संताजी कादंबरी

शिवाजी महाराजानंतर गनिमी काव्याच्या लढाईचा सर्वोत्तम व प्रभावी वापर जर कोणी केला असेल तर तो संताजीनेच. या लढाईचं एक परिपूर्ण शास्त्र त्याने विकसित केलं होतं. स्वतःची कमीत कमी शक्ती वापरून शत्रूचं अधिकाधिक नुकसान करण्याचं तंत्र त्याने वापरलं. बऱ्याचदा त्याच्या हाताशी शत्रूपेक्षा जास्त फौज असे. पण तरीही शक्तीच्या अनाठाई दर्पातून शत्रूशी कधीही तो वेड्यासारखा भिडला नाही. प्रत्येक वेळेला वेगळेच डावपेच लढवून तो त्याला गोंधळात पाडत असे. सैन्याच्या लहान लहान तुकड्या करून आपल्या बळाचा शत्रूला अंदाज लागू देत नसे. त्याचे हेर अत्यंत चपळ आणि अचूक बातम्या काढणारे होते. शत्रूच्या हालचालीची खडान्खडा माहिती ते त्याला आणून देत. त्यानुसार आपल्या सैन्याच्या हालचाली घडवणे वा हल्ले करण त्याला सोपं जाई. लढाईत तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा तो अचूक उपयोग करुन घेई. जेव्हा शत्रुचं बळ जास्त असेल आणि त्याला तोंड देणं कठीण असेल अशा वेळी वेगवान हालचाली करून तो मुलुखात धुंद ऊठवे. शत्रूला आपल्या पाठलागावर यायला भाग पाडून प्रचंड पायपीट घडवे. प्रत्यक्ष लढाईत त्याचं जे नुकसान होई, तेवढंच नुकसान या पळापळीत नि पायपिटीत होई. त्याचा पाठलाग करताना मोगल सैन्याने आपली अनेक माणसं, घोडी, जनावरं गमावली.

फौजा चालविण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि राज्याच्या तिजोरीत तर त्याचा संपूर्ण खडखडाट. सरकारातून सैन्याच्या खर्चासाठी पैसा मिळणं शक्य नव्हतं. त्यावरही संताजीने प्रभावी उपाय योजला. सैन्याचा खर्च भागवण्यासाठी सरकारातून काहीही मागायचं नाही, तर फौजेचं पोट परमुलखातून लूट करून वा खंडण्या घेऊन भरायचं ही नवी नीती त्याने निर्माण केली. त्याचा परिणाम असा झाला की, सैन्याच्या खर्चाच्या जबाबदारीतून महाराज मुक्त झाले. त्याचा सगळा ताण मात्र मोगली मुलुखावर पडला. मुलूख तर वैराण झालाच, काही महसूल मिळायचा तोही बुडाला. मोगलांच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट निर्माण झाला. उत्तरेतून अधिकाधिक द्रव्य, रसद त्यांना मागवावी लागली. पातशहाच्या तिजोरीवर याचा फार मोठा प्रतिकूल परिणाम झाला.

संताजीच्या लढ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या लष्करी हालचालीची प्रचंड गती नि वेग! अतर्क्य, अचाट असंच त्याचं वर्णन केलं पाहिजे. सैन्यासह तो जणू वाऱ्यावरच स्वार ला होता. मोगलांचे हेर त्याच्या हालचालीच्या खबरा खूप चपळपणाने आणत. त्याला गाठण्यासाठी पातशहा तात्काळ उपाययोजनाही करी. त्यानुसार त्याचे सरदार फौजेचा दळभार घेऊन तातडीने निघत. पण ते येईपर्यंत संताजी सैन्यासह कुठल्या कुठे निघून गेलेला असे. एक खान वगळता मोगलांच्या कुठल्याही सरदाराला त्याचा यशस्वी पाठलाग करणं जमलं नाही. हिंमतखानाचीही या प्रयत्नात इतकी धावपळ आणि दैना उडाली की त्याच्या सैन्यातली घोडी, उंट, वाहतुकीची जनावरे अतिश्रमाने मेली. त्याच्या स्वारांना बसायला घोडी राहिली नाहीत. वेगवान लष्करी हालचालींमुळे संताजीला रोखण्याचे पातशहाचे सर्व प्रयत्न फोल ठरले

गनिमी काव्याच्या बळावर अनेक लढाया संताजीने जिंकल्या. मोगलांच्या मातब्बर सरदाराना धूळ चारली. त्यातल्या काहींना रणास आणून त्याने ठार मारलं. पातशाही सैन्याला त्याचा किती दरारा, धाक वाटत होता त्याचं वर्णन खाफिखानाने केलेलं आहे. तो म्हणतो,
"ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा वा लढण्याचा प्रसंग आला, त्याच्या नशिबी खालील तीन पैकी एक परिणाम ठेवलेला असेल, एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या हाती सापडेल किंवा त्याचा पराभव होई. अशावेळी मोगल सरदारांना आपण जिवानिशी निसटलो हाच आपला पुनर्जन्म झाला असे वाटे. त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे. धडकी भरुन सोडणारी आपली फौज घेऊन तो कुठेही पोहोचला की नरव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योद्धयांची हृदये कंपायमान होत."
'त्याच्याशी लढण्याचे, त्याला प्रतिकार करण्याचे धैर्य एकाही मोगल अमिरात नव्हते. इतकी त्याच्या नावाची दहशत होती. त्याने शाही लष्कराचे केलेले प्रत्येक नुकसान थरकाप उडवणारे होते. 'असे एका पाठोपाठ एक भयंकर आघात झाल्यामुळे मोगल सैन्याचं धैर्यच खचून गेलं. पुढे पुढे तर संताजीशी लढण्याऐवजी त्याला खंडणी देऊन आपला इलाका वाचवण्याकडे त्यांचा कल वाढू लागला.

रणांगणात त्याला संपूर्ण पराभूत करता येणं शक्य नाही याची खात्री पटल्यावरच पातशहा त्याचा नाश करण्यासाठी उद्युक्त झाला. संभाजी महाराजांच्या बाबतीत त्याने नेमकं हेच केलं होतं. आपलं काम तडीस नेण्यासाठी मराठ्यांच्या गोटातली माणसं सहजगत्या उपलब्ध होतात हे ठाऊक असल्यामुळे त्याने नागोजी मानेचा वापर करून घेतला. नागोजीच्या नीतीचं आश्चर्य वा वाईट वाटत नाही. कारण त्याची लायकीच ती होती. दुःख होतं ते या प्रकरणातलं राजाराम महाराज, रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, धनाजी जाधव यासारख्या लोकांचं धक्कादायक वर्तन पाहून. आणि मग मनात विचार येतो, संताजीसारख्या पराक्रमी सेनापतीचा अकाली अंत झाला नसता तर स्वराज्याचा लढा कदाचित इतका लांबला नसता आणि औरंगजेबाच्या साम्राज्याचं पतन आणखी वेगाने झालं असतं. पण असो. इतिहासात जर तरला काही स्थान नसतं.

--- काका विधाते ( "संताजी" कादंबरीच्या परिशिष्टामधुन )

हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाईट वरून घरपोच मागविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा