करत राहिलो तर ध्येय गाठणं मुश्किल होऊन जाईल.
- खरा मित्र तो नसतो, जो नेहमी तुमच्या बरोबर राहतो. पण तो असतो, जो तुम्हाला वाईट मार्गापासून परावृत्त करतो.
वाचत राहा! लिहीत राहा!
--- ईश्वर त्रिंबक आगम