११ मार्च १६८९ रोजी झालेल्या छ. संभाजी राजांच्या हत्येने अवघं मराठी मंडळ हादरलं. औरंगजेबने बेखौफ युद्धज्वर अंगी भिनलेल्या मराठ्यांना कचाट्यात पकडण्याची खेळी घातपातांच्या प्रदीर्घ प्रयसांनी अखेर यशस्वी केली. मराठ्यांचे मोठ मोठे मोहरे या धक्क्याने हडबडले. छ. शिवाजी महाराजांनी उभारलेले अन असंख्य मावळ्यांच्या निष्ठेवर निपजलेलं स्वराज्य शंभुराजांनी त्याच ताकदीने सांभाळले. पाच पाच शाह्यांशी बेफाम लढ़ा देत त्याचं वर्धिष्णु स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. पण मुठभर कचदिल मराठ्यांनी शंभुराजांसारखा तन्मणी कोल्ह्यांच्या हाती धरून दिला अन स्वराज्य अस्थिर केलं. स्वतः छत्रपतीच शत्रूच्या हाती पडल्याने स्वराज्याच्या मुत्सद्द्यांचीही मती गुंग झाली. पण त्यातून सावरत औरंगशाहीला शह देण्यासाठी त्यांनी नव्या खेळया सुरु केल्या. 'हे राज्य अवघ्यांचे..' म्हणत निष्ठावंतांनी या 'श्रीं' च्या राज्यासाठी सलाबतीची धोड उठवली. येसुबाईंच्या आशीर्वादाने छ.रामराजांनी स्वराज्य कारभार हाती घेत जिंजी जवळ केली अन शत्रु फौजा स्वराज्यातून बाहेर खेचल्या. रामचंद्रपंत अमात्यांना 'हुकुमतपनाह' म्हणून सर्वाधिकार देऊन देशावरील सकल भरवसा त्यांचेवर सोपवला. याचा सकारात्मक परिणाम झाला. लढायांचं क्षेत्र महाराष्ट्र ते जिंजी एवढ्या प्रचंड परदेशात विस्तारलं. पर्यायाने स्वराज्यातील शत्रुसैन्याच्या अश्वटापा मंदावल्या. या संघर्षपूर्ण काळात स्वराज्याच्या मातीशी ईमान राखत तिच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नरश्रेष्ठांनी आपल्या जिंदगीचं मोल चुकवलं. रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधवराव, शंकराजी नारायण, खंडो बल्लाळ, बहिर्जी अन मालोजी घोरपडे बंधू, चांदजीराव पाटणकर, तिमाजी घाटगे, रखमाजी मोहिते, परशुरामपंत प्रतिनिधि यांसारख्या आसामी मोघलांशी कड़ोविकडीची झुंज घेत लढत राहिल्या. या नरश्रेष्ठांच्या भारदस्त यादितीलच एक झुंजार नाव म्हणजे सेनापती 'संताजी घोरपडे'.
मराठेशाहीचा इतिहास या लढवय्या सेनानीशिवाय अपूर्ण आहे. शिवछत्रपतींच्या प्रेरक तत्वांशी ईमान राखत संताजींनी गाजवलेले तलवारिचे तमाशे उभ्या मोगलशाहीने पाहिले. केवळ पाहिले नाहीत तर मोगलांची चतुरंग सेना त्यात अक्षरशः होरपळून निघाली. संताजी बाबांचं रोSमहर्षक पण प्रचंड संघर्षपूर्ण आयुष्य मराठ्यांसाठी चिंतनीय आहे. मराठा सत्तेच्या या पराक्रमी सेनानीच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडून तो इतिहासप्रेमींसमोर मांडावयास अनेक संशोधक सरसावले. जुनाट वाड्याहुड्यांच्या तळघरात आडोशाला निपचित पडलेले असंख्य दस्तावेज मराठी इतिहास संशोधकांनी शोधून सेनापतींच्या आयुष्याचं सार मांडलं. संदर्भ ग्रंथ अन चरित्रात्मक कादंबऱ्यांनी त्यांच्या 'थोरा करिन्याचा..' वृत्तांत समोर आणला. सेनापतींना कादंबरीच्या रुपात इतिहासप्रेमींसमोर मांडलेल्या काही मोजक्या लेखकांत काका विधातेंचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रफुल्लता प्रकाशनने प्रकाशित केलेली काका विधाते लिखित 'संताजी' कादंबरी म्हणजे कादंबरीमय लेखनाचा उत्कृष्ट नमूनाच. कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन श्रावण शुद्ध १४ शके १९३३ म्हणजेच १२ ऑगस्ट २०११ रोजी झाले तर द्वितीय आवृत्ती ९ ऑगस्ट २०१२ रोजी निघाली.
संपूर्ण कादंबरी शब्दलालित्याने नखशिखांत नटलेली आहे. मराठी सारस्वतांच्या उच्चतम शब्दाविष्काराला साजेशी आहे. ललित लेखनाच्या सर्वोत्कृष्ट उंचीवर पोहोचली आहे. वाचकांना कुठेही नीरस वाटनार नाही याची काळजी लेखकाने अगदी पुरेपूर घेतली आहे. सुमारे नऊशेहुन अधिक पृष्ठांच्या 'संताजी' कादंबरीत एकूण १५ प्रकरणे आणि ६ अवांतर परिशिष्टे जोडली आहेत. त्यामुळे कादंबरी निव्वळ रसरसलेल्या शब्दांनीच सजवलेली नाही तर नकाशे, प्रमुख व्यक्तीरेखा, संदर्भ ग्रंथ सूचि, सेनापतींच्या लढायांच्या स्थानांचा नकाशा, वंशावळ, मुद्रा अशी भरगच्च जोड देत त्याच्या ऐतिहासिक मुल्यासही जपले आहे.
कादंबरीची सुरुवातच 'परचक्र' या शंभुराजांच्या कारकिर्दीतील एका दुर्दैवी प्रकारणाने होते. १ फेब्रुवारी १६८९ रोजी शंभुराजे शेख निजाम उर्फ़ मुक़र्रबखानाकडून संगमेश्वरी कैद झाले. यावेळी झालेल्या झटापटीत सेनापती म्हाळोजी घोरपडे आपल्या तिन्ही पुत्रांसाहित मोठ्या शर्थिने लढले. पण शत्रुजोर वाढला. त्यातच खुद्द सेनापती जबर शस्त्राघात होऊन मृत्युमुखी पडले. संताजी, बहिर्जी अन मालोजी हे तिघेही घोरपडे बंधू परस्थीतीचं गांभीर्य ओळखून शंभुराजांच्या आज्ञेने रायगडाकडे मार्गस्थ झाले. मुठभर मराठ्यांचा जोर खचला. स्वतः छत्रपती कैद झाल्याने मराठा सैन्य मागे हटले. राजधानी रायगडवर ही वार्ता कळताच अवघा कल्लोळ माजला. महाराणी येसूबाई क्षणभर दिढ़मूढ़ झाल्या पण लगेच त्यांनी स्वतःला सावरत सैन्याला जगोजागी हुशार राहण्याच्या, गडकोट झुंजवण्याच्या सुचना दिल्या. रामराजांचा मंचकारोहण विधि करवुन कारभार त्यांचे हाती दिला. हा एकूणच अखेरीचा गोंधळ लेखकाने अगदी उत्तम साकारला आहे. स्वराज्याचा पड़ता काळ मांडताना त्यात कुठेही अतिरंजितपणा आला नाही. या घडामोडींत आलेल्या व्यक्तीरेखा मांडताना त्यांच्या कर्तुत्वाची योग्य ती मांडणी केली आहे.
'धारातीर्थ' 'शिवशाहीचं अंतरंग' 'स्वराज्याचा धारकरी' 'नौबत' 'सामना' 'यल्गार' 'सेनापतीची समशेर' 'कलागत आणि कलह' 'रण' 'सलाबत' 'नरसिंह' 'वैराचा वणवा' 'बंड' 'फाड़ीला सिंह कोल्ह्यांनी' अशी एकाहुंन एक सरस प्रकरणे संताजींच्या चरित्राचा वेचक वेध घेतात. 'शिवशाहीचं अंतरंग' मधे लेखकाने स्वराज्याच्या कारभाराची दिलेली उदाहरणे, मांडलेली माहिती नवख्या वाचकाला आपलसं करणारी आहे. पुढच्या काही प्रकरणांत सेनापती अन त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमिची माहिती अंतर्भूत केली आहे. घोरपडे घराणे हे मुळचे सिसोदिया घराणे हे मांडताना लेखकाने योग्य ते विश्लेषण आवर्जून दिले असल्याने वाचकांचे प्रश्न आपोआप विरले जातात. 'सेनापतींची समशेर' मधल्या अनेक लढाया, सेनापतीपदाची जबाबदारी मिळाल्यावर संताजींनी गाजवलेली रणक्षेत्रे, शत्रुवर बसवलेली वचक अन स्वकीयांच्या साथीने आक्रंदलेला दक्खन, दक्षिण भारत वाचकांपुढे मांडताना लेखकाने कोणताही हातचा मागे ठेवला नाही. हे सर्व अगदी अगदी लिलया रेखाटत सेनापतींच्या कर्तुत्वाची ओळख करून दिली आहे.
छ. रामराजांच्या कार्यकाळात स्वराज्यात फितुरांचं पेव वाढलं होतं. क्षणात पगड़ी बदलणारे सरदार, सैन्य स्वराज्यास घातक होतं. परकियांची चाकरी करून अनेक मातब्बर मराठे सरदार वतने, जहागिऱ्या, देशमुख्या, पाटिलक्यांच्या लालसेने रामराजांच्या पदरी नाक घासत होते. हे दलबदलू राजकारण स्वराज्यास अंत्यंत मारक होतं. रामराजे एक एक माणूस जोडण्याच्या नादात काहीसे वहावत चालले होते अन त्यांच्याकडून या माघारी आलेल्या उपऱ्या सरदार, दरकदारांना हव्या त्या जहागिऱ्या, वतने बेलाशक दिली जात होती. इकडे मात्र याचा परिणाम म्हणून स्वराज्यातील पीढ़ीजात कदिम घराणी उपेक्षित राहिली जात असत. 'हे आपलेच आहेत, जातात कुठे..' हे गृहितक स्वकीय निष्ठावंतांना जाचक ठरत होते. संताजी घोरपडे एकूणच स्वराज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर नाराज होते ते यामुळेच. हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य छत्रपतींना विश्वासात घेऊन स्वतःच्या मर्जीने काही बेकाबू निर्णय घेत असत. लष्करी शिस्तीच्या सगळ्या नियमांचा पुरता बोजवारा उडालेला. त्यात दोन्ही डगरींवर पाय ठेवून झुकत्या बाजुकडे कलंडणाऱ्या हेकेखोर सरदारांनी उच्छाद मांडलेला. तीस हजारांची कड़वी फ़ौज बाळगणाऱ्या संताजींची लष्करी शिस्त अन लष्कराचा त्यांच्यावर असलेला जीव यामुळे अवघं मोगल सैन्य थरथरत होतं. मराठी मनांत संताजींनी स्वराज्याच्या नव्या उभारीचा विश्वास दिला. पण नेमकं हेच स्वराज्यातल्या जाणत्या कर्त्यांना नको होतं. काका विधातेंनी या कादंबरीत हे इतकं स्पष्टपणे मांडलं आहे की त्यामुळे वाचक अंतर्मुख व्हावा. अनेक ठिकाणी त्यांनी आमात्यांवर, धनाजीरावांवर, जिंजितल्या रामराजेंच्या कारभाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अर्थात तत्कालीन परस्थीतीही तशीच होती हे खोलात जाऊन पाहिल्यास लेखकाचे हे मत ग्राह्य वाटते.
संताजी-धनाजी द्वयी म्हणजे मोगलांना कर्दनकाळ वाटू लागली होती. त्यांच्या घोड्यांच्या टापा माळव्यापासून अगदी तंजावर-जिंजी पर्यंत बेख़ौफ़ होऊन पडत होत्या. रामराजांनी संताजींना 'सेनापती' म्हणून गौरवताना धनाजींनाही 'सरलष्कर' म्हणून नियुक्त केले. पर्यायाने दोघांचे अधिकारक्षेत्र समान राहिले. मोहिमांत एकजिनसीपणा राहत नव्हता. पुढे दोघांत किरकोळ गैरसमजातून वाद निर्माण झाले. रामराजेही संताजींच्या एककल्ली वर्तणुकीने नाराज झाले. संताजी स्वतःच्या कड़क शिस्तीच्या नियमांना स्वराज्याच्या भल्यासाठी वापरत होते. बेशिस्त घडीला शिस्त लावत होते. स्वामिनिष्ठेसाठी आयुष्य पणाला लावत होते. जिंजीच्या दरबारात झालेल्या अपमानाचं कोणतही शल्य मनात न ठेवता ते पुन्हा कार्यमग्न झाले. इतकेच नव्हे तर आयवारकुटीच्या लढाईत धनाजी जाधव छत्रपतींना पुढे घालून संताजीवर चालून गेले. यात रामराजेंना दुर्दैवी पराभव स्विकारावा लागला. ते स्वतः संताजीच्या हाती सापडले. पण स्वामिनिष्ठेपुढे संताजींनी स्वतःचा मी पणा मोठा होऊ दिला नाही. झाले गेले गंगेला मिळाले या वृत्तीने त्यांनी छत्रपतींपुढे शरणागती पत्करली. त्यांना सुरक्षित जिंजीपर्यन्त पोहोचवले. मनात अढी असती तर त्यांना कोणताही निर्णय घेता आला असता. पण एका स्वामिनिष्ठ सेवकाचा धर्म त्यांनी ढळु दिला नाही. त्यांचं मन साफ़ होतं. संताजींच्या या स्वामिनिष्ठेला उद्दामपणाचं बाशिंग बांधण्याचा नादानपणा स्वराज्याच्या कारभाऱ्यांनी जाणीवपूर्वक केला. त्यांच्या लखलखत्या कार्याची धड़की घेत त्यांना गर्विष्ठ, अडेलतट्टू ठरवलं. त्यामुळे कारभाऱ्यांचे त्यांच्याशी सतत बिनसत राहीले.
आलम हिदुस्थानाचा बादशाह म्हणून मिरवणाऱ्या औरंगजेबला मृत्युचा आभास करून दिला तो संताजींनी. पातशहाच्या छावणीवर बेडरपणे हल्ला केल्यावर तो सापडत नाही म्हणून त्याच्या शाही तंबूचे सोन्याचे कळस कापून आणण्याचा भीमपराक्रम करणारे संताजी स्वकीयांच्याच दुर्दैवी कारस्थानाला बळी पडावेत हे मराठेशाहीचं मोठं दुर्दैव. लेखकाने चितारलेलं सेनापतींचं शंभुमहादेवाच्या डोंगरातील अखेरचं धडपडनं कोणत्याही संवेदनशील मनाला चटका लावून जातं. इंजबाव, खुटबाव, गिरवी, भांब, मांडकी, शिखर शिंगणापूर, कारखेल या भागातला संताजींचा अखेरचा वावर म्हणजे जणू जगण्याची अखेरची धडपडच. या काळातल्या घटना लेखकाने फारच काळजीपुर्वक उठवल्या आहेत. शहाजी राजांपासून भोसले घराण्याशी निष्ठा जपणारं घराणं म्हणून घोरपडे घराण्याचा नावलौकिक होता. संताजींचे वडील म्हाळोजी घोरपडे हे शहाजी राजांच्या ख़ास मार्जितले कारभारी. तांब्रांची गुलामी सहन होईना म्हणून त्यांनी स्वतःच बाल शिवाजी राजांच्या जहागिरीत जाण्याचे ठरवले. संताजी, बहिर्जी अन मालोजी ही त्यांची तीनही मुले कळत्या वयापासूनच स्वराज्याच्या सेवेत झटत होती. रामराजेंच्या काळात मालोजी कर्नाटक प्रांती मारला गेला. बहिर्जीने अखेर पर्यंत स्वराज्याशी ईमान राखलं. तर महाबाहु सरसेनापती संताजी घोरपडे घरभेद्यांकडूनच मारले गेले. हे पूर्ण घराणं स्वराज्यासाठी झटलं. औरंगजेबाचे हुकूमाचे ऐक्के म्हणून ख्यातकीर्त असलेले रणदुल्लाखान, हिंमतखान, जानबाजखान, शेख निजाम, रणमस्तखान, शहाबुद्दीखान, तकीखान, मतलबखान, शर्जाखान, बक्षी रहुल्लाखान, शहजादा बेदारबख्त, जुल्फीकारखान, रूस्तमखान, घालीबखान, तलबखान, मुहंमद अमीनखान, खुदावंतखान मरहमतखान, लुत्फुल्लाखान, मामुरखान, मुहंमद खलील असे एकाहून एक सरस योध्हे संताजींनी धुळीस मिळवले. अवघ्या हिंदूस्तानला पायतळी घेण्याची स्वप्ने पाहाणाऱ्या आलमगीर औरंगजेबला दहशत बसवली. त्यामुळेच संताजी म्हणजे आपल्या भक्कम देहाची तळपती तलवार करून शत्रुच्या हिरेजडीत आसनांच्या क्षणात ठिकऱ्या उडवनारा साक्षात नरशार्दूल ठरले.
काका विधातेंनी कादंबरीच्या पानापानांत घोरपडे घराण्याचं हे योगदान सजवलं आहे. मराठ्यांचा कर्रोफर (वैभवशाली) सेनापती म्हणून इतिहासात अजरामर झालेल्या संताजी घोरपड्यांना निखालस उच्च स्थान दिले आहे. संताजींच्या हालचालींचा पद्धतशिर मागोवा घेत कादंबरीमय चरित्राला न्याय दिला आहे. कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीमत्वावर कादंबरीमय लेखन करताना मूळ मसुद्याचा बाज न हरवता लेखकाला लेखन स्वातंत्र्याचा अलिखित अधिकार मिळालेला असतो. त्यानुसार काही ठिकाणी इतिहासाला विपर्यस्त अशी माहितीही अशा कलाकृतीत पाहायला मिळते. काका विधातेंनी मात्र या बाबी कटाक्षाने टाळल्या आहेत. तरीही काही प्रकरणांत या गोष्टी अल्पशा प्रमाणात का होईना पण पाहायला मिळतात हे मान्य करावे लागेल. एकूणच ही कादंबरी संताजी सारख्या पराक्रमी इतिहासपुरुषाच्या चरित्रात्मक वर्णनाशी एकरूप झाली आहे. लेखकाने त्यासाठी घेतलेले कष्ट, शब्दांच्या फैरी, स्वतःची भटकंती, उत्तम छायाचित्रे ही त्यांच्या ध्यासाची परिमाणे दर्शवतात. चरित्रात्मक वर्णनदृष्टीने पैकीच्या पैकी गुण मिळवण्यास 'संताजी' कादंबरी निश्चित पात्र आहे.
-- संतोष काशिद. (दै. गोवन वार्ता, तरंग पूरवणी, रविवार दि. ०३ मार्च २०१९)
हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाईट वरून घरपोच मागविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा!